आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिक्षक बँक बनली नेत्यांचे चराऊ कुरण

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - जिल्हा प्राथमिक शिक्षक सहकारी बँक ही जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षकांची कामधेनू आहे. शिक्षक सभासदांच्या प्रापंचिक अडचणीत बँकेने मोठा आधार दिला. सभासदांनी मोठ्या विश्वासाने परिवर्तन घडवून सदिच्छा मंडळाच्या हाती सत्ता सोपवली. पण सत्ताधार्‍यांनी तीन शाखांच्या लॉकर खरेदीसाठी विरोध करूनही त्यावर खर्च दाखवला आहे. यासह इतर व्यवहार संशयास्पद असून कोणतेही काम झाले नसताना केवळ कमिशनपोटी ठेकेदाराला ५५ टक्के रक्कम घाईत देण्यात आली, असा आरोप सत्ताधारी मंडळातील संचालक गोकुळ कळमकर यांनी सोमवारी केला.

साडेचार वर्षांपूर्वी मागील सत्ताधार्‍यांनी केलेल्या चुकीच्या कारभारामुळे सभासदांनी सदिच्छा मंडळाकडे सत्ता दिली. सुरुवातीचे दोन वर्षे मागील बिघडलेली घडी बसवत असताना त्यांनी पारदर्शी काटकसरीचा कारभार करत बँक सुस्थितीत आणली. बँकेत सतत होणारे वादग्रस्त विषय, कर्मचार्‍यांना दिला जाणारा जादा मेहनताना, रजेचा पगार, सर्वसाधारण सभेचे खाऊवाटप, छपाई आदी विषय कायमस्वरुपी बंद करून नवा पायंडा पाडण्यात आला. बँकेला आर्थिक शिस्त लावत असतानाच ठेवीत वाढ झाली. शंभर टक्क्यांवर गेलेला सीडी रेशो ७० टक्क्यांवर आणला. परंतु नंतर आपल्या मर्जीतील पदाधिकारी निवडून स्वार्थी नेत्यांनी आपले रंग दाखवण्यास सुरुवात केली.

संचालक मंडळाने कोअर बँक प्रणालीसाठी प्रस्तावित केलेला दीड कोटीचा खर्च संचालकांना अंधारात ठेवून पावणेदोन कोटींवर नेण्यामागे मास्टर माईंड कोण आहे, याची चर्चा सुरू आहे. दोन वर्षे होऊनही कोअर बँक प्रणालीचे कामकाज सुरळीत होऊ शकलेले नाही. आता पुन्हा शेवगाव, राहुरी कोपरगाव या तीन शाखांमध्ये चार बाय चार फूट आकाराच्या स्ट्राँगरुमसाठी प्रत्येकी साडेआठ लाखाप्रमाणे २६ लाख खर्च करण्यात आला. मुख्यालयाच्या दुरुस्तीसाठी सुरुवातीला ४९ लाख खर्चाचा प्रस्ताव ठेवण्यात आला, परंतु त्याला प्रखर विरोध केल्याने फेरप्रस्ताव १३ लाखांवर आला. हे काम निकृष्ट सुरू असतानाच पुन्हा तीन शाखांच्या लॉकर्स खरेदीसाठी ८२ लाख खर्चाला अंतर्गत विरोध झाल्यानंतर ७६ लाख ५३ हजार खर्च दाखवण्यात आला.

कोणतेही काम होता कमिशनसाठी ठेकेदाराला ५५ टक्के रक्कम घाईत देण्यात आली. या अनागोंदी कारभाराबाबत निवृत्त शिक्षकनेते मूग गिळून गप्प आहेत. या प्रकारामुळे सदिच्छाच्या प्रामाणिक कार्यकर्त्यांमध्ये नाराजी असल्याचे कळमकर यांचे म्हणणे आहे. त्यांनी सत्ताधार्‍यांच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित करून घरचा आहेर दिल्याने बँकेच्या आगामी निवडणुकीत राजकीय गणिते बदलण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.

संचालकांमध्ये अस्वस्थता वाढली
शिक्षकबँकेच्या सभासदांच्या हिताचे देणे-घेणे नसलेल्या संचालकांचा एक कंपू तयार झाला आहे. बहुमताच्या जोरावर निर्णय राबवले जात आहेत. सभासद हितासाठी विरोध करणार्‍या संचालकांना निर्णय प्रक्रियेतून बाजूला टाकले जाते. त्यामुळे संचालकांमध्ये अस्वस्थता पसरल्याचा आरोपही गोकुळ कळमकर यांनी केला.

भूमिकाच संशयास्पद
आतापर्यंत सर्व विषय सभासदहिताचे होते, म्हणूनच बहुमताने मंजूर झाले. लॉकरपूर्वी स्ट्राँगरुम आवश्यक असून त्याचे काम पूर्ण झाले आहे. उत्पन्नाच्या बाजूचा विचार करून आम्ही लॉकर्ससाठी ऑर्डर दिली. एखादा संचालक विरोधात बोलत असेल, तर ते संशयास्पद आहे. त्यांनी ठामपणे समोरासमोर बोलून आरोप सिद्ध करावेत.'' - राजेंद्र सद्गीर, उपाध्यक्ष