आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जातवैधता दिल्याने शिक्षकांना नोटिसा, सात दिवसांची मुदत संपली

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - जिल्हापरिषदेच्या शाळांमधील सुमारे साडेतीनशे शिक्षकांनी जातवैधता प्रमाणपत्र सादर केले नसल्याचे उघड झाले आहे. याप्रकरणी संबंधितांना दोन आठवड्यांपूर्वी कारणे दाखवा नोटिसा बजावण्यात आल्या होत्या. कोणताही खुलासा देणाऱ्या सुमारे १८७ शिक्षकांना अंतिम नोटिसा बजावून बडतर्फीची कारवाई करण्याची तयारी जिल्हा परिषद प्रशासनाने केली आहे.
शासकीय आणि निमशासकीय सेवेते जिल्हाभरात लाखभर कर्मचारी आहेत. ३१ जुलै २०१३ पर्यंत जात पडताळणी प्रमाणपत्र सादर करण्याचे निर्देश राज्य सरकारने दिले होते. अनेक शिक्षकांनी शासनाच्या या आदेशाला केराची टोपली दाखवत त्याकडे दुर्लक्ष केले. ‘दिव्य मराठी’ने याबाबत सर्वप्रथम ११ जुलै नंतर २३ जुलैला वृत्त प्रकाशित केले. त्यानंतर मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र बिनवडे यांच्या आदेशानुसार जिल्हा शिक्षणाधिकारी अशोक कडूस यांनी सुमारे साडेतीनशे शिक्षकांना नोटिसा बजावल्या. सहा महिन्यांत प्रमाणपत्र सादर केले नाही, तर संबंधितांची सेवा संपुष्टात आणण्याचीही कारवाई होऊ शकते, असे त्यात म्हटले होते. मागील नोटिशीत सात दिवसांत याबाबत खुलासेही मागवण्यात आले होते. परंतु अनेक शिक्षकांनी या आदेशाला केराची टोपली दाखवत नोटिशीकडे दुर्लक्ष केले. त्यामुळे प्रशासनाने पुढील कारवाईची तयारी सुरू केली आहे.
संबंधित शिक्षकांची संख्या १८७ असल्याचे प्रशासनाचे म्हणणे आहे. त्यानुसार अंतिम नोटिसा बजावून संबंधितांवर कारवाई करण्यात येणार आहे. जे शिक्षक खुल्या प्रवर्गातून निवडले गेले आहेत, अशा शिक्षकांना या यादीतून वगळण्याची शक्यता असल्याचे प्रशासकीय सूत्रांनी सांगितले. परंतु मुदत संपूनही अंतिम नोटिसा काढण्याकडे दुर्लक्ष होत असल्याने प्रशासनाच्या कारभाराबाबतही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. शिक्षण विभागाव्यतिरिक्त इतर विभागांतील अनेक कर्मचाऱ्यांनी नियम डावलून जातवैधता प्रमाणपत्र सादर केलेले नाही. आतापर्यंत केवळ सव्वाशे कर्मचाऱ्यांना नोटिसा बजावण्याची कार्यवाही सामान्य प्रशासनाने केली. इतर विभाग मात्र अजूनही यासंदर्भात उदासीन आहे. बिनवडे यांनी सर्वच विभागांतील माहिती मागवून अशा कर्मचाऱ्यांना नोटिसा बजावणार असल्याचे सांगितले होते. परंतु, त्याची प्रभावी अंमलबजावणी होताना दिसून येत नाही.
...तर बडतर्फ होणार
ज्या शिक्षकांनी नोकरीत रुजू होऊनही जातवैधता प्रमाणपत्र सादर केलेले नाही, अशा शिक्षकांना अंतिम नोटिशीद्वारे एक संधी देण्यात आली आहे. समाधानकारक खुलासा आला नाही, तर कारवाई केली जाईल.
तत्काळ कारवाई करू
^यापूर्वी पाठवलेल्या नोटिसांना ज्या शिक्षकांनी उत्तर दिलेले नाही, अशा शिक्षकांना अंतिम नोटिसा बजावण्यात येणार आहेत. त्यानुसार पुढील कार्यवाही केली जाईल. अशोक कडूस, जिल्हा शिक्षणाधिकारी.
बातम्या आणखी आहेत...