आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिक्षकांच्या बदल्यांमध्ये जि. प. अध्यक्षांचा हस्तक्षेप

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - जिल्हापरिषदेतील बदली प्रक्रियेत जिल्हा परिषद अध्यक्षांनी हस्तक्षेप करू नये. बदल्या जरी ऑनलाइन दाखवल्या जात असल्या, तरी अनेक गोष्टी ऑफलाइनच होतात, असा आरोप राज्याचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे यांनी करून बदल्यांच्या पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.
जिल्हा परिषदेच्या आदर्श शिक्षक पुरस्कारांचे वितरण शुक्रवारी हुंडेकरी लॉन येथे झाले. याप्रसंगी विखे बोलत होते. यावेळी पालकमंत्री राम शिंदे, जि. प. अध्यक्ष मंजूषा गुंड, उपाध्यक्ष अण्णासाहेब शेलार, सभापती शरद नवले, मीरा चकोर, बाबासाहेब दिघे, मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र बिनवडे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अशोक कोल्हे, जिल्हा शिक्षणाधिकारी अशोक कडूस आदी उपस्थित होते.

विखे म्हणाले, बदल्यांसाठी शिक्षक मागे लागतात. सोयीच्या ठिकाणी बदली मिळावी, यासाठी शिक्षक प्रयत्न करतात. नेमकी चूक कुठे होते तेच माहीत नाही, पण या बदली प्रक्रियेत जि. प. अध्यक्षांनी हस्तक्षेप करू नये, असा टोला त्यांनी लगावला. ते असे म्हणताच व्यासपीठावरूनच अध्यक्ष गुंड यांनी बदल्या ऑनलाइन होत असल्याचे स्पष्ट केले. त्यावर विखे यांनी अध्यक्षांना, ‘तुम्ही नवीन आहात. तुम्हाला माहीत नसेल, पण बऱ्याच गोष्टी ऑफलाइन होत असतात,’ असे सांगून बदली प्रक्रियेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले.

हाच धागा पकडून मंत्री शिंदे म्हणाले, यापूर्वी मी जिल्हा परिषद उपाध्यक्षांचे भाषण ऐकले आहे. आताही एेकले, पण त्यात आता बदल झाल्याचे जाणवले. त्यानंतर मला ऑनलाइन ऑफलाइनचा संदर्भ लागला. बदल्यासंदर्भात मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांवर दबाव आणला जातो. देशात शिक्षकांचे महत्त्वाचे स्थान आहे, पण उपाध्यक्षांवरही शिक्षकांचा किती दबाव आहे, हे मला त्यांच्या भाषणातून जाणवले. बँकेतील गोंधळाचा प्रकार मला अावडला नाही. कर्तृत्व संपते, तेव्हा आपण मनगटी बळ दाखवतो. शिक्षकांनी तर्कशुद्धपणे मुद्दे मांडून सभेत विषय मांडले पाहिजे. शिक्षकांमध्ये भांडणे झाली, तर त्याला बातमीमूल्य प्राप्त होते, असेही त्यांनी सांगितले.

पुढच्या वर्षी मी नसलो, तरी विरोधी पक्षनेते पालकमंत्री तुम्ही दोघेही असणार आहेत. कारण आमच्या निवडणुका लवकरच होणार आहेत. शिक्षकांचा दबाव राजकीय क्षेत्रात उभे राहिल्यापासूनच आहे. जिल्हा परिषदेचे अधिकार कमी करण्यात आले. बंद केलेल्या योजना सुरू करण्यासाठी तुम्ही प्रयत्न करावा, असेही शेलार म्हणाले.
सायकलींसाठी ३० लाख देणार
जिल्हा परिषदेकडून सातत्याने शाळांच्या संरक्षक भिंती, तसेच विद्यार्थ्यांसाठी सायकलींना निधीची मागणी करण्यात आली. त्यानुसार जिल्हा नियोजनच्या निधीतून ३० लाख रुपये दिले जातील, अशी घोषणा पालकमंत्री राम शिंदे यांनी केली.

जुगलबंदी रंगली
जिल्हापरिषदेचे उपाध्यक्ष शेलार यांनी पुढच्या वर्षी मी या कार्यक्रमाला नसेन, असे सांगितले. त्यावर विखे हळू आवाजात म्हणाले, शेलार पुढच्यावेळी अध्यक्ष होतील. चाणाक्ष अध्यक्ष गुंड यांनी हे ऐकून लगेचच पुढील अध्यक्षपद महिलांसाठी राखीव आहे, असे सांगितल्याचा खुलासा मंत्री शिंदे यांनी भाषणात केला. शेलारांनी जि. प.चे अधिकार कमी केल्याचा मुद्दा मांडला. त्यावर शिंदे यांनी याची मुळे विखे सत्तेत असतानाच रुजल्याचे स्पष्ट केले.

दोन मोर्चे नकोत...
^कोपर्डी येथे घडलेली घटना दुर्दैवी अाहे. सध्या मोर्चे काढले जात आहेत. मोर्चा काढण्याचा अधिकार असला, तरी कायदा सुव्यवस्थेचा विचार करून एकाच दिवशी दोन मोर्चे काढू नये. मोर्चाच्या दिवसांमध्ये बदल करावा.’’ राम शिंदे, पालकमंत्री.

या शिक्षकांना पुरस्कार प्रदान
संजय कुमारनवले, रमेश पावडे, सोमनाथ मंडाळकर, गोरक्षनाथ कर्डिले, शकील बागवान, साळभाऊ नरवडे, अशोक पंडित, रामभाऊ गवळी, कैलास कासार, विकास बगाडे, शोभा क्षीरसागर, बाळासाहेब अनपट, अलका भालेकर, लता गवळी, अमितादेवी पाटील, लतिफ हकीम, विश्वनाथ चौधरी.
बातम्या आणखी आहेत...