आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शहीद जवानाच्या पुतळ्याची चोरी; पारनेर तालुक्यातील वडनेर हवेलीतील घटना

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कान्हूर पठार- पारनेर तालुक्यातील वडनेर हवेली येथील शहीद जवान अरुण बबन कुटे यांच्या ब्रांझच्या पुतळ्याची गुरुवारी रात्री चोरी झाली. कुटे कुटुंबीय शुक्रवारी सकाळी पुतळ्याच्या दर्शनासाठी स्मारकात गेल्यानंतर ही चोरीची घटना उघड झाली. 
 
कुटे हे लष्करात जम्मू काश्मीर मधील पूंछमध्ये असताना १९ डिसेंबर २००३ मध्ये झालेल्या लढाईत शहीद झाले होते. ग्रामस्थ, नातेवाईक कुटुंबीयांनी देशासाठी शहीद झालेल्या जवानाची आठवण म्हणून डिसेंबर २००८ मध्ये ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या हस्ते शहीद अरुण कुटे यांचा ६० किलो वजनाचा ब्रांझ धातुचा पुतळा बसवण्यात आला. हे स्मारक रस्त्याच्या कडेला आहे. शहीद कुटे यांचे वडील बबन कुटे हे रात्री घराबाहेर झोपले होते. साठ किलो वजनाचा पुतळा उचलणे एकट्या माणसाचे काम नाही. 

सुपा पोलिस स्टेशनचे निरीक्षक श्याम सोमवंशी यांच्याशी संपर्क साधला असता चोरांनी चोरीसाठी चारचाकी वाहनाचा वापर केल्याची शक्यता त्यांनी वर्तवली. दरम्यान, चोरीचा गुन्हा कुटुंबीय ग्रामस्थांनी नोंदवल्यावर पोलिस निरीक्षक सोमवंशी, उपअधीक्षक आनंद भोईटे, पारनेर पोलिस ठाण्याचे निरीक्षक गाडे कर्मचाऱ्यांनी शुक्रवारी दुपारी वडनेरला भेट देउन माहिती घेउन तपास सुरू केला. ग्रामस्थांनी शहीदाच्या पुतळ्याच्या चोरीचा निषेध करुन संताप व्यक्त केला. देशातील जवान सीमेवर लढतानाही सुरक्षित नाहीत शहीद झाल्यावर त्यांचे पुतळेही सुरक्षित नाहीत, अशी खंत ग्रामस्थांनी व्यक्त केली. शहीद कुटे यांचा पुतळ्याच्या चोरीचा तपास लवकर करावा अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा ग्रामस्थ हनुमंत बढे यांनी दिला आहे. 

तपास सुपा पोलिस ठाण्याचे निरीक्षक सोमवंशी करत आहेत. दरम्यान, सायंकाळी शहीद जवान कुटे यांचे भाऊ सुनील कुटे, वडनेर हवेलीचे सरपंच, उपसरपंच ग्रामस्थांनी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांची भेट घेऊन त्यांना या प्रकाराची माहिती दिली. अण्णांनी यासंदर्भात पोलिसांची दूरध्वनीवरून चर्चा करून या प्रकरणाची चौकशी करून पुतळा लवकर मिळवून द्यावा, अशी मागणी त्यांनी केल्याची सुनील कुटे यांनी सांगितले. 
बातम्या आणखी आहेत...