आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिक्षक बँकेच्या तोफा धडाडल्या, फोडाफोडीचे राजकारण तापले

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - प्राथमिक शिक्षक बँक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गुरुजींनी राजकीय गणितांची जुळवाजुळव करून रविवारी मेळावे घेऊन प्रचाराची तोफ डागली. गुरुकुल बहुजन मंडळाची युती झाली असतानाच स्वबळावर रिंगणात उतरलेल्या गुरुमाउली मंडळाने समांतर गुरुकुलला बरोबर घेऊन धक्का दिला.
शिक्षक बँकेची निवडणूक २८ फेब्रुवारीला होणार २९ ला मतमोजणी होणार आहे. विरोधकांनी मागील पाच वर्षे सत्ताधाऱ्यांच्या कारभाराचे वाभाडे काढले. सत्ताधाऱ्यांना विरोध करणारी काही मंडळे समविचारी म्हणून सत्ताधाऱ्यांबरोबर गेली, तर ज्यांनी गुरुकुल गुरुमाउलीसह सर्वच मंडळांवर टीका केली अशांनी गुरुकुलबरोबर युती केली. अशा परिस्थितीत सामान्य सभासद संभ्रमात आहे. रविवारी गुरुकुल बहुजन मंडळ युतीने ओम गार्डनमध्ये शिक्षक मेळावा घेतला. यावेळी शिक्षक नेते संजय कळमकर, रा. या. आैटी, संजय धामणे, नितीन काकडे, भागवत लेंडे, एकनाथ व्यवहारे, आबा लोंढे आदी उपस्थित होते. सभागृहात शिक्षकांची मोठी गर्दी होती, पण काही मंडळींचा सभागृहाबाहेरच गप्पांचा फड रंगला होता. कळमकर म्हणाले, आपला शर्ट जास्त स्वच्छ आहे, असे म्हटल्यानंतर लोक त्यावर लगेच डाग शोधायला सुरुवात करतात. राजकारणात सदिच्छाला संपवावे वाटत नाही, पण नको त्या मंडळींकडे सदिच्छा आहे, असे ते म्हणाले. गुरुमाउलीच्या मेळाव्यात समांतर गुरुकुलच्या एका गटाने हातमिळवणी केली.
गुरुमाउलीच्या मेळाव्यात कार्यकर्त्यांनी गुरुकुल सदिच्छा मंडळावर टीका केली. कळमकरांच्या बँकेच्या कार्यकाळातील बजाज अलायन्स प्रकरण त्यांनी लावून धरले. स्वच्छ चारित्र्याचा अजेंडा पुढे करून गुरुमाउलीचा विजय होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला. यावेळी रावसाहेब रोहोकले, संजय शेळके, बापू तांबे, तुकाराम अडसूळ आदी उपस्थित होते. या निवडणुकीत तिरंगी लढत रंगण्याची चिन्हे आहेत.

हा नेता पाप करणार...
गुरु माउलीच्या नेत्याला निवृत्तीसाठी तीन वर्षे उरली आहेत. अध्यक्षपद मिळावे अशी त्यांची इच्छा आहे. त्यामुळे त्यांच्यातल्या उरलेल्या मंडळींना आनंद आहे. पण जाताना हा नेता शिक्षकांची मने दुभंगून जाणार असेल, तर हे पाप आहे, अशी टीका गुरुकुलच्या मेळाव्यात संजय कळमकर यांनी केली.

"समांतर'मध्ये फूट, "ऐक्य' गेले "सदिच्छा'बरोबर
गुरुकुल मंडळातून बाहेर पडलेेल्या समांतर गुरुकुल मंडळाने ऐक्य मंडळाबरोबर युती केली. पण समांतरमध्येही फूट पडल्याने समांतर मंडळातील एक गट गुरुमाऊली मंडळीबरोबर गेला, तर ऐक्य मंडळ पुन्हा सुपा ऐक्याने घरोबा केलेल्या सदिच्छा मंडळाबरोबर गेले.