आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अहमदनगरात तीन न्यायाधीशांविरुद्ध खासगी फिर्याद

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर- कायद्याची चौकट मोडून वकिलाविरुद्ध कारवाईचा आदेश दिल्याचा आरोप करुन तीन न्यायाधीशांविरुद्ध मुख्य न्यायदंडाधिकार्‍यांकडे खासगी फिर्याद देण्यात आली आहे. अँड. तुळशीराम बालवे यांच्या वतीने अँड. शिवाजी डमाळे व अँड. शिवाजी सांगळे यांनी बुधवारी ही फिर्याद दिली.

फिर्यादीत जिल्हा न्यायाधीश राजेंद्र वानखडे, प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी वैशाली वाघमोडे, प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी एम. एस. तोडकर व सागर प्रकाश देवडे यांच्यावर आरोप करण्यात आले आहेत. फिर्यादीत म्हटले आहे की, सागर देवडे यांच्याविरुद्ध सुरु असलेल्या पोटगीच्या दाव्याचे कामकाज अँड. बालवे पाहत आहेत. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी वाघमोडे यांच्यासमोर सुनावणी सुरु आहे. पोटगीपोटी देवडे यांनी दिलेली साडेतेरा हजारांची रक्कम अँड. बालवे यांनी न्यायालयात भरली व त्याची रितसर पावती देवडे यांना दिली. त्यानंतर अँड. बालवे यांनी कामकाजाचा मोबदला मागितला असता देवडे यांनी उद्धटपणाची भाषा वापरत बघून घेण्याची धमकी दिली.

दरम्यान, अँड. बालवे यांनी पोटगीची रक्कम न भरता बनावट पावती दिल्याची तक्रार देवडे यांनी न्यायाधीश वाघमोडे यांच्याकडे केली. त्यांनी कागदपत्रांची पडताळणी न करता ही तक्रार न्यायाधीश वानखडे यांच्याकडे पाठवली. त्यांनी पुढील कारवाईसाठी ही तक्रार न्यायाधीश तोडकर यांच्याकडे पाठवली. तोडकर यांनी अँड. बालवे यांच्याविरुद्ध कारवाईचे आदेश दिले. पोलिसांच्या कार्यक्षेत्रावर अतिक्रमण करुन न्यायाधीशांनी संबंधित आदेश दिल्याने त्यांच्याविरुद्ध उचित कारवाई करण्याचे आदेश देण्याची मागणी या खासगी फिर्यादीत करण्यात आली आहे.