आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Through Editor Eye Maharashtra Assembly Election 2014, Ahmednagar

संपादकांच्या नजरेतून...उधार नेत्यांच्या जिवावर घराण्यांची लढाई

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आघाडी व युती तुटल्याने सर्व पक्षांना सुरुवातीस जोखडातून मोकळे झाल्यासारखे वाटले. इच्छुकांच्या आकाक्षांना पालवी फुटली. परंतु , १२ मतदारसंघांत उमेदवार देण्याची वेळ आल्यावर मात्र नेत्यांच्या पोटात गोळा आला. विशेषत: युती तुटल्यानंतर शिवसेना व भाजपला बाहेरून उमेदवार आयात करावे लागले. त्यातही घराणेशाहीचे प्राबल्य यावेळी मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे सामान्य कार्यकर्त्यांनी या घराणेशाहीपुढे फक्त जोडेच वाहण्याचे काम करायचे का, असा प्रश्न निर्माण झाला आहे. ज्यांच्यावर आतापर्यंत टीका करून अस्तित्व टिकवले ते आपल्या पक्षाचे उमेदवार झाल्यावर टीका कोणावर करायची, असा पेच असल्याने नेते व कार्यकर्तेही भांबावलेले आहेत. त्यामुळे जिल्ह्यात निवडणुकीचे वातावरण तयार झालेले नाही.

मुळात नेत्यांच्याच निष्ठा अशा असल्याने कार्यकर्तेही तसे निर्धास्त झाले आहेत. त्यांनाही आपल्या निष्ठांची काळजी करण्याची गरज राहिलेली नाही. पण, त्यामुळे मतदार राजा मात्र भांबावलेला आहे. जेथे प्रस्थापित आहेत, तेथे फारशी अडचण येणार नाही. पण, अचानक पक्ष बदललेल्या उमेदवारांना आपल्या मतदारांपर्यंत पोहचण्यासाठी खडतर परीक्षा द्यावी लागत आहे. त्यांना प्रचाराला जेमतेम नऊ दिवस उरले आहेत, ही मोठी समस्या आहे. नगर जिल्ह्यात विधानसभेचे नगर शहर, नेवासे, राहुरी, श्रीरामपूर, कोपरगाव, शिर्डी, संगमनेर, अकोले, श्रीगोंदे, पाथर्डी-शेवगाव, कर्जत-जामखेड व पारनेर असे १२ मतदार संघ आहेत. बाळासाहेब थोरात, राधाकृष्ण विखे हे मंत्री, तर मधुकर पिचड यांचे पुत्र वैभव, तसेच माजी मंत्री बबनराव पाचपुते यांच्यासह विद्यमान आमदार अनिल राठोड, विजय औटी, राम शिंदे, शिवाजी कर्डिले, चंद्रशेखर घुले, भाऊसाहेब कांबळे, शंकरराव गडाख यांचे भवितव्य यावेळी ठरणार आहे. मतांमधील फाटाफुटीमुळे सध्या तरी प्रस्थापितांचे पारडे जड वाटत आहे. मात्र, सर्वांचेच मताधिक्क्य घटणार आहे.

कर्जत-जामखेडमध्ये आमदार राम शिंदे यांच्यासमोर राष्ट्रवादीचे निष्ठावान राजेंद्र फाळके यांनी मोठे आव्हान उभे केले आहे. आमदार शिंदे व फाळके या दोघांचीही प्रतिमा सुसंस्कृत नेता म्हणून आहे. येथे शिवसेनेचे रमेश खाडे व कॉंग्रेसचे किरण ढोबे यांचे आव्हान असले, तरी लढत प्रामुख्याने शिंदे व फाळके यांच्यातच होईल. राहुरीत राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते प्रसाद तनपुरे यांच्या पत्नी व मंत्री जयंत पाटील यांच्या भगिनी डॉ. उषा यांनी शिवसेनेकडून उमेदवारी मिळवून भाजपचे आमदार शिवाजी कर्डिले व राष्ट्रवादीचे शिवाजी गाडे यांच्यासमोर आव्हान उभे केले आहे. कर्डिले यांची भिस्त नगर तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या दोन गटांवर आहे.

पण तेथेही काँग्रेसचे अमोल जाधव व अपक्ष गोविंद मोकाटे हे नगर तालुक्यातील वजनदार युवा नेते त्यांच्या किती मतांवर डल्ला मारतात, यावर त्यांचे भवितव्य अवलंबून असेल. श्रीरामपूरमध्येही काट्याची लढत होणार आहे. तेथे विद्यमान आमदार भाऊसाहेब कांबळे यांच्यासमोर शिवसनेचे लहू कानडे व भाजपकडून भाऊसाहेब वाकचौरे यांचे ‘वजनदार’ आव्हान उभे केले आहे. येथील लढत प्रामुख्याने तिरंगी होणार आहे. या सर्व मतदारसंघांतील लढतींकडे सर्वांचे लक्ष असेल. त्यातल्या त्यात नगर शहर, पारनेर, नेवासे, शिर्डी, संगमनेर, अकोले, शेवगाव-पाथर्डी, कर्जत-जामखेड येथील फाटाफुटीचा प्रस्थापितांना लाभ होईल, अशी स्थिती आहे. संगमनेरसारख्या ठिकाणी प्रमुख चारही उमेदवार एकमेकांचे नातेवाईक आहेत. बाळासाहेब थोरात यांच्या गटाला आपल्या विजयाचा इतका आत्मविश्वास आहे, की संगमनेरमध्ये कॉंग्रेसच्या बड्या नेत्याची एकही सभा आयोजित करण्यात आलेली नाही. त्यामुळे तेथे निवडणुकीचे अजिबात वातावरण जाणवत नाही.

