आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Ten Lack People Consume Water Of Tanker In Nagar

दहा लाख जनता पितेय टँकरचे पाणी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर- जिल्ह्यात दुष्काळाची परिस्थिती गंभीर झाली असून 637 टँकरने 460 गावातील 10 लाख जनतेला पाणीपुरवठा केला जात आहे. दुष्काळाची दाहकता दिवसेंदिवस वाढत असून टँकरची संख्या आणखी वाढण्याची शक्यता आहे. सुमारे 40 लाख लोकसंख्या असलेल्या नगर जिल्ह्यातील एक चतुर्थांश जनतेवर केवळ नेत्यांच्या नाकर्तेपणा, पाणी योजनांकडे झालेले दुर्लक्ष व प्रभावी टँकर लॉबीमुळे ही वेळ आली आहे. त्यातही गळके टँकर व टँकरच्या होणार्‍या अपुर्‍या खेपामुळे प्रशासनाच्या डोकेदुखीसोबत नागरिकांची व्याकुळताही वाढली आहे.

जिल्ह्यात दोन वर्षांपासून अत्यल्प पाऊस झाल्यामुळे पाण्याचे उद्भव कोरडे पडले असून भूजल पातळी 11 मीटरने खालावली आहे. परिणामी टंचाईची तीव्रता वाढून पिकाचे कोट्यवधींचे नुकसान झाले. तसेच पिण्याच्या पाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला. या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाला टंचाई निवारणासाठीच्या उपाययोजना राबवताना तारेवरची कसरत करावी लागत आहे. गेल्या दीड वर्षांपासून जिल्हा प्रशासन टंचाईच्या कामात व्यस्त असल्याचे चित्र आहे. पिण्याच्या पाण्यासाठी टँकरचा वापर सुरू आहे. टंचाईची तीव्रता वाढत असल्याने उद्भव कोरडे पडले आहेत. परिणामी टँकर कोठून भरायचे, असा प्रश्न निर्माण झाला आहे. यावर उपाय म्हणून मुळा व भंडारदरा या प्रमुख धरणांतून तलाव भरण्यात येत आहेत. यातून टँकरसाठी उद्भव उपलब्ध झाले आहेत. सध्या जिल्ह्यातील 460 गावे 2 हजार वाड्या वस्त्यांवर 637 टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे. या गावातील 10 लाख 27 हजार लोकसंख्येला टँकरच्या पाण्याचाच आधार उरला आहे. आणखी सव्वा महिन्यात टँकरची मागणी वाढणार आहे. त्यादृष्टीने प्रशासनाला तयारी करावी लागणार आहे. टँकरमधील पाण्याच्या शुद्धीकरणाविषयी आरोग्य विभाग दक्षता घेत आहे.

जिल्ह्यातील मुळा, भंडारदरा व निळवंडे धरणातून जायकवाडीसाठी पाणी दिल्याने पाटबंधारे विभागाने पिण्याच्या पाण्यासाठी केलेले नियोजन कोलमडले आहे. उर्वरित पाण्याचे नियोजन करताना पाटबंधारे विभागही चिंतेत पडला आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंबाद खंडपीठाने दिलेल्या आदेशानुसार जिल्ह्यातील धरणांमधून पाणी सोडण्यात आले. भंडारदरा धरणातून मुळापेक्षा अधिक पाणी सोडण्यात आले. मुळा धरणातील पाण्याचे योग्य नियोजन झाल्यास शहरासह या पाण्यावर अवलंबून असलेल्या योजनांवर पाणी कपातीचे संकट उरणार नसल्याचे चित्र आहे. पाऊस वेळेत आलाच नाही, तर गंभीर परिस्थिती निर्माण होईल. या पार्श्वभूमीवर पाण्याचा अपव्यय आतापासून टाळणे आवश्यक आहे, परंतु टँकरमधून गळणारे पाणी जिल्हा प्रशासनाच्या चिंतेचा विषय बनला आहे. टँकर प्रत्यक्ष गावात पोहोचेपर्यंत गळतीच्या माध्यमातून पाण्याचा मोठय़ा प्रमाणात अपव्यय होतो. अशा पद्धतीने होत असलेल्या अपव्ययाला आळा घालण्याचे आव्हान जिल्हा प्रशासनासमोर आहे.