आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

शिक्षकांच्या पडताळणी अभावी रोस्टर रखडले, संबंधितांवर कारवाई होण्याची शक्यता

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - शिक्षकांची पदोन्नती प्रक्रिया शिक्षकांची पदोन्नती प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी बिंदुनामावली (रोस्टर) आठवड्याभरापूर्वीच तपासणीसाठी पाठवण्यात येणार होती. परंतु अजूनही काही उपाध्यापक मुख्याध्यापकांनी जात पडताळणी प्रमाणपत्र सादर केलेेले नाही. त्यामुळे बिंदुनामावली तपासणीसाठी पाठवता आलेली नाही. त्यामुळे पदोन्नतीला आणखी विलंब होण्याची चिन्हे आहेत.
जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागातील पदोन्नत्या रखडल्या आहेत. आंतरजिल्हा बदलीची प्रकरणेही प्रलंबित आहे. यासंदर्भात नुकत्याच झालेल्या सर्वसाधारण सभेत शिक्षण विभागाला सभागृहातील सदस्य पदाधिकाऱ्यांनी प्रशासनाला धारेवर धरले. पदोन्नत्या का केल्या नाहीत, असा प्रश्नही उपस्थित झाला. त्यावर संच निश्चितीला झालेला विलंब आयुक्त स्तरावरून काढण्यात आलेल्या त्रुटी यामुळे बिंदुनामावली मंजूर नसल्याचे सांगण्यात आले. पदोन्नतीसाठी बिंदुनामावली तपासून येणे गरजेचे आहे. त्यासाठी मागील सोमवारपर्यंत बिंदुनामावली तपासणीसाठी पाठवण्यात येईल, असा दावा प्रशासनाकडून करण्यात आला होता.
अजूनही दहा-बारा तालुक्यांतील शिक्षक मुख्याध्यापकांनी जातपडताळणी प्रमाणपत्रे सादर केलेली नाहीत. त्यामुळे बिंदुनामावली तपासणीसाठी पाठवता आली नाही. या गंभीर प्रकाराकडे शिक्षण विभागही गांभीर्याने पहात आहे. जातपडताळणी देणाऱ्या शिक्षकांसह तालुकास्तरावरील आस्थापना कर्मचारीही अडचणीत येण्याची शक्यता अाहे. परंतु प्रशासन या प्रकाराकडे आतापर्यंत का डोळेझाक करत होते, हादेखील प्रश्न यानिमित्ताने उपस्थित झाला आहे.
राज्य सरकारने शासकीय सेवेत दाखल होतानाच जात पडताळणी समित्यांकडील प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक केले. कायदा होण्यापूर्वी ज्यांनी आरक्षित जागेवर नोकऱ्या मिळवल्या आहेत किंवा ज्यांना वेळोवेळी पदोन्नत्ती मिळाली आहे, त्यांच्याही जातीच्या दाखल्यांची पडताळणी करण्याचा नियम आहे. पण अजूनही ज्या शिक्षकांनी जात पडताळणी प्रमाणपत्र सादर केले नाही. ते शिक्षक रडारवर असून त्यांच्यावर कारवाई होण्याची शक्यता आहे. जात पडताळणी सादर केली, तरच बिंदुनामावली तपासणीसाठी पाठवता येईल; अन्यथा पदोन्नत्या आणखी काही दिवस लांबणीवर पडणार आहेत. सध्या याचीच चर्चा जिल्हा परिषदेच्या शिक्षकांच्या वर्तुळात सुरू आहे.
आंतरजिल्हा बदल्यांना होणार आता विलंब
जिल्ह्यातील आंतरजिल्हा बदली प्रक्रिया रखडली आहे. पदोन्नती केल्यानंतरच या बदल्यांना वाट मोकळी होईल. परंतु बिंदुनामावलीच तपासून आली नसल्याने पदोन्नतीसह रिक्त जागांवरील बदली प्रक्रियादेखील लांबणीवर पडली आहे.
आतापर्यंत अवघ्या दोन तालुक्यांची माहिती
जिल्हास्तरावर संबंधित गटशिक्षणाधिकाऱ्यांकडून बिंदुनामावलीसाठी जात पडताळणीचीही माहिती मागवण्यात आली आहे. परंतु आतापर्यंत केवळ श्रीरामपूर कोपरगाव तालुक्यातील माहिती उपलब्ध झाली. अजूनही उर्वरित बारा तालुक्यांचे तळ्यात-मळ्यात सुरू आहे.
बातम्या आणखी आहेत...