आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जिल्ह्यात ९६ टक्के पाऊस; रस्ते, चौक झाले जलमय

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - नगर शहर आणि जिल्ह्यात शनिवारी परतीच्या मान्सूनचा जोर कायम होता. अकोल्यानंतर आता शेवगाव तालुक्याने पावसाची सरासरी आेलांडली असून, अन्य तालुक्यांतही समाधानकारक पाऊस झाला आहे. आतापर्यंत जिल्ह्यात ९६ टक्के पावसाची नोंद झाली आहे. दरम्यान, पावसामुळे नगर शहरातील सर्व रस्त्यांचा पुरता बोजवारा उडाला असून महापालिकेने मोठा खर्च करून नुकतेच बुजवलेले खड्डे पुन्हा उखडले गेले आहेत.
पावसामुळे नगर शहर जलमय झाले आहे. सखल भागात मोठ्या प्रमाणात पाणी साचले होते. सावेडी, िदल्ली दरवाजा, माळीवाडा, भिस्तबाग, पाइपलाइन रस्ता, तसेच भिंगारमधील रस्ते खड्ड्यांनी व्यापले आहेत. दिल्ली गेट परिसरात खड्ड्यांमुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत आहे. नगर-मनमाड, नगर-पुणे नगर-आैरंगाबाद रस्त्यावरही पावसामुळे खड्डे पडले आहेत.

बुधवारपासून परतीच्या पावसाला सुरुवात झाल्याने खरिपाच्या उभ्या पिकांना रब्बीच्या पेरण्यांसाठी दिलासा मिळाला आहे. अकोले शेवगाव तालुक्याने पावसाने सरासरी आेलांडली आहे. अकोले तालुक्याची सरासरी ४९३ मिलिमीटर असून तेथे आतापर्यंत हजार १२ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. सरासरीच्या दुप्पट पाऊस या तालुक्यात झाला आहे. शेवगाव तालुक्याची सरासरी ५६३ मिलिमीटर असून, या तालुक्यात ६०९ मिलिमीटर पाऊस झाला आहे.
गेल्या २४ तासांत अकोले ८०, संगमनेर ६०, कोपरगाव ३, श्रीरामपूर ८३, राहुरी ४७, नेवासे ५०, राहाता ३२, नगर १०, शेवगाव ९४, पाथर्डी ८७, पारनेर ६७, कर्जत ४७, श्रीगोंदे २१ जामखेड येथे २१ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. अन्य तालुक्यांतही सरासरीच्या जवळ पाऊस झाला आहे. पारनेर तालुक्यात मात्रे केवळ ५० टक्के पाऊस झाला आहे.

पावसामुळे विहिरी, कूपनलिका, तसेच छोटे-मोठे तलावही भरले आहेत. त्यामुळे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न काही प्रमाणात सुटणार आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा ३५ टक्के जास्त पावसाची नोंद झाली आहे. यंदा झालेल्या दमदार पावसाचा फायदा खरिपाबरोबरच रब्बी हंगामालाही होणार आहे.

धरणांमध्ये समाधानकारक साठा
संततधार पावसामुळे मुळा भंडारदरा हे दोन्ही जिल्ह्यातील महत्त्वाची धरणे भरली असून त्यातून पाणी सोडण्यात आले आहे. भंडारदरा ९४.५८ टक्के भरले आहे. गेल्या वर्षी त्यात केवळ ६७.३४ टक्के पाणीसाठा होता. नगर शहराला पाणी पुरवठा करणारे मुळा धरण ९४.०२ टक्के भरले अाहे. गेल्या वर्षी या धरणात ५३.६९ टक्के साठा होता. मांडआेहोळ, आढळा सीना धरणातही गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा समाधानकारक पाणी आहे.
बातम्या आणखी आहेत...