आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

नाट्य संमेलनामुळे जोडले गेले नगरच्या रसिकांशी नाते..

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर - दहा वर्षांपूर्वी नगर येथे झालेल्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचे अध्यक्षपद भूषवण्याचा मान संगीत रंगभूमीवरील ज्येष्ठ कलावंत जयमाला शिलेदार यांना मिळाला होता. त्यांच्या कारकिर्दीचा गौरव या संमेलनात झाला. तेव्हाच्या आठवणींना नगरच्या अनेक रंगकर्मींनी उजाळा दिला.

जयमाला शिलेदार यांच्या निधनाचे वृत्त गुरूवारी सकाळी समजताच अनेकांना धक्का बसला. 2, 3 व 4 मे 2003 रोजी फिरोदिया शाळेच्या मैदानावर झालेल्या नाट्य संमेलनाच्या त्या अध्यक्ष होत्या. या संमेलनात त्यांनी नाट्यगीतेही सादर केली. संमेलनाच्या काळात त्यांच्याबरोबर नगरचे ज्येष्ठ रंगकर्मी प्रा. मकरंद खेर यांच्या पत्नी शुभदा होत्या. तेव्हाची आठवण जागवताना शुभदा खेर म्हणाल्या, जयमालाबाई संकेत हॉटेलमध्ये उतरल्या होत्या. त्यांच्या दोन दिवसांच्या वास्तव्यात कंपनी देण्यासाठी मी बरोबर होते. एवढय़ा मोठय़ा कलावंत असूनही त्या अतिशय साध्या होत्या. संमेलनाच्या पहिल्या दिवशी दिंडी निघाली, तेव्हाही मी त्यांच्यासमवेत होते. यावेळी त्यांच्याशी खूप गप्पा मारता आल्या.

प्रा. खेर म्हणाले, नाट्यसंमेलनाचे निमंत्रण देण्यासाठी जी मंडळी पुण्याला गेली होती, त्यात मी होतो. कलावंत म्हणून नव्हे, तर एक गृहिणी म्हणून जयमालाबाईंनी आमचे अतिशय अगत्याने स्वागत केले. खरा कलावंत माणूस म्हणून किती महान असतो हे तेव्हा समजले. बालगंधर्वांनंतर संगीत रंगभूमी जिवंत ठेवण्याचं काम जयमालाबाईंनी केलं, अन् तेही स्वत:कडे जराही मोठेपणा न घेता. शाळा-कॉलेजात असताना नगरला झालेली संगीत नाटके मी पाहिली आहेत. मानापमान आणि अन्य नाटकांतील त्यांच्या भूमिका कायम स्मरणात राहतील अशा आहेत.

ज्येष्ठ अभिनेते सदाशिव अमरापूरकर म्हणाले, कलावंत म्हणून जयमालाबाई मनस्वी होत्या. त्या फार र्शेष्ठ दर्जाच्या गायिका होत्या. त्यांची नाटकांतील गाणी मी ऐकली आहेत. त्यांच्या निधनाने संगीत मराठी रंगभूमीवर मोठा कलावंत हरपला आहे.

अखिल भारतीय नाट्य परिषदेचे पदाधिकारी सतीश लोटके, पी. डी. कुलकर्णी, प्रसाद बेडेकर आदी नगरचे रंगकर्मी जयमालाबाईंच्या अंत्यदर्शनासाठी पुण्याला गेले होते. त्यांना र्शद्धांजली वाहताना लोटके म्हणाले, नगरच्या नाट्य संमेलनास जयमालाबाईंनी खूप सहकार्य केले. संगीत नाटकातील कलावंताला त्यांच्या रूपाने प्रथमच नाट्य संमेलनाचे अध्यक्षपद भूषवण्याचा मान मिळाला होता, याचा आनंद मोठा होता. त्यांनी या संमेलनात नाट्यगीतांचा कार्यक्रमही सादर केला होता.

जयमाला शिलेदार यांच्या जाण्याने नाट्यभूमीवरील महान व्यक्ती हरपली आहे. नगरच्या कलावंतांना त्यांच्या जाण्याने दु:ख झाले, असे श्रीपाद शहाणे म्हणाले.