आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'जलयुक्त'च्या कामातून मेहकरी नदीला मिळाली संजीवनी...

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - नगर तालुक्यातील चिचोंडी पाटील येथील मेहकरी नदीचे भाग्य यंदा उजळले. जलयुक्त शिवार अभियानातून नदीचे खाेलीकरण रुंदीकरण करण्यात आल्याने नदीला संजीवनी मिळाली असून पावसाळ्यात त्याचे चांगले परिणाम ग्रामस्थांना अनुभवण्यास मिळणार आहे. ग्रामस्थांनी लोकसहभागातून हे काम पूर्ण केले.

तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती हरिभाऊ कर्डिले यांनी या कामाची नुकतीच पाहणी करून ग्रामस्थांचे कौतूक केले. यावेळी समितीचे संचालक बाजीराव हजारे, जिल्हा परिषद सदस्य दत्तात्रेय सदाफुले, सरपंच अर्चना चौधरी, यमाती फिसके, महेश पाटील, प्रवीण कोकाटे, दीपक चौधरी, प्रकाश कांबळे, युवराज हजारे, शैलेश देवकर, हरिभाऊ खराडे, बाबा शेडकर, बाबा तनपुरे, संजय मेहेत्रे, गणेश कांबळे, अजय हजारे, नानासाहेब कोकाटे आदी उपस्थित होते.
कर्डिले म्हणाले, सातत्याने पडणाऱ्या दुष्काळावर मात करण्यासाठी लोकसहभागातून झालेली कामे महत्त्वाची ठरणार आहेत. नगर तालुका जिरायती पट्ट्यात येतो. पावसाच्या पाण्यावरच येथील शेती अवलंबून असल्याने पडणाऱ्या पावसाचा प्रत्येक थेंब अडवून जमिनीत मुरवणे आवश्यक आहे. गावात महिला सरपंच असूनही त्यांनी पुढाकार घेत गावाच्या विकासासाठी केलेले काम कौतुकास्पद आहे. मेहकरी नदीचे पात्र रुंद खोल करण्यात लोकसहभाग वाढवण्यात त्यांची मोलाची भूमिका आहे. वाहून वाया जाणारे पावसाचे पाणी मोठ्या प्रमाणात अडवले जाऊन परिसरातील शेतकऱ्यांना या पाण्याचा उपयोग होणार असल्याचे त्यांनी सांगितले.
सरपंच चौधरी म्हणाल्या, जलयुक्त शिवार योजनेत अनेक गावांचा समावेश आहे. मात्र, या योजनेत समाविष्ट नसलेल्या गावांतील ग्रामस्थांनी लोकसहभागातून जलसंधारणाची कामे हाती घेऊन ती पूर्ण करणे आवश्यक आहे. भविष्यात दुष्काळी परिस्थिती उद््भवू नये, यासाठी ग्रामस्थांनी एकदिलाने लोकसहभागातून केलेल्या कामात योगदान दिले, असे त्यांनी सांगितले. प्रास्ताविक बाजीराव हजारे यांनी केले. प्रवीण कोकाटे यांनी आभार मानले.