आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नगर तालुक्यात फक्त तीन छावण्यांना मंजुरी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - जिल्ह्यात सर्वाधिक दुष्काळात होरपळत असलेल्या नगर तालुक्यात तीन छावण्यांना जिल्हा प्रशासनाने मंजुरी दिली आहे. नगर तालुक्यातील वाळकी, जेऊर दहिगाव या तीन ठिकाणी नगर तालुका बाजार समितीला छावण्या चालवण्यास मंजुरी मिळाली आहे. तालुक्यात एकूण लाख २४ हजार जनावरे आहेत. जनावरांची संख्या पाहता आणखी किमान १५ छावण्यांची आवश्यकता आहे.

शासनाने जिल्ह्यातील १४ महसूल मंडलात छावण्या सुरू करण्यास हिरवा कंदील दिला आहे. त्यानुसार छावण्यांसाठी आतापर्यंत प्रशासनाकडे १६ प्रस्ताव आले आहेत. त्यापैकी जामखेड कर्जत तालुक्यात पाच छावण्यांना मंजुरी मिळाली आहे. नगर तालुका बाजार समितीने चिचोंडी पाटील, वाळकी, रुईछत्तीशी जेऊर या चार महसूल मंडलांत छावण्या सुरू करण्यासाठी प्रस्ताव दाखल केले होते. कुकडी सहकारी साखर कारखान्याने वाळकी मंडलात छावणीसाठी प्रस्ताव दिला होता. तसेच दहिगाव, जेऊर या दोन विविध कार्यकारी सोसायटींनी देखील प्रस्ताव दाखल केले होते. मात्र, यापैकी नगर तालुका बाजार समितीलाच वाळकी, जेऊर दहिगाव या तीन ठिकाणी छावणी सुरू करण्यास मंजुरी मिळाली आहे. मात्र, नगर बाजार समितीला चिचोंडी पाटील गटात छावणीला मंजुरी मिळाली नाही.
छावण्यांध्ये लहान जनावरांच्या चाऱ्यासाठी ३५ रुपये, मोठ्या जनावरासाठी ७० रुपये अनुदान सरकारकडून दिले जाणार आहे. छावण्यांमधील जनावरांची, चाऱ्याच्या खर्चाची माहिती दररोज शासनाकडे पाठवावी लागणार आहे.

नगर तालुक्यात अजूनही देऊळगावसिद्धी, अकोळनेर, सारोळा कासार, चिचोंडी पाटील, पिंपळगाव माळवी, अरणगाव, नेप्ती, जखणगाव, खातगाव टाकळी, निंबळक, खडकी या गावांमध्ये छावण्यांची आवश्यकता आहे. वाळकी, जेऊर, दहिगाव या गावांमध्ये जरी छावण्या मंजूर झाल्या असल्या, तरी आसपासच्या गावातील शेतकऱ्यांना त्या ठिकाणी जनावरे दाखल करणे सोईस्कर होईलच असे नाही. यासाठी गाव तेथे छावणी असणे अत्यंत आवश्यक आहे. त्यानुसार जिल्हा परिषद गटानुसार किमान दोन छावण्या होणे अत्यंत आवश्यक आहे.

सरकारला गांभीर्य नाही
तीन वर्षांपूर्वी मोठा दुष्काळ पडला होता. मात्र, तत्कालीन आघाडी सरकारने चाऱ्याचे पाण्याचे अत्यंत चोख नियोजन करून जनावरे वाचवली होती. चारा डेपोच्या माध्यमातून शेतकऱ्याच्या दावणीतच चाऱ्याचे नियोजन केले होते. मात्र, सध्याच्या भाजप सरकारला दुष्काळाचे कसलेही गांभीर्यच नसल्याने दिसत आहे. गोवर्धन रोकडे, शेतकरी,खडकी.

नगर तालुक्यातून ३० हजार जनावरांचे स्थलांतर
नगरतालुक्यात चालू वर्षी पावसाचा थेंबही पडला नसल्याने गेल्या चार महिन्यापासून जनावरांना चारा नाही. त्यामुळे तालुक्यातील ३० हजार जनावरे मराठवाड्यात स्थलांतरित झाले आहेत. मात्र, प्रत्येक शेतकऱ्याला आपली जनावरे मराठवाड्यात नेणे शक्य नाही. कारण ज्यांनी जनावरे मराठवाड्यात स्थलांतरित केले आहेत. ती आपल्या नातलगांकडे ठेवली आहेत. तालुक्यातील प्रत्येक जणाचे इथे नातेवाईक असतीलच असे नाही. त्यामुळे शासनाने गाव तेथे छावणी मंजूर करणे अत्यंत आवश्यक आहे.

गाव तेथे छावणी हवी
सध्याची दुष्काळाची तीव्रता पाहता नगर तालुक्यात फक्त तीनच छावण्या मंजूर झाल्या असून या ठिकाणी तालुक्यातील जनावरे नेणे अत्यंत गैरसोईचे आहे. त्यामुळे गाव तेथे छावणी सरकारने मंजूर करावी. तसेच सरकारने या दुष्काळाकडे गांभीर्याने पाहणे गरजेचे आहे. मात्र, भाजप सरकारला त्याचे काहीही सोयरसतुक नाही. गणेश गिरवले, शेतकरी,देऊळगाव सिद्धी.