आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अधिवेशनकाळात शाळा बंदप्रकरणी संबंधित शिक्षकांवर कारवाई करा

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर- अधिवेशनकाळात शाळा बंद राहिल्याप्रकरणी संबंधित शिक्षक व गटशिक्षणाधिकार्‍यांवर कारवाई करण्याची मागणी जिल्हा परिषद शिक्षण समितीच्या सभेत करण्यात आली. कारवाईचा अहवाल 28 जानेवारीपर्यंत सादर करण्यास सांगण्यात आले.

जिल्हा परिषदेच्या शिक्षण समितीची सभा गुरुवारी जि. प. उपाध्यक्ष मोनिका राजळे यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी सदस्य संभाजी दहातोंडे, प्रवीण घुले, आझाद ठुबे, प्रतिभा पाचपुते आदी उपस्थित होते.

अधिवेशन कालावधीत शिक्षकांना अर्जीत रजा देण्यास सरकारने सहमती दर्शवली होती. तथापि, शाळा बंद राहणार नाही याची खबरदारी घेण्याची जबाबदारी संबंधित गटशिक्षणाधिकार्‍यांची होती. परंतु जिल्ह्यातील सुमारे 1 हजार 200 शाळा पहिल्या दिवशी व नंतर 428 शाळा बंद असल्याचे आढळून आले. याप्रकरणी संबंधित शिक्षकांवर कारवाई करण्याची मागणी होत होती. शिक्षण समितीच्या सभेत याबाबत चर्चा झाली. दहातोंडे म्हणाले, अधिवेशन काळात शाळा बंद राहिल्याप्रकरणी संबंधितांवर कारवाई करायला हवी. इतर काही सदस्यांनीही त्यास सहमती दर्शवली. कार्यवाही सुरू असल्याचे शिक्षणाधिकार्‍यांनी स्पष्ट केले. कारवाईचा अहवाल 28 पर्यंत सादर करण्याची मागणी सदस्यांनी केली. संबंधित गटशिक्षणाधिकार्‍यांना शिक्षण विभागाने नोटिसा बजावल्या आहेत, असे स्पष्ट करून सदस्यांच्या मागणीनुसार अहवाल देण्याची तयारी अधिकार्‍यांनी दर्शवली.