आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्व. विखेंचे कार्य देशाला दिशा देणारे , सर्वपक्षीय नेत्यांच्या उपस्थितीत श्रद्धांजली, पालकमंत्री शिंदे यांचे प्रतिपादन

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर: सामाजिक राजकीय कार्यकाळात वेगळा ठसा उमटवून समाजाशी नाळ कधीही तुटू दिली नाही. थोर व्यक्तिमत्त्व म्हणून ओळख असणारे स्व. बाळासाहेब विखे यांचे कार्य राज्याला देशाला दिशा देणारे होते, असे प्रतिपादन पालकमंत्री राम शिंदे यांनी केले. यशवंतराव चव्हाण सहकार सभागृहात स्व. विखे यांच्या श्रद्धांजलीसाठी सर्वपक्षीय सभा शनिवारी बोलावण्यात आली होती. याप्रसंगी मंत्री शिंदे बोलत होते.
 
यावेळी पोपटराव पवार, खासदार दिलीप गांधी, आमदार शिवाजी कर्डिले, मोनिका राजळे, अरुण जगताप, भाऊसाहेब कांबळे, संग्राम जगताप, माजी आमदार भानुदास मुरकुटे, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष जयंत ससाणे, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर घुले, जिल्हा बँकेचे अध्यक्ष सीताराम गायकर, महापौर सुरेखा कदम, जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष मंजूषा गुंड, भानुदास बेरड, विठ्ठल लंघे, अशोक गायकवाड, दीप चव्हाण, माजी आमदार नंदकुमार झावरे, हेमंत ओगले आदी उपस्थित होते. मंत्री शिंदे म्हणाले, विखे यांचे कार्य राज्याला नव्हे, तर देशाला दिशादर्शक होते. साधी राहणी उच्च विचारसरणी अन् तसाच त्यांचा पेहराव कायम राहिला. 
 
विचारांची तडजोड त्यांनी केली नाही. ध्येयापर्यंत पोहोचणे हेच त्यांचे उद्दिष्ट होते. शेती, पाणी यांसह अन्य विषयांवर अभ्यास करून त्यांनी जिल्ह्याला नवी दिशा दिली. राजकारणात आदरयुक्त दबदबा त्यांनी ठेवला. दिल्लीचे तख्त त्यांनी हलवले होते. सामाजिक कार्यात काम करताना त्यांनी समाजाची नाळ कधी तोडली नाही, असे ते म्हणाले. 
 
खासदार गांधी म्हणाले, वादळ उठवण्याची क्षमता त्यांच्यामध्ये होती. विचारांची प्रतारणा त्यांनी कधी केली नाही. माणसे जोडत गेली कार्य केले. जिल्ह्यातील नेत्यांना त्यांनी नेहमीच मार्गदर्शन केले. स्वत: एका पक्षाशी संबंध ठेवताना त्यांनी विचारांची बांधिलकी तोडू नका, असे सांगून अनेक विषय त्यांनी जिल्ह्याच्या राजकारणात मांडले, असे त्यांनी सांगितले. 
 
आमदार जगताप म्हणाले, सर्वसामान्यांसाठी त्यांनी कार्य केले त्यांना धार्मिक कार्याची आवड होती. गाणगापूरला भक्तनिवास सुरू करून भाविकांची सोय केली. समाजाला दिशा देण्याचे काम त्यांनी केले. महापौर सुरेखा कदम यांनी नगर जिल्ह्याच्या राज्याच्या राजकारणात विखे यांनी ठसा उमटवला. सहकाराच्या जडणघडणीत त्यांचा मोठा वाटा होता. 
 
आमदार कर्डिले म्हणाले, सर्वसामान्यांचा नेता कार्यकर्त्यांना पाठबळ देण्याचे काम त्यांनी केले. शेती, पाणीप्रश्नाच्या माध्यमातून प्रश्न सोडवण्यासाठी अनेक संघर्ष केले. आमच्या सारख्या कार्यकर्त्यांना त्यांनीच घडवले त्यामुळे आम्ही या पदावर आलो असे ते म्हणाले. देशाला दिशा देणारे व्यक्तिमत्त्व म्हणून विखे यांची ओळख होती. त्यांच्या कार्यातून नगरचे नाव मोठे झाले. जिल्ह्याचा इतिहास लिहिताना त्यांच्या कार्याची निश्चित नोंद होईल, असे आमदार मोनिका राजळे यांनी सांगितले. 
 
देशाची हानी झाली 
ग्रामीणभागातील मुलांना इंग्रजीचे ज्ञान मिळावे या उद्देशाने त्यांनी लोणीत पब्लिक स्कूल सुरू केले. राज्यव्यापी पाणी धोरणात आंतरराष्ट्रीय पाणी लवादाचा अभ्यास केला, त्यांच्या निधनाने देशाची हानी झाली, असे पोपटराव पवार यांनी सांगितले. 
बातम्या आणखी आहेत...