नगर -
आपसी आंतरजिल्हा बदली प्रक्रियेत इतर जिल्ह्यांतून नगर जिल्ह्यात बदलून आलेले १३ शिक्षक हजर झाल्याने त्यांच्यावर दोन दिवसांपूर्वी निलंबनाची कारवाई करण्यात आली. परंतु आदेश बजावण्यापूर्वी जर ते हजर झाले, तर त्यांच्यावरील निलंबन टळू शकते, अशी माहिती प्रशासकीय सूत्रांनी दिली.
जिल्ह्यात येण्यासाठी दीड हजारांवर शिक्षकांनी आंतरजिल्हा बदलीसाठी प्रस्ताव पाठवले, पण बदल्यांना मुहूर्तच लागला नाही. जिल्हा परिषदेने २०७ शिक्षकांना ना-हरकत प्रमाणपत्र दिले. पण प्रशासकीय नियमांच्या चौकटीत त्यांना नियुक्ती मिळालेली नाही. या पार्श्वभूमीवर आपसी बदल्यांचा पर्याय काही शिक्षकांनी निवडला. शिक्षण विभागाने जून ते जुलैदरम्यान सुमारे ३५ ते ४० आपसी आंतरजिल्हा बदल्यांना मंजुरी दिली. नियुक्तीची ठिकाणेही निश्चित करण्यात आली. पण काही शिक्षकांना अधिक सोयीच्या ठिकाणी जाण्याचा मोह झाला. यासाठी पदाधिकाऱ्यांना साकडे घालून अंशत: बदलासाठीचे अर्जही त्यांनी शिक्षण विभागाकडे केले. या अर्जांनुसार सोयीचे ठिकाण मिळेल, या आशेने १३ शिक्षक हजर झाले नाहीत. त्यामुळे शिक्षण विभागाने मागील आठवड्यात मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे निलंबनाच्या कारवाईचा प्रस्ताव पाठवला. दोन दिवसांपूर्वी बिनवडे यांनी निर्णय घेत कारवाई केली. या शिक्षकांची नावेही जाहीर झाली. पण संबंधितांना शिक्षण विभागाने हे आदेश बजावलेले नाहीत. हे शिक्षक कारवाईच्या भीतीने नियुक्तीच्या ठिकाणी हजर झाले, तर निलंबन मागे घेण्याची तयारी प्रशासनाने सुरू केली आहे.
निलंबनाचा आदेश बजावला जाऊ नये, यासाठी घोडेबाजार भरवण्याची तयारी झाल्याची चर्चा आहे. घोडेबाजार काहीही असला, तरी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी आदेश मागे घेतले, तर चुकीचा संदेश जाईल, असे जाणकारांचे म्हणणे आहे.
शिक्षक हजर व्हावेत
^शिक्षक नियुक्तीच्या ठिकाणी हजर झाल्याबद्दल निलंबनाचे आदेश वरिष्ठ अधिकाऱ्यांनी काढले अाहेत. संबंधित शिक्षक नियुक्तीच्या ठिकाणी हजर झाले, तर निलंबनाचे कारण रहात नाही. शिक्षक हजर होणे महत्त्वाचे आहे.'' अशोककोल्हे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, नगर.
विद्यार्थ्यांचे नुकसान
शिक्षक हजर झाल्यामुळे विद्यार्थ्यांचे नुकसान झाले आहे. याची जबाबदारी प्रशासनाला घ्यावी लागेल. नुकसान भरपाईसाठी जादा तास घेण्याचाही फंडा वापरला जाऊ शकतो. दुसरीकडे प्रशासन उशिरा हजर होणाऱ्या शिक्षकांवरही मेहेरनजर दाखवण्याच्या तयारीत असल्याने चर्चेला उधाण आले आहे.