आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जिल्ह्यात ३०० शिक्षकांच्या जागा रिक्त, इतर जिल्ह्यांतील नगरकरांना संधी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - मूळ नगर जिल्ह्यातील रहिवासी असलेले अनेक शिक्षक इतर जिल्हा परिषदेंतर्गत असलेल्या शाळांमध्ये सध्या कार्यरत आहेत. अशा सुमारे दीड हजार शिक्षकांनी आंतरजिल्हा बदलीने नगर जिल्ह्यात बदली मिळावी, यासाठी प्रशासनाकडे विनंती केली आहे. परंतु रिक्त जागा नसल्याने हे शिक्षक गेल्या काही वर्षांपासून प्रतीक्षेत होते. सध्या जिल्ह्यात सुमारे ३०० शिक्षकांच्या जागा रिक्त असल्याने, तसेच जिल्हा परिषदेच्या पदाधिकाऱ्यांनी सहमती दर्शवल्याने आंतरजिल्हा बदलीच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत.

सेवानिवृत्तीसह इतर कारणांनी रिक्त झालेल्या जागांवर अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन केले जाते. पदोन्नती, तसेच इतर कारणांमुळे सध्या जिल्ह्यात ३०० शिक्षकांच्या जागा रिक्त झाल्या आहेत. त्यामुळे अनेक ठिकाणी एका शिक्षकावर शाळा चालवल्या जात असल्याने जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत रिक्त जागा भरण्याचा आग्रह सदस्यांनी धरला. या जागा भरताना यापूर्वी सरळसेवेने भरती होऊन नियुक्तीच्या प्रतीक्षेत असलेल्या उमेदवारांना संधी देण्याचा आग्रह काही संघटनांनी लोकसभा निवडणुकांच्या आचारसंहितेपूर्वी धरला होता. या जागा आंतरजिल्हा बदलीने भराव्यात, असा आग्रह सुजित झावरे यांनीही धरला. परंतु लोकसभा व विधानसभा निवडणूक आचारसंहिता काळात हा प्रश्न मार्गी लागला नाही. शिक्षण संचालकांकडून बीड, नाशिक आदी जिल्ह्यांतील अतिरिक्त शिक्षकांना नगर जिल्ह्यावर लादण्याचा घाट घातला जात आहे, असा आरोपही झावरे यांनी केला आहे. याप्रकरणी शिक्षण समितीचे सभापती तथा उपाध्यक्ष शेलार यांनी आंतरजिल्हा बदलीला सहमती दर्शवली आहे. जानेवारी अखेर जिल्ह्यातील इतर जिल्ह्यात कार्यरत असलेल्या शिक्षकांना आंतरजिल्हा बदलीने जिल्ह्यात घेतले जाईल, असेही उपाध्यक्ष शेलार यांनी सांगितले.
आंतरजिल्हा बदल्या विनाविलंब करा...
-जिल्ह्यात तीनशे ते चारशे शिक्षकांच्या जागा रिक्त आहेत. त्यामुळे आदिवासी भागासह अनेक ठिकाणी तीन वर्गांवर एक शिक्षक अशी परिस्थिती आहे. विद्यार्थ्यांचे त्यामुळे नुकसान होत आहे. प्रशासन दिरंगाई करून जागा रिक्त ठेवून काय साध्य करणार आहे? त्यामुळे विनाविलंब या जागा भरण्यात याव्यात.''
सुजित झावरे, सदस्य, जिल्हा परिषद.