आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

चोरट्यांची नजर आता चारचाकी वाहनांवर...

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - शहर उपनगरात चारचाकी वाहनांची चोरी होण्याचे प्रमाण वाढले आहे. एका आठवड्यातच शहरात दोन चारचाकी वाहनांची चोरी झाली आहे. एका घटनेत भाड्याने घेतलेली गाडी चालकाला धाक दाखवून जबरदस्तीने चोरून नेली, तर दुसऱ्या घटनेत अपार्टमेंटमधील पार्किंगमध्ये लावलेली गाडी चोरट्यांनी चोरून नेली. याप्रकरणी कोतवाली एमआयडीसी पोलिसांनी चोरीचे गुन्हे नोंदवले आहेत. मोटारसायकल चोरांच्या अनेक टोळ्या पोलिसांनी गजाआड केल्या आहेत. पण, आता चारचाकी वाहनचोरांनीही पोलिसांना अाव्हान दिले आहे.

गेल्या आठवड्यात रामदास मोहन मुरूमकर यांची स्कॉर्पिओ बळजबरीने चोरून नेली. दाऊद अब्दुल रहिम खान, रा. भेंडीबाजार, मुंबई या इसमाने सप्टेंबरला त्यांची पांढऱ्या रंगाची स्कॉर्पिओ क्र. एमएच १६ एटी ०२०० भाड्याने घेतली. स्वत: मुरूमकर हेच ड्रायव्हिंग करत होते. सप्टेंबरला माळीवाड्यातील निसर्ग लॉजसमोर दाऊदने त्यांना बळजबरीने खाली उतरवले. नंतर शिवीगाळ करून लाख रुपये किमतीच्या स्कॉर्पिओ वाहनासह दाऊद पसार झाला. मुरूमकर यांनी कोतवाली पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. पोलिसांनी याप्रकरणी जबरी चोरीचा गुन्हा नोंदवला आहे. पोलिस उपनिरीक्षक जी. डी. करेवाड हे या गुन्ह्याचा अधिक तपास करीत आहेत.

दुसरी वाहन चोरीची घटना नवनागापूर परिसरात घडली. अप्पासाहेब मारुती बावके, रा. द्वारकामाई अपार्टमेंट यांनी त्यांच्या मालकीची शेवरोलेट कंपनीची ग्रे रंगाची तवेरा गाडी क्र. एमएच १६ एटी २४१४ पार्किंगमध्ये लावली होती. मंगळवारी मध्यरात्री ते बुधवारी पहाटेच्या सुमारास कोणीतरी अज्ञात चोरट्याने त्यांची अडीच लाख रुपये किमतीची तवेरा गाडी चोरून नेली. एक दिवस शोधाशोध करूनही गाडी सापडल्यामुळे बावके यांनी पोलिसांत धाव घेत वाहन चोरीला गेल्याची फिर्याद नोंदवली. त्यावरून एमआयडीसी पोलिसांनी चोरीचा गुन्हा नोंदवला आहे.

चोरीचे वाहन घेणे गुन्हा
^चोरीची वाहने, कागदपत्रांची पूर्तता नसलेली बेवारस वाहने घेण्याचा मोह टाळावा. चोरीची वाहने विकत घेणे हासुद्धा कायद्याने गुन्हाच आहे. शक्यतो स्वस्तात मिळणारे अनोळखी व्यक्तीकडून वाहन विकत घेणेही टाळावे. एखाद्या वाहनाबद्दल किंवा व्यक्तीबद्दल काही संशय आल्यास तत्काळ पोलिस ठाण्यात किंवा पोलिस नियंत्रण कक्षामध्ये १०० या क्रमांकावर संपर्क साधावा.'' डॉ.सौरभ त्रिपाठी, पोलिस अधीक्षक.

काळजी घेणे आवश्यक
चारचाकी वाहनचोरीचे प्रकार अलीकडे वाढले असल्यामुळे वाहनांची काळजी घेणे गरजेचे आहे. आपले वाहन सुरक्षित ठिकाणी लॉक करूनच पार्किंग करावे. खूप वेळेसाठी वाहन पार्किंग केल्यास अधूनमधून नजर ठेवावी. रात्रीच्या प्रवासादरम्यान थांबायचे असल्यास उजेड, तसेच सीसीटीव्ही कॅमेरा असलेल्या ठिकाणीच वाहन पार्किंग करावे. एकत्रित प्रवास करताना लोखंडी पोल, जाळी अशा स्थावर वस्तूंना अडकावून वाहन लॉक करावे. आपल्या वाहनाला सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून अद्ययावत अलार्म असलेली उपकरणे बसवून घ्यावीत.

लिफ्टचा बहाणा अंगलट
रात्रीच्यावेळी बसस्थानक अथवा महामार्गावर अनोळखींना लिफ्ट देणे महागात पडू शकते. दोन आठवड्यांपूर्वी एका वाहनचालकाने अनोळखी व्यक्तींना लिफ्ट दिली. काही अंतरावर पुढे गेल्यानंतर त्या पाच अनोळखी प्रवाशांनी त्याला चास शिवारात वाहन थांबवायला लावले. नंतर त्याला मारहाण करून त्याच्या जवळची रोकड, सोन्याचे दागिने हिसकावून घेतले. नंतर त्याला तेथेच सोडून त्याच्या कारसह पोबारा केला. चोरट्यांनी वाहन दुसरीकडे सोडून दिले, तर ते मिळू शकते. मात्र, परराज्यात विक्री केल्यास अशा वाहनांचा तपास लागणे अतिशय कठीण होऊन बसते.

महामार्गावरील वाहनचोरी
महामार्गावर जबरी लुटमार करणाऱ्या टोळ्यांनीही बऱ्याचदा वाहन चोरून नेल्याचे प्रकार घडलेले आहेत. बहुतांश वेळा ट्रकचालकाला धाक दाखवून रस्त्यात अडवले जाते. नंतर डोळ्यात मिरचीची पूड टाकून, जबर मारहाण करून, रोकड हिसकावून ट्रकसह पोबारा केला जातो. शक्यतो असे वाहन रात्रीतून परजिल्ह्यात निर्जन ठिकाणी नेले जाते. मालट्रकमध्ये लोखंडी सळ्या; अथवा इतर मौल्यवान मुद्देमाल माल असेल, तर निर्जन ठिकाणी तो उतरवून मालट्रक दुसऱ्या दिवशी रात्री तिसऱ्याच ठिकाणी नेऊन सोडला जातो. अशा घटनांमध्ये काही दिवसांनी का होईना, पण ट्रक सापडतो.