आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जाधव हत्येप्रकरणी तीन संशयित ताब्यात

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - कुख्यात वाळूतस्कर हिंमत अभिमन्यू जाधव (वय २७, रा. वळण पिंप्री, ता. राहुरी) याच्या हत्येप्रकरणी पोलिसांनी तिघा संशयितांना ताब्यात घेतले आहे. हे तिघेही नेवासे तालुक्यातील आहेत. पोलिस त्यांची कसून चौकशी करीत आहेत. दरम्यान, हिंमत जाधवच्या हत्येच्या निषेधार्थ आदिवासी समाज संघटनेच्या वतीने राहुरी, देवळाली प्रवरा, राहुरी फॅक्टरी येथे बंद पाळण्यात आला. तर एकलव्य भिल्ल समाज संघटनेचे शिवाजी ढवळे यांच्या नेतृत्वाखाली नगर-मनमाड मार्गावर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.

मंगळवारी दुपारी अज्ञात हल्लेखोरांनी इमामपूर घाटाजवळ गावठी कट्ट्यातून गोळीबार करून हिंमतचा खून केला. गोळीबारानंतर हल्लेखोर पसार झाले. सरकारी कामात अडथळा आणून पोलिसांना जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी नगर कोर्टात सुरू असलेल्या खटल्याच्या कामकाजासाठी हिंमत नगरला आला होता. काम आटोपून माघारी जात असताना हा प्रकार घडला. एक वर्षापूर्वीही त्याच्यावर असाच प्राणघातक हल्ला झाला होता. त्यामुळे पोलिसांनी सर्व शक्यता गृहीत धरून तपास सुरू केला.

नगर ग्रामीणचे पोलिस उपअधीक्षक आनंद भोईटे, तपासी अधिकारी सहायक पोलिस निरीक्षक राहुलकुमार पवार, स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक शशिराज पाटोळे हे कसून तपास करीत आहेत. बुधवारी सकाळी नाशिकच्या न्यायवैद्यकीय प्रयोगशाळेच्या पथकाने घटनास्थळी भेट देऊन महत्वपूर्ण पुरावे गोळा केले. बुधवारी दुपारी पोलिसांनी सोनई, शिंगणापूर घोडेगाव परिसरातील तीन युवकांना संशयावरुन चौकशीकरिता ताब्यात घेतले. तिघांचीही पार्श्वभूमी गुन्हेगारी स्वरुपाची असून पोलिस त्यांची कसून चौकशी करीत आहेत.

मंगळवारी रात्री वळण येथे मोठा पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. मंगळवारी दुपारी हिंमतचा मृतदेह नगरच्या जिल्हा शासकीय रुग्णालयात नेण्यात आला. नंतर तेथून शवविच्छेदनासाठी औरंगाबादला रवाना करण्यात आला. बुधवारी दुपारी हिंमतचा मृतदेह वळण पिंप्रीमध्ये आणून सायंकाळी त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी भिल्ल समाज संघटनेचे कार्यकर्ते नातेवाईक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मंगळवारी मध्यरात्रीच न्यायवैद्यकीय प्रयोगशाळेचे पथक घटनास्थळी हजर झाले. भल्या सकाळीच या पथकाने घटनास्थळाची पाहणी सुरु केली. या तपासणीमध्ये गुन्ह्याच्या दृष्टीने काही महत्वपूर्ण पुरावे पथकाला गवसले आहेत. तब्बल साडेतीन तास या पथकाची पाहणी सुरु होती. स्थानिक गुन्हे शाखेची २, एमआयडीसी पोलिसांचे नगर ग्रामीण उपविभागाचे अशी एकूण पथके आरोपींचा कसून शोध घेत आहेत. राहुरी सोनई पोलिसही तपासात मदत करीत आहेत. लौकरच आरोपींच्या मुसक्या आवळल्या जातील, असे पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले.

रास्ता रोको आणि बंद
बधवारीदुपारी हिंमत जाधवच्या हत्येच्या निषेधार्थ आरोपींना अटक करून न्याय देण्याची मागणी करण्यात आली. दरम्यान, पोलिस अधीक्षक सौरभ त्रिपाठी यांनी पोलिस अधिकाऱ्यांकडून तपासाचा आढावा घेतला. पोलिस उपअधीक्षक प्रताप बाविस्कर हे राहुरीमध्ये ठाण मांडून होते. दुपारी नगर मनमाड रस्त्यावर रास्ता रोको करण्याचा प्रयत्न झाला.
बातम्या आणखी आहेत...