आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पाऊण तासात लांबवली ९ महिलांची मंगळसूत्रे, हळदीकुंकवाचा मुहूर्त साधत धूमस्टाइल चो-या

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर- गौरीगणपतीच्या हळदीकुंकवासाठी दागिने घालून घराबाहेर पडलेल्या सावेडी उपनगरातील अनेक महिलांना चोरांनी बुधवारी लुटले. अवघ्या पाऊण तासात नऊ महिलांचे सुमारे २५ तोळ्यांचे सोन्याचे दागिने चोरट्यांनी धूमस्टाइल ओरबाडून नेले. याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत तोफखाना पोलिस ठाण्यात गुन्हे नोंदवण्याचे काम सुरू होते.
गौरीगणपतीच्या हळदीकुंकवासाठी महिला सोन्याचे दागिने घालून घराबाहेर पडल्या होत्या. सायंकाळी सव्वासात ते आठच्या दरम्यान पाइपलाइन रस्ता ते गुलमोहर रस्ता या परिसरात धूमस्टाईल चोरट्यांनी अक्षरश: धुमाकूळ घातला. तब्बल नऊ महिलांच्या गळ्यातील दागिने या चोरट्यांनी हिसकावून नेले. महिलांनी दिलेल्या माहितीनुसार हे चोर काळ्या रंगाच्या पल्सर गाडीवरून आले होते. पाइपलाइन रस्ता, एकविरा चौक, सोनानगर चौक, गुलमोहर रस्ता, किर्लोस्कर कॉलनी, यशोदानगर, रासनेनगर आदी भागात या घटना घडल्या.
फिर्याद देण्यासाठी तोफखाना पोलिस ठाण्यात संबंधित महिलांची रांग लागली होती. आतापर्यंत एकाच वेळी व अल्पावधीत दागिने चोरीच्या नऊ घटना घडण्याची ही पहिलीच वेळ असल्याने सुरूवातीला पोलिसांचाही विश्वास बसत नव्हता. पायी चालणाऱ्या तसेच दुचाकीवरून जाणाऱ्या महिलांच्या गळ्यातील दागिने ओरबडण्यात आले. रात्री उशिरापर्यंत तोफखाना पोलिस ठाण्यात सर्व महिलांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. एकापाठोपाठ एक तोफखाना पोलिस ठाण्यात आलेल्या महिलांना एकही वरिष्ठ अधिकारी भेटू शकला नाही. त्यामुळे संतप्त झालेल्या काही महिलांनी थेट पोलिस अधीक्षक कार्यालय गाठले. काहींनी मोबाइलवर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र, काही उपयोग झाला नाही. रात्री साडेआठच्या दरम्यान पोलिस उपअधीक्षक यादवराव पाटील तोफखान्यात आले. त्यांच्यासमोर महिलांनी संताप व्यक्त केला.