आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुण्यातील पोलिस निरीक्षकाच्या पिस्तुलासह दागिन्यांची चोरी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - पुणे शहर युनिट एकच्या गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक रघुनाथ विठ्ठल फुगे यांच्या सर्व्हिस रिव्हॉल्वरसह सोन्याचे दागिने ठेवलेली पर्स चोरीला गेली. हा प्रकार गुरुवारी दुपारी साडेअकरा वाजेच्या सुमारास टिळक रोडवरील सरस्वती मंगल कार्यालयात घडली. फुगे हे कुटुंबियांसह भाचीच्या लग्न समारंभाकरिता नगरला आले होते. चोरी गेलेल्या पर्समध्ये पिस्तुलासह १० राऊंड, लाखांची रोकड, सोन्याचे दागिनेही होते. याप्रकरणी त्यांच्या फिर्यादीवरुन कोतवाली पोलिस ठाण्यात चोरीचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
रघुनाथ फुगे यांच्या जामखेड येथील भाचीचा सरस्वती सांस्कृतीक भवनमध्ये लग्न समारंभ हेाता. त्यामुळे ते बुधवारी दुपारीच नगरला हॉटेल पॅराडाईजमध्ये येऊन थांबलेले होते. तेव्हा त्यांचे सर्व्हिस रिव्हॉल्वर त्यांच्याजवळच होते. गुरुवारी सकाळी अकरा वाजता लग्नाकरिता घेतलेले फर्निचर मंगल कार्यालयात आले नाही, म्हणून फुगे यांनी नवी पेठेतील फर्निचर दुकानमालकाला फोन केला. त्याने तुमची ऑर्डर आत्ताच मंगल कार्यालयात पाठवली असल्याचे सांगितले. त्यावर फुगे यांनी कार्यालयाच्या गेटवर येऊन खात्री केली असता फर्निचरचा टेम्पो आल्याचे दिसले.

त्यांनी नातेवाईकांच्या मदतीने फर्निचर टेम्पोतून उतरुन घेऊन मंगल कार्यालयातील स्टेजजवळ आणून ठेवले. हे करत असताना फुगे यांनी स्वत:चे रिव्हॉल्वर काही वेळासाठी पत्नीकडे ठेवायला दिले. त्यांनी ते स्वत:च्या पर्समध्ये ठेवून पर्स स्टेजवरच ठेवली. नंतर त्या महिलांना गजरे वाटण्याच्या कामात गर्क झाल्या. फर्निचर लावण्याचे काम आटोपल्यानंतर फुगे यांनी पत्नीकडे रिव्हॉल्वर परत मागितले. तेव्हा त्यांनी पर्सकडे पाहिले असता त्यांना स्टेजवर ठेवलेली पर्स गायब झाल्याचे लक्षात आले. त्यामुळे त्यांनी तात्काळ नियंत्रण कक्ष कोतवाली पोलिसांना घटनेची माहिती कळवली.

कोतवाली पोलिसांनी तात्काळ धाव घेत शोधाशोध केली, पण पर्स सापडली नाही. त्यामध्ये रिव्हॉल्वर, १० जिवंत राऊंड, लाख रुपयांची रोकड, २५ हजार रुपयांचे सोन्याचे दागिने, स्टेट बँक ऑफ इंडियाचे एटीएम, मतदान कार्ड, आधारकार्ड, घराच्या चाव्या, आदी किरकोळ सामान होते. याप्रकरणी पोलिस निरीक्षक फुगे यांनी कोतवाली पोलिस ठाण्यात फिर्याद नोंदवली आहे. त्यावरुन अज्ञात व्यक्तीविरुद्ध चोरीचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे. अधिक तपास कोतवाली पोलिस करीत आहेत. दरम्यान, पोलिसांनी मंगल कार्यालयात असलेल्या सीसीटीव्हींचे फुटेज तपासाकरिता ताब्यात घेतले आहे.