आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • The Old School Building Executed In The Last Aranagava

अखेर अरणगाव शाळेची जुनी इमारत पाडली

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर-प्रशासनाचे आदेश असूनही जिल्हा परिषदेच्या मोडकळीस आलेल्या शाळा पाडण्यास टाळाटाळ केली जात होती. नगर तालुक्यातील अरणगाव शाळेतील विद्यार्थ्यांना मोडकळीस आलेल्या खोल्यांत बसवले जात होते. याकडे ‘दिव्य मराठी’ने लक्ष वेधल्यानंतर ही धोकादायक इमारत पाडण्यास मंगळवारपासून सुरुवात झाली.

जिल्ह्यातील 60 शाळांमधील 213 वर्गखोल्या मोडकळीस आल्याचे प्रमाणपत्र प्रशासनाने दिले आहे. या खोल्या तातडीने पाडण्याचे निर्देशही प्रशासनाने दिले होते. या आदेशाला तीन-चार महिने उलटूनही मोडकळीस आलेल्या खोल्यांत विद्यार्थ्यांना बसवले जाते. दिव्य मराठी टीमने अरणगाव येथील प्राथमिक शाळेची 9 जानेवारीला पाहणी केली. भिंतींना गेलेले तडे व मोडकळीस आलेल्या छताखाली विद्यार्थ्यांना बसवले जात असल्याचे स्पष्ट झाले. या शाळेत पहिली ते चौथीचे वर्ग असून पटसंख्या 160 आहे. तेथील पाच वर्गखोल्या पाडण्यास सांगण्यात आले आहे. तथापि, मोडकळीस आलेल्या पाचही वर्गांत बसून विद्यार्थी शिक्षण घेत असल्याचे दिसून आले. शाळेची इमारत पन्नास ते साठ वर्षांपूर्वीची असून जुन्या पद्धतीचे दगडी बांधकाम आहे. त्यामुळे ही इमारत कोणत्याही क्षणी कोसळू शकते, असे ग्रामस्थांचे म्हणणे होते.

यासंदर्भात 10 जानेवारीला ‘दिव्य मराठी’त वृत्त प्रसिद्ध झाले. या वृत्ताच्या दणक्यानंतर शिक्षण विभाग व बांधकाम विभागाला ही धोकादायक इमारत पाडण्याचे सूचले. या कार्यवाहीमुळे विद्यार्थ्यांसह पालकांचा जीव भांड्यात पडला. ग्रामस्थांनी ‘दिव्य मराठी’ला धन्यवाद दिले आहेत.

बाकीच्या शाळांचे काय?

जिल्ह्यात 60 शाळांमधील 213 वर्गखोल्या मोडकळीस आल्या आहेत. प्रथमच अरणगाव येथील इमारत पाडण्यात आली. तथापि, बहुतेक ठिकाणी धोकादायक इमारतींमध्ये अजूनही विद्यार्थ्यांना बसवले जात आहे. या इमारती केव्हा पाडणार, असा सवाल पालकवर्गातून उपस्थित केला जात आहे.

नवीन इमारतीचे काम उद्यापासून

जुनी इमारत मोडकळीस आली असल्याने ती पाडण्यात आली. विद्यार्थ्यांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करण्यात आले आहे. नवीन वर्गखोल्या बांधण्यास गुरुवारी (23 जानेवारी) प्रारंभ करण्यात येईल.’’ संजय कर्डिले, मुख्याध्यापक.

सर्व गटशिक्षणाधिकार्‍यांना पत्र

अरणगावच्या शाळेबाबत दैनिक दिव्य मराठीत आलेल्या वृत्ताचा संदर्भ देऊन संबंधित गटशिक्षणाधिकार्‍यांना कडक सूचना देण्यात आल्या होत्या. त्यानुसार अरणगावची मोडकळीस आलेली इमारत पाडण्यात आली. इतर ठिकाणच्या शाळांना पर्यायी खोल्या उपलब्ध होताच तातडीने धोकादायक वर्गखोल्या पाडण्यात येतील.’’ दिलीप गोविंद, शिक्षणाधिकारी.

‘दिव्य मराठी’ च्या दणक्यामुळे अडथळा आला नाही..

नवीन शाळा इमारती बांधण्यासाठी निधी कमी पडला, तर लोकसहभागातून आम्ही पैसे उपलब्ध करून देऊ. जिल्हा परिषदेच्या नवीन शाळा डिजिटल पद्धतीने तयार करण्यात येतील. दैनिक दिव्य मराठीच्या दणक्यामुळे कोणत्याही अधिकार्‍याने शाळा इमारत पाडण्याच्या कामात अडथळा आणला नाही.’’ सुजित कोके, सरपंच.