आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

‘माध्यमिक शिक्षक’ची सभा वादळी ठरणार; अवाजवी खर्चावरून विरोधक आक्रमक, 14 टक्के लाभांश

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - जिल्हा माध्यमिक शिक्षक सोसायटीची 71वी वार्षिक सभा रविवारी (29 जून) सहकार सभागृहात होत आहे. मागील सभेत आॅडिट खर्चावरून गोंधळ झाला होता. तोच धागा पकडून अवाजवी खर्चाच्या मुद्द्यावर ही सभा वादळी ठरण्याची शक्यता आहे. सत्ताधार्‍यांना धारेवर धरण्यासाठी विरोधी गटाकडून जोरदार मोर्चेबांधणी करण्यात आली आहे.

मागील सभेत सभासद भीमराज खोसे यांनी आॅडिट फीचा मुद्दा उपस्थित करत आॅडिटरच मॅनेज केल्याचा आरोप केला होता. त्यामुळे सभेत प्रचंड गोंधळ होऊन काही सभासद व्यासपीठाकडे धावले होते. खोसे यांनी संचालक मंडळाला उत्तर मागितले असता सत्ताधारी मंडळाला मानणार्‍या सभासदांकडून खोसे यांना विरोध झाला. विरोधकांनी त्यांना बोलू द्या, असा आग्रह धरला. काहींनी शिट्या वाजवत गोंधळात आणखी भर घालण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी संचालक भाऊसाहेब कचरे यांनी तांत्रिक बाबींवर प्रकाश टाकत सध्याचे नियोजन योग्य असल्याचे पटवून देण्याचा प्रयत्न केला होता.

रविवारी होणार्‍या सभेलाही मागील सभेतील मुद्द्यांची जोड असणार आहे. सत्ताधार्‍यांचा प्रयत्न सभा खेळीमेळीत पार पाडण्याचा आहे. बँकेच्या अहवालावर पाल्यांचा सत्कार करताना सुमन शिंदे यांचे छायाचित्र आहे, पण त्या शिक्षण उपसंचालक असल्याचे पद त्यावर नमूद केलेले नाही. दिवंगत केंद्रीय ग्रामविकासमंत्री गोपीनाथ मुंडे यांचे नाव श्रद्धांजलीत येणे अपेक्षित होते, पण त्याचा विसर संचालक मंडळाला पडल्याचे विरोधी गटाचे म्हणणे आहे. त्याबरोबरच कर्जावरील व्याजदरात कपात करून ठेवीवरील व्याजदर वाढवावे ही जुनीच मागणी या सभेतही केली जाणार आहे.

बँकेच्या कारभारावर टीका करून अवाजवी खर्चावर बोट ठेवून सत्ताधार्‍यांना धारेवर धरण्याची रणनिती आखली जात आहे. अशा परिस्थितीत सभा सुरळीत पार पाडण्यासाठी सत्ताधारी मंडळानेही नियोजन आखले आहे. विद्यमान संचालक मंडळाला मुदतवाढ देण्यात आल्याने निवडणूक लांबणीवर पडली आहेत. नोव्हेंबरअखेर निवडणूक जाहीर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे सत्ताधारी मंडळाची ही शेवटची सभा ठरू शकते.
सभासदांना दिलासा
बँक कॅशक्रेडिट कर्जावरील व्याजदरापेक्षा एक टक्का कमी दराने सभासदांना कर्जवाटप करण्यात आले आहे. ठेवीवरील व्याज देण्यासाठी तरतूद करून 14 लाभांश वाटपाची शिफारस करण्यात आली. ठेवींत मागील वर्षीच्या तुलनेत 18 कोटी 43 लाख 55 हजार 586 रुपयांची वाढ झाली आहे. तसेच 2013-2014 वर्षात 8 कोटी 12 लाख 81 हजार 889 रुपयांचा नफा झाला आहे. त्यात रिझर्व्ह फंड व संशयित बुडीत फंड वजा जाता 6 कोटी 9 लाख 27 हजार रुपयांचा लाभांश आहे.
सत्ताधार्‍यांना जाब विचारणार
संचालक मंडळाने अनागोंदी कारभार चालवला आहे. अवाजवी खर्च सभासदांच्या माथी लादण्यात येत आहे. पाच लाखांत आॅडिट करणे शक्य असताना 35 लाख खर्च करण्यात आले. सभेत महिला सभासदांचा सहभाग वाढवण्यासाठी त्यांना बैठकभत्ता देण्याची आमची मागणी आहे. अवाजवी खर्च व अनागोंदी कारभाराचा जाब सत्ताधार्‍यांना विचारणार आहोत.’’
- अप्पासाहेब शिंदे, शिक्षक, विरोधी गट.