आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कापड दुकानात चोरी करणारे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात झाले कैद

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर- शहरातील आडते बाजार, दाळमंडई परिसरातील सरस्वती साडी डेपो या दुकानात चार चोरट्यांनी शुक्रवारी पहाटे चोरी केली. हे चोरटे रोकड चोरुन नेत असताना दुकानातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात दिसले. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या साह्याने तपासाला सुरुवात केली आहे. विशेष म्हणजे हे दुकान मंगलगेट पोलिस चौकीजवळच आहे.
विजय पप्पुमल सिंधी (कोहिनूर गार्डन, माळीवाडा) यांच्या मालकीच्या सरस्वती साडी डेपो परिसरात शुक्रवारी पहाटे सव्वाचारच्या सुमारास एक आयशर टेम्पो आला. या टेम्पोतून तीनजण खाली उतरले. त्यांनी परिसरात टेहळणी करुन सरस्वती साडी डेपोचे शटर उचकटले. त्यापैकी एकजण हातात टॉर्च घेऊन दुकानात गेला. नंतर त्याने दुकानातील सर्व टेबलचे ड्रॉवर स्क्रू ड्रायव्हरच्या साह्याने उचकटले. नंतर चोरट्याने दुकानातील सामानाची उचकापाचक करुन रोकड चोरली. साडेचारच्या सुमारास तो दुकानाच्या बाहेर आला.
बाहेर थांबलेले दोघेजण दुकानातील चोरटा असे तिघेही पुन्हा टेम्पोमध्ये बसून मंगलगेटच्या दिशेने निघून गेले. हा सर्व प्रकार दुकानात दुकानाबाहेर असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात चित्रीत झाला आहे. सकाळी सहाच्या सुमारास शेजारी राहणारे नारळाचे व्यापारी सुंदर गांधी यांना दुकानाचे शटर उचकटल्याचे दिसले.
त्यांनी तत्काळ पप्पुमल यांना फोन करुन दुकानात चोरी झाल्याची माहिती दिली. लगेच विजय सिंधी तेथे आले. चोरी झाल्याचे त्यांनी तोफखाना पोलिसांना कळवले. पोलिसांनी पंचनामा केला. पोलिसांनी सीसीटीव्हीचे चित्रीकरण पाहिले असून त्यादृष्टीने तपासाची सूत्रे वेगाने फिरवली आहेत.