आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Tanta Mukti Program Nagar District No. 1 In State

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

‘पुरस्कारानंतर तंटे वाढवू नका’

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर - महात्मा गांधी तंटामुक्त अभियानांतर्गत जिल्ह्यातील 336 गावांनी तंटामुक्ती पुरस्कार मिळवून राज्यामध्ये जिल्ह्याला प्रथम क्रमांक मिळवून दिला, परंतु हे पुरस्कार घेतल्यानंतर या गावांनी पुन्हा तंटे सुरू करू नयेत, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. संजीव कुमार यांनी केले.

महात्मा गांधी तंटामुक्त अभियानांतर्गत 2010-11 या वर्षामध्ये निवडल्या गेलेल्या 336 गावांना पोलिस मुख्यालय मैदानावर गृहमंत्री आर. आर. पाटील यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात येणार होते. परंतु शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीमुळे लागू झालेल्या आचारसंहितेमुळे त्यांचा दौरा रद्द झाला. मात्र, यानिमित्त उपस्थित सर्व गावांचे सरपंच, पोलिस पाटील आणि ग्रामस्थांना मार्गदर्शन करण्यासाठी कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी जिल्हाधिकारी म्हणाले, अनेकवेळा पुरस्कारप्राप्त कामे होतात. परंतु नंतर ही कामे थांबतात. पुन्हा तंटे वाढवू न देण्याची जबाबदारी तंटामुक्ती पुरस्कारप्राप्त गावांची आहे. गावात तंटा निर्माण करण्याचे काम अनेकजण करतात. अनेकांना स्वत:च्या विकासापेक्षा इतरांचे नुकसान करण्यात जास्त रस असतो. ही मानसिकता सोडून तंटामुक्त अभियानाची मशाल अशीच तेवत ठेवा. एवढेच नाही तर या अभियानाचे रुपांतर परंपरा किंवा संस्कृतीमध्ये व्हायला हवे. तसे झाल्यास खर्‍या अर्थाने तंटामुक्त संस्कृती वाढीस लागेल. जिल्हा पोलिस अधीक्षक कृष्णप्रकाश म्हणाले, गेल्या तीन वर्षांत 98 गावे तंटामुक्त झाली होती. परंतु एकाच वर्षात 336 गावे तंटामुक्त होण्याच्या यंदाच्या विक्रमास हनुमान उडी संबोधता येईल. तंटे होणे ही निरंतर बाब आहे. इतिहासातही तंटे होते. आजही ते होतात आणि यापुढेही होत राहतील. ते थांबणार नाहीत. कारण तंटा हा मानवी स्वभावाचे एक प्रमुख अंग आहे. दोन व्यक्ती, कुटुंबे, गाव, राज्ये, देश, भाषा, जात आदींमध्ये नित्याने तंटे होत असतात. याचे कारण शोधण्याबरोबरच तंटे होऊ नयेत म्हणून प्रयत्न होणे गरजेचे आहे. दु:खाने ग्रासलेल्या लोकांच्या मनातील तंटे मिटविणे हा खरा तंटामुक्ती अभियानाचा हेतू आहे.