आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

छगन भुजबळ यांच्‍या हस्‍ते, अपूर्ण कामाचे उरकले उद्घाटन

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर-पुणे व मनमाड रस्त्याला जोडणार्‍या बाह्यवळण रस्त्यावरील निंबळक शिवारातील रेल्वे उड्डाणपुलाला जोडणार्‍या भराव रस्त्याचे डांबरीकरण नाही, भराव रस्त्यावंर पडलेली खडी आणि दोन ते अडीच किलोमीटर रस्त्याचे काम पूर्ण झालेले नसतानाही या पुलाचे उद्घाटन शनिवारी उरकण्यात आले. सार्वजनिक बांधकाममंत्री छगन भुजबळ यांनी या पुलाचे उद्घाटन केले.
रेल्वे अभियंत्याने त्यांच्या हद्दीतील काम पूर्ण झाल्याचे सांगत सार्वजनिक बांधकाम विभागाची कामे अपूर्ण असल्याची प्रतिक्रिया दिली, तर बांधकाम विभाग कामे अपूर्ण असली, तरी वाहतूक सुरळीत होणार असल्याचा दावा करत आहेत.
पालकमंत्री मधुकर पिचड यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या उद्घाटनाच्या कार्यक्रमाला बांधकाममंत्री भुजबळ, आमदार बबनराव पाचपुते, आमदार अरुण जगताप, महापौर संग्राम जगताप, पश्चिम महाराष्ट्र वैधानिक विकास महामंडळाचे अध्यक्ष अशोक सावंत, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष घनश्याम शेलार, अधीक्षक अभियंता हरिश पाटील आदी उपस्थित होते. भुजबळ म्हणाले, उड्डाणपुलासाठी 14 कोटी रुपये व भराव रस्त्यासाठी 9 कोटी असा 23 कोटी रुपयांचा खर्च झाला. हा सर्व खर्च राज्य सरकारच्या तिजोरीतून करण्यात आला आहे. दुरुस्तीसाठी आणखी साडेतीन कोटी रुपयांची मागणी करण्यात आली असून हा निधीही देण्यात येईल. हा रस्ता खुला झाल्याने शहरातून जाणार्‍या जडवाहतुकीचा त्रास कमी होईल. प्रदूषण, अपघात यांचे प्रमाण कमी होईल. बाह्यवळण रस्त्यावरील अरणगाव येथील रेल्वे उड्डाणपुलाचे काम प्रगतिपथावर असून 20 कोटी रुपयांचा खर्च असलेला हा उड्डाणपूल डिसेंबरअखेर पूर्ण होण्याची शक्यता भुजबळ यांनी व्यक्त केली.
गेल्या सहा वर्षांपासून सुरू असलेले बाह्यवळण रस्त्याचे त्रांगडे या रेल्वे उड्डाणपुलाच्या उद्घाटनाने सुटले. मात्र, पुलाला जोडणार्‍या भराव रस्त्याचे साधे डांबरीकरणही न करता पुलाचे उद्घाटन करण्याची घाई करण्यात आली. मुख्य पुलाचे काम पूर्ण झालेले असून भराव रस्त्यांवर बारीक खडी पडलेली आहे. त्यामुळे अपघातांची शक्यता वाढली आहे. दोन ते अडीच किलोमीटर रस्त्याचे कामही पूर्ण झालेले नाही. भुजबळ यांच्या हस्ते या पुलाच्या उद्घाटनाचा मुहूर्त साधण्यासाठी ही घाई करण्यात आल्याचे निंबळक ग्रामस्थांचे म्हणणे आहे.
उद्घाटनाच्या दिवशीच निंबळकडून पुलावर येणार्‍या रस्त्यावर मोठमोठाले दगड ठेवून हा रस्ता बंद करण्यात आला होता. भराव रस्त्यावरील साईडपट्टय़ांची अवस्थाही बिकट आहे. रेल्वेचे अभियंता प्रमोद पोळ यांनी रेल्वेच्या हद्दीतील कामे पूर्ण झाली असून बांधकाम विभागाच्या हद्दीतील कामे अपूर्ण असल्याचे सांगितले, तर बांधकाम विभागाचे अधिकारी अपूर्ण कामांबाबत नावानिशी प्रतिक्रिया देण्यास तयार नाहीत. काही कामे अपूर्ण असली तरी वाहतूक सुरळीत करून दाखवू, अशी अपेक्षा नाव न छापण्याच्या अटीवर त्यांच्याकडून देण्यात आली आहे.
78 कोटींची कामे सुरू
बांधकाम विभागाकडून जिल्ह्यात सध्या 78 कोटी रुपयांची कामे सुरू आहेत. रस्त्यांची 49 तर शासकीय इमारतींची 29 कोटींची काम सुरू आहेत. पर्यटन विकासासाठी विविध देवस्थानचा विकास सुरू असून त्यासाठी 26 कोटींचा निधी मंजूर करण्यात आला. त्यातील 14 कोटी पाठवले आहेत. ठेकेदार पुढे येत नसल्याने कोल्हार-कोपरगाव रस्त्याच्या कामासाठी 44 कोटी रुपये मंजूर करण्यात आल्याची माहिती भुजबळ यांनी दिली.
