आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • This Is The Planing To Become Desert Of District

हा तर जिल्ह्याचे वाळवंट करण्याचा डाव

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर - नगर व नाशिक जिल्ह्यातील धरणांतून जायकवाडीसाठी साडेनऊ टीएमसी पाणी सोडण्याचा जलसंपदा मंत्री सुनील तटकरे यांचा निर्णय नगर जिल्ह्याचे वाळवंट करणारा ठरणार असल्याच्या संतप्त प्रतिक्रिया नगरकरांमधून व्यक्त होत आहेत. भंडारदरा व मुळा धरणांमधून पाच टीएमसी पाणी मराठवाड्याकरिता सोडण्यात येणार आहे. त्यामुळे जिल्ह्यातील शेती तर धोक्यात येणार आहेच, पण ऐन उन्हाळ्यात पिण्याच्या पाण्याचा प्रश्नही निर्माण होणार आहे.

तटकरे यांनी औरंगाबादमध्ये जायकवाडीसाठी पाणी सोडण्याचा निर्णय जाहीर केल्यानंतर दुसर्‍याच दिवशी मंगळवारी निळवंडे धरणातून आवर्तनास प्रारंभ करण्यात आला. नगर जिल्ह्यातून पाच, तर नाशिक जिल्ह्यातून साडेचार टीएमसी पाणी सोडण्यात येणार आहे. मात्र, यासंदर्भात सत्ताधारी व जलसंपदा विभागाचे अधिकारी कमालीची गुप्तता पाळत आहेत.

मुळा, भंडारदरा व निळवंडे धरणांतून मराठवाड्यासाठी पाणी सोडल्यामुळे नगर जिल्ह्यातील शेतकरी उद्ध्वस्त होणार आहेत. पाण्याच्या मुद्दय़ावर मराठवाड्यातील नेते एकत्र येतात, पण नगर जिल्ह्यातील मंत्र्यांसह इतर लोकप्रतिनिधी मूग गिळून गप्प बसतात, हा इतिहास यावेळीही अनुभवयाला मिळत आहे. पाणी देण्याच्या निर्णयामुळे संपूर्ण नगर जिल्हा अस्वस्थ झाला आहे. राज्याच्या राजकारणावर छाप टाकणारे नगरचे तिन्ही मंत्री जिल्ह्यातील जनतेसाठी पुढाकार केव्हा घेणार, असा प्रश्न सर्वसामान्यांमधून उपस्थित केला जात आहे. सलग दोन वर्षे दुष्काळाच्या झळा सोसणारा शेतकरी यंदाच्या पावसाने सुखावला. त्याने वर्षभराच्या पिकांचे नियोजनही केले. मुळा धरणात 87 टक्के पाणीसाठा आहे. भंडारदरा व निळवंडे ही धरणे शंभर टक्के भरल्याने यंदा दुष्काळाचे सावट जाईल, अशी अपेक्षा होती. पण जलसंपदा मंत्री तटकरे यांनी जायकवाडीसाठी 9.5 टीएमसी पाणी देण्याचा निर्णय जाहीर केला. या निर्णयामुळे मराठवाड्यात आनंद व्यक्त होत असला, तरी नगर जिल्ह्याला मात्र सलग तिसर्‍या वर्षी दुष्काळाला सामोरे जावे लागण्याची भीती व्यक्त होत आहे.


मला माहितीच नाही..
जायकवाडीला पाणी देण्याबाबत झालेल्या निर्णयाबाबत मला काहीच माहिती नाही. पाणी सोडण्याचा अधिकार राज्य सरकारचा आहे. परंतु, मला यासंदर्भात काहीच कळवलेले नाही. बुधवारी माहिती घेतल्यानंतरच या विषयावर मला बोलता यईल. राधाकृष्ण विखे, कृषिमंत्री


विधानसभेत जाब विचारू
जिल्ह्यातील पाणी जायकवाडीला दिल्यानंतर पाण्याचे नियोजन कोलमडणार आहे. तसेच शहरातील पाणीपुरवठय़ावरही परिणाम होईल. त्यामुळे आता कुणाला सांगून काहीच होणार नाही. हा प्रश्न मी विधानसभेत उपस्थित करेन. अनिल राठोड, आमदार, नगर.


उद्योगधंदे बंद पाडण्याचा डाव
जायकवाडीला पाणी सोडण्याचा निर्णय चुकीचा आहे. या निर्णयामुळे एमआयडीसीत सध्या सुरू असलेले उद्योगही बंद पडतील. हा निर्णय तातडीने मागे घेणे गरजेचे आहे. या निर्णयाविरोधात सर्वांनी लढा उभारणे गरजेचे आहे. अशोक सोनवणे, अध्यक्ष, आमी संघटना.


अर्थव्यवस्था कोलमडणार
नगरची अर्थव्यवस्था शेतीवर आहे, तर औरंगाबादचा श्वास उद्योगांवर अवलंबून आहे. उद्योग व पिण्यासाठी जायकवाडीला पाणी द्यायला हरकत नाही. पण हे पाणी देताना नगरची शेती उद्ध्वस्त करणे नितीमत्तेत बसत नाही. मुळा धरणात अगोदरच 1 हजार 800 दलघफू तूट आहे. पाणी दिल्यास अर्थव्यवस्था कोलमडेल.’’ जयप्रकाश संचेती, जलतज्ज्ञ


किमान 13 टीएमसी सोडावे लागेल
जायकवाडीत नऊ टीएमसी पाणी पोहोचण्यासाठी नाशिक व नगर जिल्ह्यांतील धरणांतून किमान 13 ते 14 टीएमसी पाणी सोडावे लागणार आहे. कोणत्या धरणातून किती पाणी सोडायचे याबाबत अद्यापि निर्णय झालेला नाही. तसेच पाणी सोडण्याबाबत कोणतेही आदेश आले नसल्याचे पाटबंधारे विभागाच्या अधिकार्‍यांनी नाव न घेण्याच्या अटीवर सांगितले.


काय अडचणी येतील
मुळा धरणावर अवलंबून असलेले पिण्याच्या पाण्याचे आरक्षण व शेतीसाठी रब्बी व उन्हाळ्यातील किमान दोन आवर्तने सोडावी लागतात. जिल्ह्याची ही गरज ओळखून या धरणात किमान 24 टीएमसी पाणी असायला आहे. मात्र, सद्यस्थितीत धरणात 22.6 टीएमसी पाणीसाठा आहे. अशा परिस्थितीत जायकवाडीला पाणी दिल्यास उन्हाळ्यात आवर्तने सोडता येणार नाहीत. अशीच अडचण भंडारदरा व निळवंडे लाभक्षेत्रात येणार आहे. त्यामुळे जिल्ह्यातील शेतीसह पिण्याच्या पाण्याचे संपूर्ण नियोजन कोलमडून जाईल.

नगरला उद्ध्वस्त करून मराठवाड्याची शेती फुलणार
मराठवाड्यात दोन वर्षांपासून शेतीसाठी आवर्तने सोडलेली नाहीत. त्यामुळे यावर्षी शेतीसाठी दोन आवर्तने सोडण्यात येणार आहेत. या आवर्तनांमुळे मराठवाड्यातील 62 हजार 500 हेक्टर जमीन सिंचनाखाली येईल. पण त्यामुळे नगर जिल्ह्यातील शेती उद्ध्वस्त होणार आहे.