आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘आंतरजिल्हा आपसी’तील तेरा शिक्षकांचे निलंबन

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - मागील दोन ते तीन महिन्यात इतर जिल्ह्यातून नगर जिल्ह्यात आपसी आंतरजिल्हा बदलीने बदलून आलेले काही शिक्षक आजतागायत नियुक्तीच्या ठिकाणी हजर झाले नाहीत. त्यामुळे संबंधित शाळांमधील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. याप्रकरणी मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र बिनवडे यांनी १३ शिक्षकांचे शनिवारी तडकाफडकी निलंबन केले.
जिल्ह्यात शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदलीचा विषय सातत्याने गाजत आहे. अनेक वर्षांपासून जिल्ह्यात येण्यासाठी दीड हजारांवर शिक्षकांनी आंतरजिल्हा बदलीसाठी प्रस्ताव दिले आहे. पण तांत्रिक अडथळे सुरूच असल्याने या बदल्यांना मुहूर्त लागत नाही. मागील वर्षी जिल्हा परिषदेने या बदल्यांसाठी २०७ शिक्षकांना नाहरकत प्रमाणपत्र दिले. त्यावेळी जागाही रिक्त होत्या. परंतु, रिक्त जागांवर न्यायालयाच्या आदेशानुसार प्रतीक्षा यादीतील पात्र शिक्षकांना नियुक्त्या देण्यात आल्या. त्यानंतर शिक्षकांनी या बदल्यांसाठी बेमुदत उपोषणाचे हत्यार उपसले. यात काही महिला शिक्षकांची प्रकृती खालावल्याने त्यांना रुग्णालयातही दाखल करण्यात आले होते. प्रशासनासह पदाधिकारीही या बदल्यांसाठी आग्रही आहेत. पण अजूनही प्रत्यक्ष बदल्या होऊ शकल्या नाहीत. या पार्श्वभूमीवर आपसी बदल्यांचा पर्याय काही शिक्षकांनी निवडला. शिक्षण विभागाने जुन ते जुलै या कालावधीत सुमारे ३५ ते ४० आपसी आंतरजिल्हा बदल्यांना मंजुरी दिली. मंजुरी देताना संबंधित शिक्षकांना नियुक्तीच्या ठिकाणी हजर राहण्याचेही आदेश दिले. आपसी बदलीला हिरवा कंदील मिळाल्यानंतर काही शिक्षकांनी अंशत: बदलासाठी अर्ज दाखल केले होते. नियुक्तीच्या ठिकाणाहून सोयीच्या ठिकाणी अंशत: बदलाच्या प्रस्तावावर नियुक्ती मिळेल, अशी अपेक्षा संबंधित शिक्षकांना होती. बहुतेक शिक्षक या जागांवर रुजू झाले, पण १४ शिक्षक या जागांवर हजर झाले नाहीत. यासंदर्भात जिल्हा शिक्षणाधिकारी अशोक कडूस यांनी संबंधित शिक्षकांच्या निलंबनाचा प्रस्ताव मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र बिनवडे यांच्याकडे पाठवला होता. दरम्यान, जे शिक्षक निलंबनाची कारवाई करण्यापूर्वी शाळेत हजर झाले, पण शिक्षणाधिकाऱ्यांना याबाबत माहिती नसेल, अशा शिक्षकांवर कारवाई होणार नसल्याचे सूत्रांकडून समजले. शनिवारी दुपारी अंशत: बदल्याची विनंती धुडकावत प्रशासनाने १३ शिक्षकांचे निलंबन केले.

सोयीची ठिकाणे नाहीच
ज्याशिक्षकांवर निलंबनाची कारवाई केली, अशा शिक्षकांना इतर शाळांचे मुख्यालय दिले जाते. त्यातही प्रशासनाने सोयीची ठिकाणी टाळून मुख्यालये दिली आहेत. त्यामुळे शिक्षकांचे निलंबन होऊनही गैरसोयच झाली.

पदाधिकारी पडले तोंडघशी
आपसी बदलीने जिल्ह्यात बदलून आलेल्या काही शिक्षकांना नियुक्तीच्या ठिकाणात अंशत: बदल करण्यासाठी पदाधिकाऱ्यांनीही शिफारस केली. पण प्रशासनाच्या कारवाईमुळे पदाधिकारीही तोंडघशी पडले आहेत.

आदेश वेळेत बजावणे आवश्यक
निलंबनाच्या प्रस्तावावर सीईओंची स्वाक्षरी झाली असली तरी शिक्षण विभागाने आदेश तत्काळ बजावणे आवश्यक आहे. विलंब केला तर कारवाईची भणक लागलेले शिक्षक हजर होतील. आता पर्यंत हजर झाल्याप्रकरणी प्रशासन काय कारवाई करणार, याकडे लक्ष लागले आहे.
या शिक्षकांचे झाले निलंबन
दादासाहेब दौंडे, सुवर्णा भोर, सुरेखा कोळपकर, किशोर कुऱ्हे, जनार्दन कन्हेरकर, सचिन गायकवाड, राजेश पठारे, संगीता मते (जामखेड), संध्या दळवी (कर्जत), सुनील शेळके (पाथर्डी), शरद आहेर, अप्पा कांबळे (श्रीगोंदे), पंकज शिंदे (कोपरगाव).
हजर झाल्याने कारवाई
ज्या शाळांमध्ये आपसी बदलीने शिक्षकांना नियुक्ती मिळाली. त्या शाळेत संबंधित शिक्षक हजर झाले नाही. त्यामुळे प्रगत शैक्षणिक अभियानात अडचणी निर्माण झाल्या. याप्रकरणी संबंधित १३ शिक्षकांवर निलंबनाची कारवाई केली. अशोक कडूस, जिल्हा शिक्षणाधिकारी.
बातम्या आणखी आहेत...