संगमनेर- मंत्रिमंडळात काम करताना आतापर्यंत प्रामाणिकपणो सामान्यांच्या हिताचे निर्णय घेत आलो. असे असताना मला अडचणीत आणून बदनाम करण्यासाठी काही विघ्नसंतोषी मंडळी प्रयत्न करत आहेत. त्यामुळे पुढील काळात आपल्यापुढे अडचणी नाहीत असे समजू नका, अशा शब्दांत महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
खांडगाव येथे शुक्रवारी मंत्री थोरात यांच्या वाढदिवसानिमित्त अभिष्टचिंतन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते. आमदार डॉ. सुधीर तांबे अध्यक्षस्थानी होते. जयंतमहाराज बोधले, रयत शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष डॉ. रावसाहेब शिंदे, ज्येष्ठ पत्रकार मधुकर भावे, आमदार प्रसाद ठाकूर, आमदार भाऊसाहेब कांबळे, जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष जयंत ससाणे, जिल्हा बँकेचे अध्यक्ष बाजीराव खेमनर, कांचन थोरात, माजी नगराध्यक्ष दुर्गा तांबे आदी यावेळी उपस्थित होते.
मंत्री थोरात म्हणाले, विलासराव देशमुख यांनी धाकट्या भावाप्रमाणो माझ्यावर प्रेम केले. पाटबंधारे राज्यमंत्रिपद मिळाल्यानंतर निळवंडे धरणाच्या कामाला गती देता आली. कोणाचे वाईट करायचे नाही, हे डोळ्यासमोर ठेवून आतापर्यंत वाटचाल केली. सामान्यांच्या हिताचे काम सरळपणो करत राहिलो. भाऊसाहेब थोरात यांनी या तालुक्यात विकासाची पायाभरणी केली. माणसे जोडली. ही मंडळी आज माझ्यामागे भक्कमपणे उभी आहे.
आमदार डॉ. तांबे, कांबळे. ठाकूर व ससाणे यांचीही भाषणे झाली. मंत्री थोरात यांचा विविध संस्था व व्यक्तींच्या वतीने सत्कार करण्यात आला. प्रास्ताविक लहानभाऊ गुंजाळ यांनी, तर सूत्रसंचालन नामदेव कहांडळ यांनी केले.
जनतेने हृदयात स्थान दिले
संगमनेरच्या जनतेने थोरात यांना आपल्या हृदयात स्थान दिले आहे. 1985 पासून सातत्याने संगमनेरकर त्यांच्यासोबत आहेत. सहकारातील एक नावाजलेले व्यक्तिमत्व म्हणून त्यांचा आदरपूर्वक उल्लेख केला जातो. स्व. भाऊसाहेब थोरात यांची परंपरा त्यांना लाभली आहे. जयवंतराव बोधले महाराज.
थोरात निष्कलंक चारित्र्याचे नेते
महसूलमंत्री थोरात हे निष्कलंक चारित्र्याचे व सत्तेचा मोह नसलेले नेते असून महाराष्ट्राच्या राजकारणातील राजहंस आहेत. सकारात्मक विचारांचे मंत्री म्हणून त्यांच्या कार्याचा राज्यात लौकिक आहे. सर्व जाती-धर्माच्या लोकांना सोबत घेऊन जाणारा, संस्कृती जपणारा हा नेता आहे. त्यांच्यामुळे संगमनेरचे नाव पुढच्या काळातही राज्यभरात गौरवाने घेतले जाईल. मधुकर भावे, ज्येष्ठ पत्रकार.