आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्राथमिक शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदलीच्या अडचणींमध्ये पडली भर

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - मूळच्या नगर जिल्ह्यातील, पण इतर जिल्ह्यांत शिक्षक म्हणून कार्यरत असलेल्या २०७ शिक्षकांना आंतरजिल्हा बदलीसाठी जिल्हा परिषदेने महिनाभरापूर्वी ना-हरकत दिली. परंतु शिक्षण संचालकांचे नवीन पत्र आल्याने बदल्या करायच्या किंवा नाही याबाबत संभ्रम निर्माण झाला आहे. यासंदर्भात शिक्षण विभागाने शासनाकडे मार्गदर्शन मागवले आहे.

जिल्ह्याचे अनेक भूमिपुत्र इतर जिल्हा परिषदांतर्गत शाळांमध्ये शिक्षक म्हणून कार्यरत आहेत. अशा सुमारे दीड हजारांवर शिक्षकांनी नगर जिल्ह्यात आंतरजिल्हा बदली मिळावी, यासाठी अर्ज केले आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून या बदल्या होऊ शकल्याने शिक्षकवर्गात नाराजी आहे. महिनाभरापूर्वी जिल्हा परिषदेने २०७ शिक्षकांना बदलीसाठी ना-हरकत देण्याचा निर्णय घेतला. त्याबरोबरच सीईटीधारक नवीन शिक्षकांनाही नियुक्ती देण्याची प्रक्रियादेखील हाती घेण्यात आली. पण आंतरजिल्हा बदलीसह नवीन सीईटीधारक अशा सुमारे साडेपाचशे जणांना िनयुक्ती देण्याएवजी परिस्थिती ‘जैसे थे’ ठेवण्याच्या सूचना शिक्षण संचालकांनी दिल्या आहेत. त्यामुळे आंतरजिल्हा बदलीचा विषय पुन्हा लांबणीवर पडण्याची चिन्हे आहेत. संभ्रमात असलेल्या शिक्षण विभागाने यासंदर्भात शासनाकडे मार्गदर्शन मागवले आहे. बीड जिल्ह्यात शिक्षकांना आंतरजिल्हा बदलीने सामावून घेतल्यानंतर निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे पूर्ण प्रक्रिया रद्द करण्याचा आदेश शासनाने दिले होते. तशीच स्थिती नगर जिल्ह्यात निर्माण होण्याची भीती शिक्षकांमध्ये आहे.

मार्गदर्शना नंतरच निर्णय
न्यायालयीन प्रक्रिया लक्षात घेऊन शिक्षण संचालनालयाने याप्रकरणी जैसे थे परिस्थिती ठेवण्याचे पत्र दिले आहे. आता न्यायालयाची सुनावणी पूर्ण होऊन निकाल लागल्याने शासनाकडून मार्गदर्शन मागवण्यात येईल. यासंदर्भात सूचना आल्यानंतरच निर्णय घेतला जाईल.'' अशोक कडूस, जिल्हा शिक्षणाधिकारी, नगर.