निरस व फुसक्या बारांच्या सभा
जोपर्यंत दणदणीत प्रचार सभा होत नाहीत. त्यात झालेल्या आरोपांची चर्चा होत नाही, तोपर्यंत निवडणुकीचे वातावरण तयार होत नाही. सध्या लहान नेत्यांच्या सभांना मतदार येईनासे झाले आहेत. परिणामी मोठ्या नेत्यांच्या सभांकडे सर्वच डोळे लावून बसले आहेत. नाही म्हणायला भाजपचे प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस व राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या जिल्ह्यात सभाही झाल्या आहेत. या सभांची उपस्थिती पाहता सर्वच पक्षांच्या गोटात चिंतेचे वातावरण पसरले आहे. अपवाद फक्त शनिवारी नगरमध्ये झालेल्या आदित्य ठाकरे यांच्या सभेचा. या सभेला चटकत्या उन्हात चांगली गर्दी होती. अर्थात पवारांसारखे नेतेही सभांमधून फक्त मोदींवर टीका करण्यात धन्यता मानत आहेत. आतापर्यंत झालेल्या सभांतून स्थानिक संदर्भांवर आरोपांचे साधे आपटबारही फुटलेले नाहीत. सर्वच उमेदवारांनी आतापर्यंत एकमेकांविरोधात वैयक्तिक टीका टाळली आहे.

निष्ठा विकल्या उमेदवा-या विकल्या
जिल्ह्यात शिवसेनेचे बळ ब-यापैकी असल्याने किमान आठ ठिकाणी त्यांनी आपल्या पक्षातील लोकांनाच उमेदवारी दिली. मात्र भाजपला फक्त चार ठिकाणी आपल्याच पक्षातील मूळ लोकांना उमेदवारी देणे शक्य झाले. त्यातील आमदार शिवाजी कर्डिलेही फक्त पाचच वर्षांपूर्वी भाजपमध्ये आले आहेत. उरलेल्या आठ पैकी नगरचे अॅड. अभय आगरकरही राष्ट्रवादीची वारी व अपक्ष म्हणून विधानसभा लढून पक्षात परतले आहेत. उरलेले सात ठिकाणचे उमेदवार पक्के ‘आयाराम’ आहेत. त्यातही कहर म्हणजे तीन राष्ट्रवादी व तीन कॉंग्रेसकडून केवळ उमेदवारीसाठी आले आहेत. म्हणजे ज्यांच्याविरोधात गरळ ओकत होतो, त्यांनाच उमेदवारी देण्याची वेळ भाजपवर व अशा लोकांचे काम करण्याची वेळ निष्ठावंत कार्यकर्त्यांवर आली आहे. अशा परिस्थितीत यावेळी भाजप व शिवसेनेची एक जागा वाढण्याची शक्यता आहे.

‘कॉर्पोरेट इव्हेंट’
विधानसभेची निवडणूक आता एक ‘कॉर्पोरेट इव्हेंट’ झाली आहे. कॉर्पोरेट सेक्टरमध्ये कंपनीबद्दलची निष्ठा वगैरे पॅकेजवर ठरते. जेथे जास्त पॅकेज मिळते त्या कंपनीला कर्मचारी जवळ करतात. त्याप्रमाणेच या निवडणुकीत सर्व सुरू आहे. पूर्णवेळ व अर्धवेळ कार्यकर्ते, आता दिवसाच्या सभा, रात्रीच्या सभांसाठी भाड्याने महिला श्रोते पुरवणा-या संस्था आता तालुका पातळीवर स्थापन झाल्या आहेत. पाथर्डीसारख्या ठिकाणीही घरची कामे करणा-या मोलकरणी १५ दिवसांच्या रजेवर गेल्या आहेत. खाऊन पिऊन तीनशे रुपये मिळत असतील, तर कमवायची संधी कोण सोडणार? त्यामुळे दोन विरोधी उमेदवारांच्या सभांत त्याच महिलांची उपस्थिती असल्यास आश्चर्य वाटून घेण्याचे कारण नाही. अनेकांचा ‘इव्हेंट मॅनेजमेंट’चा धंदा जोरात सुरू आहे. त्यात राजकीय नेतेही उतरले आहेत.

मुद्देच नसलेली निवडणूक
या निवडणुकीत एकही मुद्दा नाही. त्यामुळे गुद्दाही नाही. जिल्ह्याला भेडसावणा-या शेती, पाणी, साखर उद्योग आदी प्रश्नांची कोणतीही चर्चा नाही. वादही नाही. निरस वातावरणात ही निवडणूक होत आहे. असे प्रथमच घडत आहे. त्याला एक महत्त्वाचे कारणही आहे. निवडणुकीसाठी मुद्यांची मांडणी करायलाही कोणाला वेळ मिळालेला नाही. विधानसभेच्या निवडणुकीत मोदींचा प्रभाव नसेल, असे भलेही काँग्रेसचे नेते म्हणत आहेत. पण, स्थिती वेगळी आहे. मोदींचे परदेश दौरे, दस-याच्या दिवशी त्यांचे शस्त्रपूजन करणे, गांभीर्याने राबवलेली स्वच्छता मोहीम, थेट डोळ्यांत डोळे घालून उत्स्फुर्तपणे भाषण करणे, यांमुळे तरुणाईत त्यांच्याबद्दलचे आकर्षण लोकसभेच्या निवडणुकीपेक्षा अधिक वाढले आहे. सोशल मिडियाचा वापर करणारा वर्ग ग्रामीण भागातही वेगात वाढत आहे. तो या गोष्टींकडे अधिक जागरूकपणे पाहत आहे.