आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जिल्ह्यातील टँकर घोटाळा; चौकशी अहवाल बोगस

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - दुष्काळी परिस्थितीत जिल्ह्यात टँकरने पाणीपुरवठा करण्यात आला. खेपांमध्ये घोटाळा झाल्याचा आरोप पदाधिकारी सदस्यांनी केल्यानंतर गटविकास अधिकाऱ्यांकडून अहवाल मागवण्यात आला. या अहवालात सर्वकाही नियमानुसार झाल्याचा कांगावा करण्यात आला. मात्र, सदस्यांनी या अहवाल बोगस केल्याचा आरोप ‘दिव्य मराठी’शी बोलताना केला. त्यामुळे सोमवारी (१९ सप्टेंबर) होणारी सर्वसाधारण सभा वादळी होण्याची शक्यता आहे.
जिल्ह्यात मागील चार ते पाच वर्षांपासून दुष्काळी परिस्थितीला सामोरे जावे लागत आहे. यापार्श्वभूमीवर टंचाई निवारणार्थ टँकरने जिल्हाभर पाणीपुरवठा केला. या उपाययोजनेमुळे ग्रामीण जनतेला दिलासा मिळाला. गरजेनुसार मंजूर असलेल्या एकूण खेपांच्या तुलनेत झालेल्या खेपा कमी होत्या, हे वास्तव आहे. हाच आता कळीचा मुद्दा ठरला आहे. स्थायी समतीच्या सभेत टँकर घोटाळ्याचा आरोप करण्यात आला. त्यावेळी अध्यक्षा मंजुषा गुंड यांनी हा सर्वात मोठा घोटाळा असल्याचे पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले होते. कार्यकारी अभियंता सुरेंद्रकुमार कदम यांच्याकडे टँकरसंदर्भात माहिती मागवली होती. मंजूर खेपांच्या तुलनेत झालेल्या खेपा कमी असतानाही मंजुरीप्रमाणे बिले काढणे, जीपीएस यंत्रात फेरफार करणे, टँकरचा पाणीपुरवठा करताना ठेकेदारानेच उपठेकेदार नेमणे, अंतर कमी असताना जास्त दाखवणे यासह विविध आक्षेप पदाधिकारी सदस्यांनी घेतले. याप्रकरणी चौकशी करून समितीला अहवाल सादर करण्याचेही सभेत ठरले होते. त्यानुसार कार्यकारी अभियंत्यांनी गटविकास अधिकाऱ्यांमार्फत आक्षेप घेतलेल्या मुद्द्यांबाबत अहवाल मागवला. अहवालात सारे काही नियमानुसारच असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. या अहवालावर मात्र, सदस्यांकडून तिव्र नाराजी व्यक्त होत आहे. काही सदस्यांनी "दिव्य मराठी'शी बोलताना हे अहवालच बोगस असल्याचे स्पष्ट केले. पुन्हा त्रयस्थ यंत्रणेमार्फत फेर चौकशी लावायची का ? असा सवालही उपस्थित झाला आहे. सोमवारी होणाऱ्या सर्वसाधारण सभेत या विषयावर वादळी चर्चा होण्याची शक्यता आहे. प्रशासन सर्व प्रकारच्या चौकशीला सामोरे जाण्यास तयार आहे, असेही अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे टँकर घोटाळ्याची फेरचौकशी करून दोषींवर कारवाई करण्याचेही नियोजन आखले जात आहे.

सर्व मुद्द्यांबाबत अहवाल
^स्थायी समितीत झालेल्या चर्चेनुसार उपस्थित झालेल्या पाच मुद्द्याबाबत अहवाल आले आहेत. या अहवालात सर्व काही नियमानुसार झाल्याचे कळवले आहे. जीपीएसमध्येही फेरफार केली नसल्याचे म्हटले आहे. हा अहवालही आम्ही समोर ठेवला आहे.'' सुरेंद्रकुमारकदम, कार्यकारी अभियंता.

त्रयस्थ यंत्रणेमार्फत चौकशी करा
^टँकरघोटाळ्यासंदर्भात ग्रामपंचायत पातळीवरून तक्रारी झाल्या आहेत. पण केलेल्या तक्रारीनुसार चौकशी झाली नाही. त्यामुळे आलेल्या अहवालाबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. आता या घोटाळ्याची त्रयस्थ यंत्रणेमार्फतच चौकशी करावी.’’ सुजितझावरे, सदस्य, जिल्हा परिषद.

अहवालानुसार चौकशीच केली नाही
^टँकरघोटाळ्या संदर्भात जे आक्षेप घेतले, त्यानुसार कोणतीही चौकशी झाली. गटविकास अधिकाऱ्यांकडून आलेले अहवाल केवळ एका पत्राप्रमाणे आहेत. मी ते पाहिले आहे, अहवालानुसार चौकशीच झाली नसल्याचे दिसून येत आहे.’’ बाळासाहेबहराळ, सदस्य, जिल्हा परिषद.

अशी होऊ शकते नवी चौकशी समिती
टँकर घोटाळ्याची चौकशी करण्यासाठी चौकशी समिती नेमताना उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रामपंचायत), उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पाणी स्वच्छता मिशन), सहायक गटविकास अधिकारी, सहायक लेखाधिकारी यांची समिती स्थापन होऊ शकते.
बातम्या आणखी आहेत...