आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नगरमध्ये दोन गटांत धुमश्चक्री

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर - शहरातील झेंडीगेट परिसरात शुक्रवारी सायंकाळी सहाच्या सुमारास कुरेशी व जहागीरदार या दोन गटांत धुमश्चक्री झाली. त्यामुळे परिसरात दंगलसदृश वातावरण निर्माण झाले होते. या घटनेत काही दुचाकी व चारचाकी वाहनांचे नुकसान झाले असून तिघे जखमी झाले आहेत. जखमींना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
जिसान रफिक कुरेशी (18), शेख अरिफ कुरेशी (19), मोहसीन कुरेशी (35) अशी जखमींची नावे आहेत. झेंडीगेट परिसरातील कुरेशी व जहागीरदार गटात पूर्ववैमनस्य आहे. क्षुल्लक कारणावरून या दोन गटांत यापूर्वीही अनेकदा वाद झाले आहेत. शुक्रवारी सायंकाळी सहाच्या सुमारास एकमेकांकडे खुन्नसने बघितल्यावरून या दोन्ही गटांत सुरुवातीला किरकोळ वादावादी झाली. या वादावादीचे रूपांतर नंतर भांडणात व नंतर धुमश्चक्रीत झाले. दोन्ही गटांकडून दगड, काठय़ा व दांडक्यांचा वापर करण्यात आला.
यामुळे झेंडीगेट परिसरात तणाव निर्माण झाला. या भागातील नागरिकांनी घराची दारे बंद करून घेतली. दुकानेही पटापट बंद झाली. दोन्ही गटांनी प्रचंड दगडफेक केली. त्यामध्ये 4 ते 5 दुचाकी व एका मिनिडोअर टेम्पोचे नुकसान झाले. घटनेची माहिती मिळताच कोतवाली पोलिस ठाण्याचे निरीक्षक अभिमन्यू पवार फौजफाट्यासह तेथे गेले. काही वेळातच शहर विभागाचे पोलिस उपअधीक्षक श्याम घुगे, अतिरिक्त पोलिस अधीक्षक संजय बारकुंड, तोफखाना पोलिस ठाण्याचे निरीक्षक अशोक ढेकणे, तसेच दंगल नियंत्रक पथक घटनास्थळी आले.
12 जण ताब्यात - पोलिसांनी 10 ते 12 जणांना ताब्यात घेऊन त्यांना कोतवाली पोलिस ठाण्यात नेण्यात आले. याप्रकरणी कोतवाली पोलिस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. झेंडीगेट परिसरात पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.