आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संगमनेरच्या रसिकांना मिळाली भक्तिगीतांची मेजवानी गायक राहुल देशपांडे यांच्या गायनाने श्रोते झाले मंत्रमुग्ध

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
संगमनेर : ‘अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र तेथे नांदतो…’ या सुरेल भजनाने सुरू झालेला जयंती महोत्सवाचा कार्यक्रम, राष्ट्रीय कीर्तीचे गायक राहुल देशपांडे यांनी गायलेली विविध भजने, सोबत सुरेल संगीताची साथ आणि श्रवणीय बासरीचा हुंकार यामुळे संगमनेरची बुधवारची संध्याकाळ कडाक्याच्या थंडीतही परमेश्वराच्या नामस्मरणानी निनादली. 
 
सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात आणि हरितक्रांतीचे प्रणेते डॉ. अण्णासाहेब शिंदे यांच्या तीन दिवसीय जयंती महोत्सवाला बुधवारी संगमनेरमध्ये प्रारंभ झाला. प्रेरणा दिनाच्या पुरस्कार वितरण समारंभानंतर सायंकाळी ‘भजनसंध्या’ या सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी आमदार बाळासाहेब थोरात, साहित्य संमेलनाचे अध्यक्ष पुरस्कारार्थी डॉ. सदानंद मोरे, कांचन थोरात, नगराध्यक्ष दुर्गा तांबे, डॉ. संजय मालपाणी, डॉ. हर्षल तांबे, शरयु देशमुख, शोभा कडू, डॉ. जयश्री थोरात, डॉ. वर्षा तांबे आदी उपस्थित होते. 
 
आमदार थोरात यांच्या हस्ते यावेळी विक्रम हाजरा यांचा देखील सन्मान करण्यात आला. राहुल देशपांडे यांनी गायलेल्या भक्तीगीतांना संगमनेरकरांनी भरभरून दाद दिली. जयंती महोत्सवात सुरू असलेल्या या कार्यक्रमाने वातावरणच भक्तीमय बनले होते. ‘सूर निरागस हो गणपती, शुभनयना करुणाय हो’, ‘मोरया माेरया गणपती बाप्पा मोरया’, ‘देव विठ्ठल क्षेत्र विठ्ठल देव पूजा तीर्थ विठ्ठल क्षेत्र विठ्ठल’ या भक्तिगीतांनी कार्यक्रमाची रंगत वाढली.
 
देशपांडे यांच्या कट्यार काळजात घुसली चित्रपटातील गीतांवर, तर प्रेक्षकांनी ठेका धरला होता. कानडी राजा पंढरीचाने रसीक मंत्रमुग्ध झाले. तीन तास सुरू असलेल्या या भजनसंध्येने संगमनेरकर श्रोत्यांनी भक्तीगीतांची नवी मेजवानी जयंती महोत्सवाच्या पहिल्याच दिवशी अनुभवली. 
 
यावेळी आमदार थोरात म्हणाले, जयंती महोत्सवाच्या निमित्ताने दिवंगत भाऊसाहेब थोरात आणि अण्णासाहेब शिंदे यांना अभिवादनासोबतच त्यांच्या रचनात्मक विचारांचे स्मरण करून सर्वजण नवी प्रेरणा घेत असतात. राहुल देशपांडे हे संगीतातील एक मोठे नाव असून त्यांच्या अप्रतिम भजनांनी एक अविस्मरणीय संध्याकाळ संगमनेरकरांच्या स्मरणात राहील. 
 
भजनातून भक्ती 
- संगमनेर सुसंस्कृत विचारांचा तालुका आहे. प्रेम, शांतता, एकता ही भावना येथील नागरिकात असल्याने हा एक विकासाचा तालुका ठरला. भजनाने जीवनात आनंद निर्माण होत असून त्यामधून होत असलेली सेवा आपल्याला आनंद देणारी असते. भजनातून परमेश्वराची भक्ती साधण्याचा प्रयत्न असतो. राहुल देशपांडे, गायक. 
बातम्या आणखी आहेत...