नगर - मोटारसायकल चोरून विक्री करणारे रॅकेट स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी उघडकीस आणले आहे. पारनेर तालुक्यातील कान्हूर पठार, ढोकी, धोत्रे व ढवळपुरी परिसरातून पाच जणांच्या टोळीला गुन्हे शाखेच्या पोलिसांनी गजाआड केले. त्यांच्या ताब्यातून २० चोरीच्या मोटारसायकली पोलिसांनी जप्त केल्या आहेत. तब्बल चार वर्षांनंतर स्थानिक गुन्हे शाखेने मोटारसायकल चोरांविरुद्ध अशा स्वरूपाची मोठी कारवाई केली आहे.
खुनाच्या गुन्ह्याचा माग काढत असताना गुन्हे शाखेच्या पोलिसांना या रॅकेटचा उलगडा झाला. पोलिस अधीक्षक लखमी गौतम, अितरिक्त पोलिस अधीक्षक शैलेश बलकवडे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक शशिकांत पाटोळे यांच्या पथकातील पोलिसांनी ही कामगिरी केली. शहरातील दिल्लीगेट परिसरात काही मोटारसायकल चोरटे येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून आरोपींना ताब्यात घेतले.
स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक संजय पाटील, सहायक निरीक्षक किशोर परदेशी, सुनील टोणपे, राहुल गायकवाड, सहायक फौजदार कृष्णा वाघमारे, हेड कॉन्स्टेबल रमेश बारवकर, रमेश लोळगे, कॉन्स्टेबल बाब गरड, पोलिस नाईक दीपक हराळ, रमेश माळवदे, संदीप पवार, दत्तात्रय हिंगडे, चालक भाेपळे यांच्या पथकाने ही कारवाई केली. आरोपींना सध्या ताेफखाना पोलिस ठाण्यात नोंद असलेल्या गुन्ह्यात अटक करण्यात आलेली आहे. शुक्रवारी दुपारी त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्यांना २२ सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.
विकास हिरामण भालेराव (रा. ढवळपुरी, ता. पारनेर), सचिन बाळासाहेब जपकर (रा. नेप्ती, ता. नगर), शकील खुदा शेख (रा. ढवळपुरी, ता. पारनेर), रसूल बालम पठाण (रा. ढोकी, ता. पारनेर) व रियाज इलाहीबक्ष तांबोळी (रा. कान्हूर पठार, ता. नगर) अशी पोलिसांनी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. त्यांच्या ताब्यातून ८ लाख ८१ हजार रुपयांच्या हीरो
होंडा स्प्लेंडर, सीबीझेड, अपाची, बजाज डिस्कव्हर कंपनीच्या एकूण २० मोटारसायकली हस्तगत करण्यात आल्या आहेत. त्यांच्याकडून आणखी काही मोटारसायकली मिळण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे.
विहिरीत लपवली वाहने
आरोपींनी चोरलेल्या मोटारसायकली पारनेर तालुक्यातील विविध भागांमध्ये असलेल्या विहिरींमध्ये टाकून लपवल्या होत्या, अशी माहिती प्राथमिक तपासात समोर आली आहे. गुन्हे शाखेच्या पोलिसांनी पकडलेल्या आरोपींमध्ये एका प्राध्यापकाच्या मुलाचाही समावेश आहे. या आरोपींकडून आणखी काही मोटारसायकल चोरीच्या गुन्ह्यांची उकल होण्याची शक्यता आहे. त्यांनी या मोटारसायकली कोठून चोरल्या, आतापर्यंत किती मोटारसायकली विकल्या, कोणा-कोणाला विकल्या, यामध्ये आणखी काही आरोपींचा सहभाग आहे का, याबाबत पोलिस अधिक तपास करीत आहेत.