आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • The Primary Health Centers And Sub center Issue At Nagar

ढिसाळ नियोजनामुळे 39 कामे रखडली

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर- जिल्ह्यात दोन वर्षांपूर्वी मंजूर झालेल्या प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्राच्या 53 कामांपैकी अवघे 14 कामे पूर्ण झाली आहेत. बांधकाम विभागाच्या बेजबाबदारपणामुळे बहुतेक कामांची मुदत संपूनही कामे पूर्ण होऊ शकली नाहीत. आरोग्य केंद्रातच त्याचा फटका ग्रामीण भागातील आरोग्य सुविधेला बसला आहे. विशेष म्हणजे ही कामे मार्चअखेर झाली नाहीत, तर कोट्यवधी रुपयांचा निधी परत करावा लागणार आहे.


जिल्हा परिषदेंतर्गत जिल्ह्यात प्राथमिक आरोग्य केंद्र व आरोग्य उपकेंद्र चालवले जातात. ग्रामीण भागातील जनतेला तत्काळ आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्याचे महत्त्वपूर्ण काम या यंत्रणेमार्फत केले जाते. जिल्ह्यातील काही आरोग्य केंद्राच्या इमारती जुनाट झाल्या असून नूतनीकरणाच्या प्रतीक्षेत आहेत. 2012-2013 या आर्थिक वर्षात जिल्ह्यात 34 प्राथमिक आरोग्य केंद्रे व 19 आरोग्य उपकेंद्रांच्या कामांना मान्यता मिळाली होती. पैकी आरोग्य केंद्रांची अवघी 11, तर उपकेंद्रांची 3 कामे पूर्ण आहेत. उर्वरित 39 कामे मंजुरी मिळूनही प्रशासनाच्या ढिसाळ नियोजनामुळे रखडली आहेत.

नगर तालुक्यातील देहरे आरोग्य केंद्राची संरक्षक भिंत व इमारतीचे विस्तारीकरण, चास आरोग्य केंद्राचे शवविच्छेदनगृह, खातगाव टाकळी येथील इमारत दुरुस्ती, पारनेर तालुक्यातील रुइछत्तीशी, पळवे, खडकेवाडी, कान्हूरपठार येथील शवविच्छेदन गृहे, र्शीगोंदे तालुक्यातील पिंपळगाव पिसा यासह पाथर्डी तालुक्यातील बहुतेक कामे अपूर्ण, तर काही सुरूच झाली नाहीत. आरोग्य समितीच्या सभेत वेळोवेळी उपाध्यक्ष मोनिका राजळे यांनी मंजूर कामे तातडीने पूर्ण करून हस्तांतरित करण्याच्या सूचना दिल्या. परंतु बांधकाम विभागाने त्यांच्या सूचनांकडे दुर्लक्ष केल्याने या इमारती दुरुस्तीच्या प्रतीक्षेत आहेत.

ग्रामीण भागात आरोग्य केंद्रांना शवविच्छेदनगृह नसल्याने शवविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालय अथवा जिल्हा रुग्णालयात मृतदेह आणावा लागतो. त्यामुळे नागरिकांची प्रचंड गैरसोय होत आहे. ही बाब सर्वसाधारण सभेतही वेळोवेळी सदस्यांनी निदर्शनास आणून दिली, परंतु बांधकाम विभागाच्या दिरंगाईमुळे शवविच्छेदनगृहासारखी अत्यावश्यक सेवा मिळू शकलेली नाही. मात्र, हा निधी परत जाऊ नये यासाठी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी जगन्नाथ भोर यांनी जिल्हाधिकारी डॉ. संजीवकुमार यांची भेट घेऊन 2012-2013 मधील जी कामे होणार नाहीत, त्याचा निधी 2013-2014 या वर्षातील कामांसाठी वर्ग केला आहे. त्यामुळे निधी माघारी जाणार नाही, असा विश्वास जिल्हा परिषद प्रशासनाला आहे. मात्र, मंजूरकामात दिरंगाई करणार्‍यांचे काय?, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. आरोग्य केंद्राच्या कामात दिरंगाई करणार्‍या अधिकार्‍यांवर तसेच कर्मचार्‍यांवर कारवाई करण्याची मागणी जिल्हा परिषद सदस्यांमधून होत आहे. यासंदर्भात भोर काय भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.

दोषींवर कारवाई करा..
प्राथमिक आरोग्य केंद्रात शवविच्छेदनगृह नसल्याने सामान्य नागरिकांचे मोठय़ा प्रमाणात हाल होतात. ही कामे वेळेत पूर्ण झाली असती, तर नागरिकांची गैरसोय टळली असती. पण, प्रशासनाच्या दिरंगाईमुळे नागरिकांची ससेहोलपट सुरू आहे. हा प्रकार थांबवून दिरंगाई करणार्‍यांवर कारवाई करा, मला बाकी काही माहीत नाही. ’’ बाळासाहेब हराळ, सदस्य, जिल्हा परिषद.

दिरंगाई करणार्‍यांवर कारवाई तर होणारच..
आरोग्य केंद्रांच्या इमारतीसाठीचा मंजूर निधी माघारी जाऊ नये, यासाठी 2012-2013 वर्षातील निधी 2013-2014 या वर्षातील कामांसाठी वर्ग केला. कोणत्याही परिस्थितीत निधी मागे जाणार नाही याचे नियोजन झाले आहे. पण ज्यांनी निधी उपलब्ध असूनही कामात दिरंगाई केली, त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल. त्यासाठी संबंधित उपअभियंता, ठेकेदार आदींना नोटिसा काढण्याचे आदेश दिले आहेत. याचा पाठपुरावा करण्यासाठी पुढील पंधरा दिवसांत बैठक आयोजित करून चर्चा करण्यात येईल. यात शाखा अभियंता, उपअभियंता, ठेकेदार यांच्यासह जे दोषी असतील त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार आहे. कारवाई करण्यात दिरंगाई झाल्यास प्रसंगी कार्यकारी अभियंत्यांवरही कारवाई करू.’’ जगन्नाथ भोर, अतिरिक्त मुख्यकार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद.