आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कुख्यात फरार दरोडेखोर चोवीस तासांत जेरबंद

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - पूर्ववैमनस्यातून नातलगाला गोळ्या घालून त्याचा खून केल्यानंतर पसार झालेला कुख्यात दरोडेखोर मनोहर ऊर्फ तुषार सुदमल काळे (२६,कसोडा गायरान, ता. गंगापूर, जि. औरंगाबाद) याला चोवीस तासांच्या आत जेरबंद करण्यात पोलिसांना यश आले. हा गुन्हा औरंगाबाद जिल्ह्यातील वाळूज पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडला असला, तरी नगरच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या जिगरबाज पथकाने तब्बल दीड तास पाठलाग करून मनोहरच्या मुसक्या अावळल्या. मनोहर त्याचे साथीदार नगर जिल्ह्यातील विविध पोलिस ठाण्यांमध्ये नोंद असलेल्या दरोड्याच्या गुन्ह्यात वाँटेड आहेत.
गुरुवारी दुपारी तीन वाजता गंगापूर तालुक्यातील शिरोडी शिवारात पारधी वस्तीवर शाहरूख कडू काळे (१९, शिरोडी गायरान, गंगापूर) याचा खून झाला. त्याच्या मारेकऱ्यांमध्ये हल्लेखोरांमध्ये मनोहर काळे (शिरोडी गायरान) याच्यासह रमेश भोसले अल्ताफ भोसले (नेवासेफाटा, अहमदनगर) यांचाही समावेश आहे. हत्या केल्यावर तिन्ही आरोपी मोटारसायकलवर बसून पसार झाले. मयत शाहरूख आरोपी हे एकमेकांचे नातेवाईक असून पूर्ववैमनस्य असल्यामुळेच मनोहरने साथीदारांच्या मदतीने गुरुवारी दुपारी ‘समझोता’ करण्याच्या बहाण्याने शाहरूखचा ‘गेम’ केला.

शाहरूख हा शिरोडी शिवारात असलेल्या गायरानात कुटुंबासह वास्तव्यास होता. मनोहर काळे, रमेश आणि अल्ताफ भोसले हे एका दुचाकीवर बसून त्याच्या वस्तीजवळ आले. रस्त्यावरच त्यांनी मोटारसायकल थांबवली. तिघांनी त्याला आवाज देऊन बोलवले. शाहरूख त्यांना भेटण्यासाठी रस्त्यावर आला. तेव्हा रमेशने आपुलकीचा आव आणत शाहरूखला गळाभेट घेण्याच्या बहाण्याने जवळ ओढले अन् लगेचच गावठी पिस्तूल काढून त्याने शाहरूखच्या छातीत गोळी मारली.

गोळीबाराचा आवाज ऐकून तेथे बाजूलाच असलेल्या त्याच्या बहिणीने आरडाओरड करत भावाकडे धाव घेतली. तेथे जवळच काम करत असलेले आसपासचे गावकरीही धावत तिकडे आले. हे पाहून तिन्ही आरोपींनी मोटारसायकल सुरू केली गंगापूरच्या दिशेने सुसाट वेगाने धूम ठोकली. गोळी हृदयात घुसल्यामुळे क्षणार्धात शाहरूख ठार झाला.

या घटनेची माहिती मिळताच पोलिस फौजफाटा घटनास्थळी दाखल झाला. आरोपींच्या शोधार्थ परिसरात नाकेबंदी करण्यात आली. औरंगाबादचे पोलिस आयुक्त अमितेश कुमार हे दिवसभर घटनास्थळी ठाण मांडून होते. त्यांच्या मार्गदर्शनाखाली तपासाने गती घेतली होती. वाळूज पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक, औरंगाबादच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी काही अंतरापर्यंत आरोपींचा पाठलाग केला. पण, तरीही त्यांच्या तावडीतून निसटून आरोपींनी काही वेळातच औरंगाबाद जिल्ह्याच्या हद्दीबाहेर पलायन केले होते.

