आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रतीक्षा यादीतील शिक्षकांच्या नियुक्त्या, आंतरजिल्हा बदलीची आशा पुन्हा धूसर

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - जिल्ह्यात रिक्त असलेल्या शिक्षकांच्या ३२५ जागांवर आंतरजिल्हा बदलीसाठी जिल्हा परिषदेने हिरवा कंदील दाखवला होता. तथापि, गुरुवारी अचानक २०१० पासून नियुक्तीच्या प्रतीक्षेत असलेल्या पात्र शिक्षकांना नियुक्ती देण्यात आली. जिल्ह्यातील रिक्त जागांवर बहुतेक पात्र उमेदवारांना संधी मिळणार असल्याने आंतरजिल्हा बदलीची आशा धूसर झाली आहे. "दिव्य मराठी'ने सर्वप्रथम हा विषय मांडून पाठपुरावा केल्यामुळे आंतरजिल्हा बदलीच्या नावाखाली घोडेबाजार करणाऱ्यांचा डाव उधळला गेला. अनेक नवोदित शिक्षकांनी ‘दिव्य मराठी’च्या कार्यालयात फोन करून धन्यवाद दिले.

शिक्षक पदासाठी २०१० मध्ये सरळसेवा भरतीमध्ये पात्र होऊनही रिक्त जागांसह इतर तांत्रिक अडचणींमुळे उमेदवारांना नियुक्त्या देता आल्या नव्हत्या. लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेपूर्वीपासून जागा रिक्त असल्याने या जागा आंतरजिल्हा बदलीने भराव्यात, असा आग्रह काही संघटनांनी धरला होता. तथापि, या बदल्यांमध्ये घोडेबाजार होण्याची शक्यता असल्याचे १२ ऑगस्ट २०१४ रोजी "दिव्य मराठी'ने उजेडात आणले. या जागा प्रतीक्षेत असलेल्या उमेदवारांना नियुक्ती देऊन भराव्यात याचाही पाठपुरावा केला. सदस्य संभाजी दहातोंडे यांनीही ऑगस्ट २०१४ मध्ये आंतरजिल्हा बदलीसाठी मोठे टेंडर होण्याचा गौप्यस्फोट केला होता. रिक्त जागांवर प्रतीक्षेत असलेल्या उमेदवारांना संधी देण्याची मागणी संभाजी ब्रिगेड संघटनेने केली होती. त्यानुसार प्रतीक्षेत असलेल्या शिक्षकांच्या लढ्याला माध्यमांच्या, तसेच संघटनांच्या पाठबळामुळे यश येऊन गुरुवारी या पात्र उमेदवारांना नियुक्त्या देण्यात आल्या आहेत. जिल्ह्यात सध्या ३२५ शिक्षकांच्या जागा रिक्त असल्याने, अनेक ठिकाणी तीन वर्गांवर एकच शिक्षक अशी परिस्थिती आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

या जागा आंतरजिल्हा बदलीने भरण्यास जिल्हा परिषदेने दोन दिवसांपूर्वी सहमती दर्शवली होती. त्यामुळे अनेक वर्षांपासून नगर जिल्ह्यातील जे शिक्षक इतर जिल्ह्यात कार्यरत आहेत, त्यांना नगर जिल्ह्यात संधी मिळण्याची आशा निर्माण झाली. परंतु शिक्षण विभागाने ऐनवेळी प्रतीक्षेत असलेल्या उमेदवारांना नियुक्त्या दिल्याने आंतरजिल्हा बदलीच्या आशा धुसर झाल्या आहेत. त्यामुळे आंतरजिल्हा बदलीच्या प्रतिक्षेत असलेल्या शिक्षकांमध्ये अन्यायाची भावना आहे.

त्या नेत्यांचा पराभव
- ज्या नेत्यांनी पाच वर्षांपासून प्रतीक्षेत असलेल्या उमेदवारांना डावलून आंतरजिल्हा बदलीचा घाट घातला, त्यांचा पराभव झाला. प्रतीक्षा यादीतील पात्र उमेदवारांना संधी मिळाली. "दिव्य मराठी'ने मांडलेला विषय विद्यार्थ्यांना घेऊन केलेले आंदोलन याला यश मिळाल्याचा आनंद आहे.'' राजेशपरकाळे, जिल्हाध्यक्ष,संभाजी ब्रिगेड.

"दिव्य मराठी'ला धन्यवाद
- आम्हीपात्र ठरूनही आम्हाला नियुक्त्या मिळत नव्हत्या. "दिव्य मराठी' ने हा विषय मांडला. संभाजी ब्रिगेडने केलेल्या आंदोलनाला यश आले. प्रसारमाध्यमांच्या जोरावर आमचा लढा यशस्वी झाला. मला नगर जिल्ह्यातच नियुक्ती मिळाली. त्याबद्दल "दिव्य मराठी'ला धन्यवाद.'' रुपालीपळसकर, शिक्षिका,पारनेर.