आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सहकार सभागृहाची अवहेलना थांबवा, नाट्य परिषदेकडून शिक्षक बँक पदाधिका-यांना चिमटे

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - प्राथमिक शिक्षक बँकेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत नेहमीप्रमाणे गोंधळ होऊन सहकार सभागृहातील खुर्च्यांचे नुकसान झाले. परिणामी सांस्कृतिक कार्यक्रमाला येणा-या प्रेक्षकांना त्याची झळ बसून शहरातील सांस्कृतिक चळवळ धोक्यात येत आहे, असे नमूद करत अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या जिल्हा शाखेने शिक्षक बँकेच्या पदाधिका-यांना चिमटे काढले आहेत.

सत्ताधा-यांवरील राग व्यक्त करताना, तसेच आपल्या मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी खुर्च्यांची मोडतोड करणे विरोधक शिक्षकांच्या दृष्टीने संयुक्तिक असले, तरी या घटनेमुळे सांस्कृतिक चळवळीची मोठी हानी होत आहे. सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी येणा-या प्रेक्षकांना शिक्षकांनी तोडलेल्या खुर्च्यांवर बसावे लागते. तुटक्या खुर्च्यांवर बसण्यापेक्षा कार्यक्रमांकडे पाठ फिरवणे प्रेक्षक पसंत करतात. गेल्या दहा-पंधरा वर्षांपासून शिक्षक बँकेची सर्वसाधारण सभा म्हणजे गोंधळ हे समीकरण बनले आहे. केवळ खुर्च्यांचेच नाही, तर सांस्कृतिक क्षेत्राचेही मोठे नुकसान होत असल्याची जाणीव कदाचित संबंधित शिक्षकांना नसावी. लक्ष वेधण्यासाठी व मागणी कोणत्या प्रकारे मांडावी हे शिक्षकांना सांगण्याइतपत आपण ज्ञानी नसल्याचे निवेदनात म्हटले आहे.

शिक्षक बँकेचे अध्यक्ष, संचालक मंडळ व सभसदांच्या नावे हे निवेदन देण्यात आले आहे. परिषदेचे अध्यक्ष सतीश लोटके, उपाध्यक्ष शैलेश मोडक, प्रमुख कार्यवाह प्रसाद बेडेकर, प्रसिद्धी प्रमुख अविनाश कराळे, रितेश साळुंके, पी. डी. कुलकर्णी, अमोल खोले, विशाल कडूसकर, यांनी हे निवेदन शिक्षक बँकेचे उपव्यवस्थापक दिलीप मुरदारे यांना दिले.