तातडीने काम पूर्ण करा
गेल्या सहा वर्षांपासून बाह्यवळण रस्त्याचे संथ गतीने काम सुरू होते. त्यामुळे ठिकठिकाणी रस्त्याची दुरवस्था झाली आहे. अडीच किलोमीटरचा हा रस्ता अद्याप पूर्ण झालेला नाही. ही कामे तातडीने पूर्ण करण्याची आवश्यकता आहे. र्शेय घेण्याच्या उद्देशाने घाईघाईने या पुलाचे उद्घाटन उरकण्यात आले आहे.’’ विलास लामखडे, सरपंच, निंबळक.
कसा होणार फायदा
हा उड्डाणपूल वाहतुकीसाठी खुला झाल्याने शहरातून पुणे, कल्याण, मनमाड, औरंगाबादकडे जाणारी जड वाहतूक बाह्यवळण रस्त्याने जाणार आहे. त्यामुळे शहरातील वाहतुकीवर पडणारा ताण निम्म्याने कमी होणार आहे. सातत्याने होणार्‍या वाहतूक कोंडीतून नगरकरांना दिलासा मिळू शकेल. जड वाहतूक उड्डाणपुलावरून होणार असल्याने शहराच्या प्रदूषणात पडणारी भर कमी होईल. तसेच वाहतूक कोंडीच्या प्रo्नासोबत ध्वनिप्रदूषणापासून सुटका होईल.
काय होणार तोटा
महापालिकेला पारगमन शुल्कापोटी मिळणार्‍या रकमेत पन्नास टक्के घट होण्याची शक्यता आहे. सव्र्हेक्षण करून गेल्यावर्षी 21 कोटी रुपयांना पारगमन वसुलीचा ठेका देण्यात आला होता. या रकमेत पंधरा टक्के वाढ करून संबंधित ठेकेदाराला मुदतवाढ देण्यात आली. पारगमन शुल्क भरणारी वाहने बाह्यवळण रस्त्याने जाणार असल्याने एकही ठेकेदार ठेका घेण्यास तयार होणार नाही. आधीच खडखडाट असलेल्या मनपाच्या तिजोरीत येणार्‍या रकमेत घट होणार आहे.
शहरात उड्डाणपूल होणारच
नगर-शिरूर रस्ता चौपदरीकरणाचा भाग असलेला स्टेशन रस्त्यावरील उड्डाणपुलाचे काम होणारच, अशी ग्वाही भुजबळ यांनी दिली, तर पिचड यांनी ‘शहरातील उड्डाणपूल करणारच. महापौर जगताप त्यासाठी पाठपुरावा करतील. उद्योजक नेमण्याबाबत भुजबळ साहेब लवकरच निर्णय घेतील’. विद्यमान उद्योजक चेतक एंटरप्रायजेसकडून 302 कोटींत प्रकल्प परत घेऊन निविदा प्रक्रियेतून दुसरा ठेकेदार नियुक्त करण्याचा प्रस्ताव भुजबळ यांच्याकडे प्रलंबित आहे.
काँग्रेसला टाळले
उद्घाटनाचा कार्यक्रम राष्ट्रवादीमय वातावरणात पार पडला. काँग्रेसचा एकही नेता या कार्यक्रमाला उपस्थित नव्हता. शहरातील पदाधिकारी, नगरसेवक, उपमहापौर सुवर्णा कोतकरही कार्यक्रमाकडे फिरकल्या नाहीत. निमंत्रण नसल्याने काँग्रेसचे नेते कार्यक्रमाकडे फिरकले नसल्याची प्रतिक्रिया एका पदाधिकार्‍याने दिली. निवडणूकपूर्व एकीचे दर्शन घडवण्यासाठी एकत्र राहण्याचे आघाडीच्या बिघाडीचे यानिमित्त दर्शन घडले.
पाचपुतेंचे नाव गायब
रेल्वे उड्डाणपुलाचे काम मार्गी लावण्यात तत्कालीन पालकमंत्री बबनराव पाचपुते यांचे सर्वाधिक योगदान आहे. विद्यमान पालकमंत्री पिचड यांनीही त्यांच्या भाषणातून ते मान्य केले. केवळ प्रo्न मार्गी लावून पाचपुते थांबले नव्हते, तर सातत्याने कामाचा आढावा घेण्यासाठी काम सुरू असलेल्या ठिकाणी त्यांनी भेट दिली. मात्र, कोनशिलेवर त्यांचे नाव टाकण्याचे सौजन्यही बांधकाम विभागाने दाखवले नाही. निमंत्रणपत्रिकेवरही त्यांचे नाव टाकण्यात आलेले नव्हते.