आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Three Thousand And Five Hundred Illegal Ape Autorikshow

अहमदनगरात साडेतीन हजार बेकायदेशीर अ‍ॅपेरिक्षा !

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर- शहरात साडेतीन हजार अ‍ॅपेरिक्षा विनापरवाना बिनबोभाट धावत आहेत. उपप्रादेशिक परिवहन (आरटीओ) विभागाने केलेल्या पाहणीत जिल्हाभरात केवळ साडेपाचशे परवानाधारक अ‍ॅपेरिक्षा असल्याचे स्पष्ट झाले आहे. शहर वाहतूक शाखा व आरटीओच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे बेकायदा अ‍ॅपेरिक्षांचे प्रमाण वाढते आहे.

नगरचे प्रमुख रस्ते अ‍ॅपेरिक्षानी व्यापून टाकले आहेत. माळीवाडा बसस्थानकाच्या बाहेर जिल्हा परिषद इमारतीच्या मुख्य प्रवेशद्वारासमोरचा रस्ता आपल्यासाठीच असल्याचा समज या रिक्षाचालकांचा आहे. वाहतूक पोलिसांच्या नाकावर टिच्चून अ‍ॅपेरिक्षांनी हा रस्ता कायम अडवलेला असतो. सर्वसामान्य नगरकरांना तारेवरची कसरत करत तेथून वाट काढावी लागते. स्थानकात जाणा-या बसगाड्यांनाही ताटकळत उभे राहावे जाते. प्रवासी हायजॅक करण्याच्या चढाओढीत रिक्षाचालकांना इतरांचा विसर पडतो. कारवाई होत नसल्याने त्यांचा मग्रूरपणा वाढला आहे. सर्वसामान्य नागरिकांनी ही अरेरावी मुकाटपणे सहन करावी लागते.

शहरात सुमारे चार हजार अ‍ॅपेरिक्षा प्रवासी वाहतूक करतात. यातील केवळ सव्वापाचशे अ‍ॅपेरिक्षांना वाहतूक करण्याचा परवाना उपप्रादेशिक परिवहन विभागाकडून देण्यात आला आहे. बेकायदा अ‍ॅपेवर कारवाईचे अधिकार आरटीओ व शहर वाहतूक शाखेला आहेत. मात्र, व्यापक कारवाई करण्यासाठी या दोन्ही विभागांमध्ये समन्वयच नाही. स्वतंत्रपणे केली जाणारी कारवाई केवळ फार्स ठरते आहे.

अ‍ॅपेरिक्षाला चालकाव्यतिरिक्त केवळ तीन प्रवासी घेऊन जाण्याचा परवाना आहे. मात्र, नियम धाब्यावर बसवून दुप्पट, तिप्पट प्रवासी अक्षरश: कोंबले जातात. रिक्षा चालवण्याचे परवाने हा संशोधनाचा विषय आहे. अल्पवयीन मुले कानाला मोबाइल लावून प्रवाशांचा विचार न करता रिक्षा पळवतात.

वाहतुकीच्या नियमांची पायमल्ली करत कुठेही अन् कशीही अ‍ॅपेरिक्षा थांबवली जाते. पाठीमागच्या वाहनचालकांना याचा त्रास होतो, याच्याशी अ‍ॅपेचालकांना सोयरसूतक नसते. जाब विचारणा-याला अरेरावी केली जाते. तक्रार करणा-यांना पोलिसही बाहेरचा रस्ता दाखवतात.

पांढ-या रंगाच्या खासगी पॅगोमधून सर्रास प्रवासी वाहतूक सुरू आहे. खासगी वाहतुकीसाठी पांढ-या रंगाच्या अ‍ॅपेना परवाना दिला जातो. मात्र, या परवान्याचा दुरूपयोग करून अशा अ‍ॅपेंमधून प्रवासी वाहतूक सुरू आहे.
ठोस कारवाईची गरज
*शहरातील अनधिकृत अ‍ॅपेरिक्षांमुळे एएमटीला मोठ्या प्रमाणात तोटा सहन करावा लागत आहे. कारवाईची मागणी केली की केवळ जुजबी दंड करण्यात येतो. ठोस कारवाई अजून झालेली नाही. रिक्षाचालकांच्या मनमानीमुळे एएमटीची प्रवासी संख्या मोठ्या प्रमाणात कमी झाली आहे. त्यामुळे दर महिन्याला प्रवासी कर व बालपोषण अधिभार भरूनही एएमटीला तोटा सहन करावा लागतो. अनधिकृत रिक्षांवर ठोस कारवाई होणे गरजेचे आहे.’’
दीपक मगर, एएमटी शहर व्यवस्थापक
हप्ते घेऊन संरक्षण
*चार-पाच वर्षांपासून बेकायदा रिक्षा शहरात धावत आहेत. तीन सीटरचे बजाज रिक्षाधारक दरवर्षी कर भरतात, परवान्याचे नूतनीकरण करतात. यातून सरकारलाही महसूल मिळतो. येथेच आमची चूक होते. अ‍ॅपेधारकांना याची कोणतीही झळ बसत नाही. दरमहा हप्ता दिला की, त्यांना संरक्षण पुरवले जाते. कारवाईच्या वेळी दोन्ही प्रकारच्या रिक्षाधारकांकडून सारखाच दंड वसूल केला जातो. हा सरळ-सरळ आमच्यावर अन्याय आहे.’’
सुरेश कराळे, बजाज रिक्षाधारक
परवानाधारक रिक्षा
1856 बजाज
522 पॅगो
7 मिनिडोअर
241 इतर रिक्षा