थरारक पाठलाग
शाहरूखकाळेला गोळ्या घालून ठार मारल्यानंतर तिन्ही आरोपी दुचाकीवरून पसार झाले. पोलिसांना घटना समजताच गुन्हे शाखेचे निरीक्षक कांचन चाटे सहकाऱ्यांसह नगर रोडवर आले. तेथे आलेल्या आरोपींनी पोलिसांना पाहून नेवाशाच्या दिशेने वेगाने पलायन केले. पोलिसांनी त्यांच्या जवळ जात आरोपींना पकडण्याचा प्रयत्न केला. पण, तिन्ही आरोपींनी शिताफीने हुलकावणी देत पुन्हा वेगाने पलायन केले. गंगापूर शहरात हा थरारक पाठलाग सुरू होता.
गंगापूर शहरातील गर्दीचा गैरफायदा घेत तेथील गुन्हे शाखेच्या पोलिसांना हुलकावणी देण्यात आरोपी यशस्वी झाले. मात्र, नगर गुन्हे शाखेच्या पोलिसांच्या पथकाला हुलकावणी देण्यात त्यांना यश आले नाही. अन् शुक्रवारी रात्री मनोहर काळे गजाआड झाला.

औरंगाबाद पोलिसांच्या हवाली
मनोहर काळे, रमेश छगन भोसले अल्ताफ छगन भोसले यांच्याविरुद्ध राहुरी, पाथर्डी, नेवासे तालुक्यांमध्ये दरोडे, घरफोड्यांचे गुन्हे आहेत. औरंगाबाद नाशिक जिल्ह्यातही दरोड्याचे गुन्हे केलेले आहेत. मात्र, त्यांचा ठावठिकाणा लागत नव्हता. आता नगर एलसीबीने त्याला पकडल्यामुळे अनेक गुन्ह्यांची उकल होण्याची शक्यता आहे. औरंगाबाद पोलिसांचा तपास पूर्ण होताच त्याला नगर पोलिस आपल्या ताब्यात घेतील, असे पोलिस सूत्रांनी सांगितले.

आधी केले दुर्लक्ष
नगरएल सीबीच्या पथकाने काही महिन्यांपासून चांगली कामगिरी करीत कुख्यात टोळ्यांचे म्होरके गजाआड केलेले आहेत. पुणे ग्रामीण पोलिसांच्या हद्दीत केलेल्या दरोडा खुनाच्या गुन्ह्यातील आरोपीही याच टीमने पकडले होते. पण, तेथील तपासी अधिकाऱ्यांनी या कामगिरीचे श्रेय परस्पर लाटले. त्यामुळे नगरच्या एलसीबीच्या पथकाची कामगिरी दुर्लक्षितच राहिली होती. यावेळी मात्र या टीमच्या धाडसाचे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी चांगले कौतुक केले आहे.

जिगरबाज कामगिरी
कुख्यात दरोडेखोर मनोहर काळे, साकेगाव शिवारात असल्याची गोपनीय माहिती गुन्हे शाखेचे निरीक्षक शशिराज पाटोळे यांना मिळाली. त्यांच्या सूचनेनुसार फौजदार राजकुमार हिंगोले, पोलिस नाईक दिगंबर कारखेले, मल्लिकार्जुन बनकर, विशाल अमृते, मधुकर शिंदे, सागर सुलाने, नामदेव जाधव, लक्ष्मण बोडखे यांनी साकेगाव शिवारात सापळा रचला. नंतर पोलिसांना पाहून पळणाऱ्या मनोहरच्या त्यांनी तब्बल तीन किलोमीटरपर्यंत पाठलाग करून मुसक्या आवळण्यात यश मिळवले.

‘पीआय’वर गोळीबार
काही महिन्यांपूर्वी मनोहर काळेच्या टोळीचा नेवासे पोलिसांनी पाठलाग केला. त्यावेळी पथकाचे नेतृत्व करणाऱ्या पोलिस निरीक्षक अनिल लंभाते यांच्या दिशेने गोळीबार झाला होता. अनपेक्षित हल्ल्यामुळे पोलिस हात हलवत माघारी परतले. शुक्रवारी मध्यरात्री मात्र जिगरबाज पोलिस उपनिरीक्षक राजकुमार हिंगोले यांच्या पथकाने मनोहरच्या मुसक्या आवळल्या. अन् नंतरच्या चौकशीत त्याने आपल्या गुन्ह्यांची कबुली िदली.
बातम्या आणखी आहेत...