आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

औरंगाबाद महामार्गावर धाक दाखवून जबरी चोरी

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर - मध्यरात्री वाहने अडवून प्रवाशांना व वाहनचालकांना लुटण्याचे प्रकार वाढले आहेत. बुधवारी मध्यरात्री नगर-औरंगाबाद महामार्गावर दुचाकीवरून आलेल्या लुटारूंनी चालकाला जबर मारहाण करून सोनालिका ट्रॅक्टर लांबवला.

गफार नसार खान (21, राधानगरी, ता. कमान, जि. भरतपूर) हा सोनालिका ट्रॅक्टर घेऊन औरंगाबादहून नगरच्या दिशेने येत होता. मध्यरात्री अडीच वाजता शिंगवे फाट्यानजीक असलेल्या हॉटेल संदीपजवळ तो आला असता पाठीमागून दुचाकीवर दोन लुटारू आले. त्यांच्यापैकी एकाने गफारच्या कानावर काठीने वार करून त्याला ट्रॅक्टर थांबवायला सांगितला. गफारने घाबरून ट्रॅक्टर रस्त्याच्या बाजूला घेतला.

लुटारूंनी गफारला शिवीगाळ करीत लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. काठीचा धाक दाखवत त्याला ट्रॅक्टरमधून खाली उतरायला भाग पाडले. तो उतरताच एकाने ट्रॅक्टरसह पलायन केले. नंतर गफारने रस्त्याने जाणार्‍या काही वाहनांना हात करून मदतीची याचना केली. या घटनेची माहिती समजल्यानंतर एमआयडीसी पोलिस ठाण्याचे कॉन्स्टेबल पालवे यांनी रुग्णालयात दाखल केलेल्या नोंदीवरून गफारचा जबाब नोंदवला.

गफारने दिलेल्या जबाबावरून सोनई पोलिस ठाण्यात अज्ञात लुटारूंविरुद्ध जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास सहायक निरीक्षक एस. एस. पाटील करीत आहेत. दरम्यान, हा गुन्हा करण्याची पद्धत लक्षात घेता महामार्गावर अशा पद्धतीचे गुन्हे करणारी लुटारूंची एखादी टोळी सक्रिय झाली असावी, असा पोलिसांचा कयास आहे.