आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

शिर्डीमध्‍ये आगीत होरपळून तीन भावंडांचा मृत्यू

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

प्रतिनिधी - शिर्डीपासून चार किलोमीटर अंतरावर असलेल्या नांदुर्खी बुद्रुकमध्ये सोमवारी पहाटे झोपडीला आग लागून कुटुंबातील तीन भावंडांचा होरपळून करुण अंत झाला.

दादासाहेब तुकाराम विधाटे (मूळ रा. कनगर, ता. राहुरी) हे साईबाबा संस्थानच्या सुपर सिक्युरिटीच्या ठेकेदाराकडे आठ वर्षांपासून सुरक्षा कर्मचारी होते. नांदुर्खीतील झोपडीत त्यांनी रविवारी रात्री पत्नीसह आकाश (वय 15), मनीषा (13) व विकास (11) या तीन मुलांसह जेवण केले. त्यानंतर मुले झोपडीमध्ये चिमणीच्या प्रकाशात अभ्यास करून झोपी गेले.

मध्यरात्रीनंतर दोनच्या सुमारास झोपडीतून तसेच बाहेरून शेळ्यांचाही ओरडण्याचा आवाज आला. आग पाहून दादासाहेब मुलांना वाचवण्यासाठी धावून गेले, तर त्यांची पत्नी बेशुद्ध झाली. दादासाहेब भाजल्याने जखमी झाले. ग्रामस्थ मदतीसाठी आले. परंतु तोपर्यंत तिन्ही भावंडे प्रचंड होरपळली होती. ग्रामस्थांनी त्यांना तातडीने शिर्डीच्या साईबाबा रुग्णालयात दाखल केले. परंतु त्यापूर्वीच त्यांची प्राण्ज्योत मालवली. दादासाहेब यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तिन्ही मुले कनकुरीतील शाळेत शिक्षण घेत होती. या दुर्घटनेमुळे गावात हळहळ व्यक्त केली जात आहे. या कुटुंबाच्या मदतीसाठी सामाजिक संस्थांनी पुढाकार घेण्याचे आवाहनही करण्यात आले आहे.

एक लाखाची मदत
कृषी व पणनमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी विधाटे कुटुंबीयांना तातडीने एक लाख रुपयांची मदत दिली. घरकुल देऊन कुटुंबाच्या पुनर्वसनासाठी गटविकास अधिका-या ना सूचना दिल्या. नांदुर्खीचे सरपंच ज्ञानदेव चौधरी यांनी कुटुंबाला संसारोपयोगी वस्तू दिल्या. तसेच समाजमंदिरात तात्पुरती त्यांची निवासव्यवस्था केली.

रूपाली सुदैवाने वाचली
विधाटे यांची मोठी मुलगी रूपाली (वय 17) आजीबरोबर नाण्णजला (ता. संगमनेर) आत्याच्या घरी रविवारी गेली होती. त्यामुळे ती या दुर्घटनेतून वाचली.