आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

तंटामुक्ती समितीला महिला कारभारणीचे वावडे

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
राहुरी - राज्यात गृहमंत्री आर. आर. पाटील यांच्या संकल्पनेतून महात्मा गांधी तंटा मुक्ती अभियानास सुरुवात झाली. तंटामुक्ती अभियानाचे आता हे सातवे वर्ष असून तंटामुक्ती यशस्वी करण्यासाठी गावोगावी तंटामुक्ती समितीची स्थापना करण्यात आली. मात्र, या समितीच्या अध्यक्षपदापासून महिलांना दूरच ठेवण्यात आले आहे. या समितीत महिला अध्यक्षांची संख्या शून्य आहे.

तंटामुक्ती अभियानात महिलांचा सहभाग 30 टक्के असावा, असे शासनाचे आदेश असताना महिला कारभारणीला अध्यक्षपदापासून दूरच ठेवण्यात आले आहे. गावचा पोलिस पाटील तंटामुक्त समितीचा पदसिद्ध सचिव असतो. त्यामुळे येथे ही संधी कमीच आहे. यामुळे महात्मा गांधी तंटामुक्ती अभियानात महिलांची उपस्थिती नगण्यच असते. जिल्हा प्रशासनाकडे जे प्रस्ताव प्राप्त झाले आहेत, त्यात एकाही समितीची अध्यक्ष महिला नसल्याचे आढळून आले आहे.

महात्मा गांधी तंटामुक्ती समितीच्या अध्यक्षपदावर पुरुषच वरचढ असून महिलांना ठेंगा दाखवण्यात आला आहे. काही ठिकाणी तंटा मुक्ती समितीच्या अध्यक्षपदावरूनच गावात तंटे उभे राहिल्याचे पहावयास मिळाले आहे. तंटामुक्तीचा अध्यक्ष हा गुन्हेगार प्रवृत्तीचा नसावा; अथवा त्यांच्यावर कोणता गुन्हा अथवा भ्रष्टाचाराचे आरोपदेखील नसावेत.

महात्मा गांधी तंटा मुक्तीचे अध्यक्षपद मिळवण्यासाठी बर्‍याच कसरती कराव्या लागत असल्याचे निदर्शनास आले आहे. महात्मा गांधी तंटामुक्ती अभियानासंदर्भात जिल्हा स्तरावर ठरावीक कालावधीसाठी बैठका व्हायला हव्यात. मात्र, या बैठका होण्यासाठी महसूल व ग्रह विभागास वेळच नाही. जिल्हा स्तरावरच बैठक झाली नाही, तर तालुका स्तरावर काय अन् प्रत्यक्ष गावात तर काय, यामुळे महात्मा गांधी तंटा मुक्त अभियानाला खीळ बसल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. तंटामुक्त गाव होण्याचे प्रमाण आता कमी व्हायला लागले आहे.
यामुळे या पुढील काळात महात्मा गांधी तंटा मुक्ती अभियानाची बासन स्तरावरील ही योजना व्यवस्थितरित्या सुरू राहण्याविषयी शंका आहे. संध्या तरी महात्मा गांधी तंटामुक्ती अभियानातील महिलांचा सहभाग कागदावरच आहे.