आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Then Reliability On Pr Aliment Will Be Decreased Says Anna

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

...तर संसदेवरील विश्वास कमी होईल- अण्णा हजारे

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पारनेर- सर्व श्रेणींच्या कर्मचा-यांना लोकपाल कक्षेत घेण्याचा संसदेत झालेला निर्णय मंत्रिमंडळात बदलण्याचे घाटत आहे. संसद ही सर्वोच्च असल्याने या निर्णयात मंत्रिमंडळ बदल करू शकत नाही. तसे झाल्यास संसदेवरील विश्वास कमी होईल आणि त्याचे दूरगामी परिणाम जनतेला भोगावे लागतील, असे पत्र ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांना शनिवारी पाठवले आहे.


श्रेणी एक ते चारमधील सरकारी अधिकारी व कर्मचा-यांना लोकपालच्या कक्षेत घेण्याचा संसदेचा निर्णय झाला असला, तरी श्रेणी तीन व चारच्या कर्मचा-यांना लोकपालच्या कक्षेबाहेर ठेवण्याचे कारस्थान मंत्रिमंडळ स्तरावर चालू आहे. तसे झाल्यास संसदेचे महत्त्व कमी होऊन मंत्रिमंडळाचे महत्त्व वाढणार असल्याने तो संसदेचा अपमानच ठरेल, अशी भीती हजारे यांनी पत्रात व्यक्त केली आहे. सरकारी यंत्रणेतील श्रेणी तीन व चार अधिकारी व कर्मचा-यांकडून मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार आणि जनतेची अडवणूक होते. त्यामुळे या कर्मचा-यांना लोकपाल कक्षेत घेणे गरजेचे आहे. संसदेत सहमतीने घेतलेल्या निर्णयात मंत्रिमंडळ बदल करीत असेल, तर संसद श्रेष्ठ की मंत्रिमंडळ श्रेष्ठ असा प्रश्न निर्माण होणार असल्याने पंतप्रधानांनी यात लक्ष घालून संसदेची प्रतिष्ठा वाचवावी, अशी अपेक्षाही अण्णांनी पत्रात व्यक्त केलीआहे.


लोकसभेच्या हिवाळी अधिवेशनात सक्षम लोकपालसह जनतेची सनद आणि लोकायुक्त नियुक्ती या मागण्या मंजूर होतील, असा आशावादही अण्णांनी व्यक्त केला आहे. सक्षम लोकपालच्या मागणीसाठी अण्णा हजारे यांनी काही दिवसांपूर्वीच बिहारमधील पाटणा येथे सभा घेतली. या वेळीही अण्णा हजारे यांनी लोकपाल कायदा अधिक सक्षम व पारदर्शी करण्याची मागणी लावून धरली होती.