आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रेल्वेस्टेशनवरील तिकीट एजंटांना बसणार चाप, गैरप्रकार टाळण्यासाठी तिकीट खिडकीजवळ पोलिस हवेत

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - नगरच्या रेल्वेस्टेशनवरील तत्काळ तिकीट आरक्षण यंत्रणा एजंटांच्या ताब्यात गेली आहे. यासंदर्भात "दिव्य मराठी'ने शनिवारच्या अंकात वृत्त प्रसिध्द केले होते. त्याची दखल घेत रेल्वेचे अतिरिक्त विभागीय व्यवस्थापक मनेंदरसिंग उप्पल यांनी स्टेशनवरील तिकीट एजंटांचा तत्काळ बंदोबस्त करून याबाबतचा सविस्तर अहवाल आठ दिवसांत सादर करण्याचे आदेश संबंधित अधिकाऱ्यांना शनिवारी दिले. उप्पल यांच्या या आदेशामुळे स्टेशनवरील तिकीट एजंटांना कायमचा चाप बसणार आहे.
रेल्वेस्टेशनवर तत्काळ तिकिटाचे आरक्षण करणाऱ्या प्रवाशांची मागील काही दिवसांपासून अार्थिक पिळवणूक सुरू होती. या पिळवणुकीत रेल्वेच्या काही वरिष्ठ अधिकाऱ्यांचेही हितसंबंध अडकले आहेत. स्टेशनवर केवळ नावापुरती टोकन यंत्रणा असल्याने पहिल्या पाच क्रमांकांवर तिकीट एजंटांनी घुसखोरी केली आहे. त्यामुळे सामान्य प्रवाशांच्या हातात ‘वेटिंग’चेच तिकीट पडत होते. तत्काळ तिकीट आरक्षणाच्या खिडकीवर एजंट मनमानी करतात. रेल्वे पोलिसही या एजंटांना पाठीशी घालतात. त्यामुळे सर्वसामान्य प्रवाशांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागते.

तत्काळ आरक्षणाची वेळ सकाळी दहा वाजता अाहे. तेथील रेल्वे कर्मचारी मात्र ही वेळ पाळत नाहीत. रेल्वे कर्मचारी एजंटांच्या सोयीनुसार वागतात. तिकीट खिडक्यांवरील पहिले पाच क्रमांक एजंटांकडून सर्रास बळकावले जातात. त्यामुळे प्रवाशांच्या पदरी ‘वेटिंग’ तिकीटच पडते. अनारक्षित तिकिटासाठी दोन खिडक्या असूनही एकच खिडकी सुरू असते. आरक्षण तिकिटाच्या बाबतीतही हाच प्रकार सुरू आहे. खिडक्यांमधील रेल्वे कर्मचारी दुसरीकडेच फिरत असतात, अशी प्रवाशांची तक्रार अाहे. चौकशी खिडकीतील कर्मचारीही जागेवर थांबत नाही.
रेल्वेस्टेशनवरील हा सावळा गोंधळ "दिव्य मराठी'ने समोर आणला. "तत्काळ'ला एजंटांचा विळखा कायम, असे वृत्त शनिवारी प्रसिध्द केले. स्टेशनच्या पाहणीसाठी आलेले अतिरिक्त विभागीय व्यवस्थापक उप्पल यांनी या वृत्ताची तत्काळ दखल घेतली. संबंधित अधिकाऱ्यांना या सर्व प्रकाराबाबत त्यांनी जाब विचारला. स्टेशनवरील तिकीट एजंटांचा तातडीने बंदोबस्त करून त्याबाबतचा सविस्तर अहवाल अाठ दिवसांत सादर करा, असा आदेशच त्यांनी संबंधितांना दिला. उप्पल यांच्या या आदेशामुळे स्टेशनवरील एजंटांना कायमचा चाप बसून सर्वसामान्य प्रवाशांना दिलासा मिळणार आहे.

तिकीट खिडकीजवळ पोलिस हवेच
रेल्वेपोलिस तिकीट एजंटांना पाठीशी घालण्याचे काम करतात. त्यामुळेच एजंटांची हिंमत वाढत चालली आहे. एका तिकिटामागे तब्बल चारशे ते पाचशे रुपये एजंट कमवतात. रेल्वे पोलिसांच्या या ढिसाळ कारभाराचा अतिरिक्त विभागीय व्यवस्थापक उप्पल यांनी चांगलाच समाचार घेतला. सकाळी पासून तिकीट खिडकीजवळ पोलिस थांबलेच पाहिजेत. वाणिज्य शाखेच्या अधिकाऱ्यांनी एजंटांवर नियंत्रण ठेवून त्याबाबतचा अहवाल अाठ दिवसांत सादर करावा, असे आदेश उप्पल यांनी दिले. उप्पल त्यांनी संपूर्ण स्टेशन परिसराची पाहणीही केली.
"दिव्य मराठी'मुळे चाप
^तिकीट एजंटांच्या विरोधात अनेकदा तक्रारी दिल्या होत्या. एजंटांमुळे शहरातील सर्वसामान्य प्रवाशांना तिकिटासाठी अधिक पैसे मोजावे लागतात. रेल्वे पोलिसांनी मनावर घेतले, तर हा प्रकार तत्काळ थांबेल. अतिरिक्त विभागीय व्यवस्थापक उप्पल यांनी या प्रकाराची गंभीर दखल घेतली. एजंटांचा बंदोबस्त करण्याचे आदेश त्यांनी संबंधितांना दिले आहेत. स्टेशनवर अनधिकृतपणे खाद्यपदाथांची विक्री करणाऱ्यांवरही त्यांनी कारवाईचे आदेश दिले. दैनिक दिव्य मराठीच्या वृत्तामुळे एजंटांच्या या मनमानीला कायमचा चाप बसणार आहे.'' हरजितसिंग वधवा, सदस्य,रेल्वे विभागीय सल्लागार समिती.

रेल्वेस्टेशनची पाहणी करताना अतिरिक्त विभागीय व्यवस्थापक मनेंदरसिंग उप्पल. समवेत स्टेशन प्रबंधक ए. यू. पाटील, पश्चिम रेल्वे सल्लागार समिती सदस्य विश्वनाथ पोंदे, नगर रेल्वे सल्लागार समितीचे सदस्य श्रीपाद शहाणे, सोलापूर विभागाचे ए. के. उपाध्ये आदी. छाया: मंदार साबळे.