आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तंत्रज्ञच चालवितात पॅथॉलॉजी प्रयोगशाळा

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर - पॅथॉलॉजी चाचणीचा अहवाल फक्त आवश्यक ती शैक्षणिक पात्रता असणा-या म्हणजे एम.डी. (पॅथॉलॉजी) किंवा डी.सी.पी. यांच्या सहीनेच देण्यात यावा, असा मुंबई उच्च न्यायालयाचे निर्देश असताना नगरमध्ये मात्र त्याचे सर्रास उल्लंघन सुरू आहे. साधे डीएमएलटी किंवा तेही शिक्षण न झालेले लोक प्रयोगशाळेतील चाचणी अहवाल स्वत:च्या सहीने देत आहेत. याबाबत निवासी जिल्हाधिकारी व जिल्हा आरोग्य अधिका-यांनीही तसे न करण्याचे व केल्यास कारवाई करण्याचे स्पष्ट आदेश देऊन उपयोग न झाल्याची माहिती समजली.
नगर शहरात श्ांभराहून रक्त व इतर चाचण्या करणा-या प्रयोगशाळा आहेत. मात्र, त्या चालवण्यासाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता असलेले एम. डी. (पॅथ) असलेले तज्ज्ञ जेमतेम 15 आहेत. जिल्ह्यात तर याहूनही भयावह स्थिती आहे. जिल्ह्यात सुमारे अडीचशे प्रयोगशाळा आहेत. त्यासाठी जेमतेम 35 लोक आहेत. म्हणजे संपूर्ण जिल्ह्यात सुमारे पन्नास लोक अर्हताप्राप्त व साडेतीनशे प्रयोगशाळा असे हे कमालीचे विषम प्रमाण आहे. तज्ज्ञ वगळता या प्रयोगशाळा साधे प्रयोगशाळा तंत्रज्ञाचे (डीएमएलटी) अभ्यासक्रम झालेले लोक चालवतात.
नगरमधील सर्व मोठ्या खासगी हॉस्पिटलमधील प्रयोगशाळांत एमडी (पॅथ)ची नेमणूक असल्याची माहिती समजली. महापालिकेच्या बाळासाहेब देशपांडे रुग्णालयातील प्रयोगशाळा मात्र तंत्रज्ञच चालवत, असल्याची माहिती समजली
अर्हतेतील फरक
पॅथॉलॉजी ही वैद्यक शास्त्रातील स्वतंत्र अशी प्राचीन विद्याशाखा आहे. आजाराचे निदान करण्यासाठी या शाखेचे अतिशय महत्त्व आहे. कारण या आजाराच्या सर्व पैलूंचा अभ्यास या विद्याशाखेत होतो. एम. डी. (पॅथॉलॉजी) होण्यासाठी एमबीबीएसनंतर तीन वर्षांचा अभ्यासक्रम पूर्ण करावा लागतो. डीसीपी हा एमबीबीएस नंतर दोन वर्षांचा अभ्यासक्रम असतो. म्हणजे एम. डी. (पॅथॉलॉजी) होण्यासाठी प्रथम एमबीबीएस हा साडेचार वर्र्षांचा अभ्यासक्रम, त्यानंतर दीड-दोन वर्षे ग्रामीण भागात एंटर्नशिप करावी लागते. त्यानंतर तीन वर्षे पदव्युत्तर अभ्यासक्रम अशी एकूण नऊ ते दहा वर्षे खर्च करावी लागतात. याउलट डीएमएसटी झालेला तंत्रज्ञ जेमतेम बीएस्सी.नंतर एक किंवा दोन वर्षांची पदविका पूर्ण केलेला असतो. काही लोक तर दहावी-बारावीनंतर मान्यता नसलेल्या संस्थांमधून असे अभ्यासक्रम पूर्ण करून प्रयोगशाळा थाटतात. मात्र, त्यांनी स्वतंत्रपणे चाचण्या करून त्यावर सही करण्याची परवानगी नाही, त्यांनी फक्त प्रयोगशाळेत सहायकाचेच काम करणे अपेक्षित असल्याची माहिती महाराष्ट्र असोसिएशन आॅफ प्रॅक्टिसिंग पॅथॉलॉजिस्ट अँड मायक्रोबायोलॉजिस्ट संघटनेचे अध्यक्ष डॉ. संदीप यादव (कराड, जि. सातारा) यांनी ‘दिव्य मराठी’शी बोलताना दिली.
रुग्णाच्या जीवाशी खेळ
शैक्षणिक पात्रता नसताना केलेल्या चाचण्यांमुळे काहींना जीव गमवावे लागल्याची उदाहरणे समजली. जळगावला अशाच एका प्रयोगशाळा चालकाने तरुणाला तो एचआयव्ही निगेटिव्ह असताना पॉझिटिव्ह असल्याचा अहवाल दिला. त्याचे 15 दिवसांनी लग्न होणार होते. हा धक्का सहन न होऊन त्याने आत्महत्या केली. त्याचे वडील न्यायालयात गेले. त्यामुळे त्या प्रयोगशाळा तंत्रज्ञाला सक्तमजुरीची शिक्षा झाली. ज्याच्या रक्ताच्या तपासणीचा अहवाल सामान्य असल्याचे निष्कर्ष तंत्रज्ञाने काढले, अशा रुग्णाला ल्युकेमिया असल्याचा निष्कर्ष नंतर पॅथॉलॉजी डॉक्टरांनी काढल्याचीही उदाहरणे आहेत. त्यामुळे दुस-या शाखेतील डॉक्टरांनी रुग्णास अर्हताप्राप्त पॅथॉलॉजिस्टकडेच पाठवण्याची गरज असल्याचे संघटनेचे म्हणणे आहे.
वैद्यकीय खर्चात 30 टक्के बचत शक्य
रुग्णास योग्य पॅथॉलॉजिस्टकडे पाठवल्यास त्याच्या वैद्यकीय खर्चात 30 टक्के बचत होऊ शकते. कारण अनेकदा निदानासाठी गरज नसलेल्या चाचण्या करण्यास भाग पाडले जाते. एकाच चाचणीतून आजाराचे योग्य निदान निष्णांत पॅथॉलॉजिस्ट डॉक्टरच करू शकतो.’’
डॉ. संदीप यादव, राज्य अध्यक्ष, महाराष्ट्र असोसिएशन आॅफ प्रॅक्टिसिंग पॅथॉलॉजिस्ट अँड मायक्रोबायोलॉजिस्ट.
एमडी (पॅथ)ची संख्या मर्यादित
याबाबत एका प्रयोगशाळेचा चालक व तंत्रज्ञ असलेल्याशी संपर्क साधला असता त्याने एमडी (पॅथ) ची संख्या कमी असल्याचे कारण सांगितले. इतके कमी लोक सर्वांना कशी सेवा देऊ शकतील, असा त्याचा सवाल होता. सर्वच रुग्णालयांना एमडी (पॅथ) बाळगणे आर्थिकदृष्ट्या शक्य नसल्याचेही त्याने सांगितले.