नगर - खरीप पिकविमा भरण्याकरिता अवघे दोन दिवस उरले असताना जिल्हा बँकेकडून विमा भरण्याचे आवाहन करण्यात आले आहे. या योजनेत सहभागी होऊन नुकसान टाळण्याचे आवाहन अध्यक्ष सीताराम गायकर यांनी केले आहे.
जिल्ह्यात अकोले वगळता सर्वच तालुक्यांमध्ये अत्यल्प पाऊस झाला आहे. परिणामी जिल्ह्यातील खरिपाचे क्षेत्र असलेल्या दीड लाख हेक्टरवरील पेरण्या रखडल्या आहेत. खरिपाच्या एकूण क्षेत्रांपैकी ६० टक्के क्षेत्रावर पेरण्या होऊ शकल्या. त्यातील ६० टक्क्यांपेक्षा अधिक क्षेत्र वाया गेले अाहे. महात्मा फुले कृषी विद्यापीठात झालेल्या बैठकीत यावर शिक्कामोर्तब झाले आहे.
खरीप हंगामाची अशी वाताहत सुरू असताना पिकांच्या संरक्षणासाठी आवश्यक असलेला पीकविमा भरण्याचे आवाहन करणारे पत्रक जिल्हा बँकेचे अध्यक्ष गायकर यांनी मुदत संपण्याच्या दोन दिवस आधी प्रसिद्धीस दिले. विम्याचे संरक्षण मिळवून देण्याची ३१ जुलै ही अंतिम मुदत आहे. जिल्ह्यातील कर्जदार बिगर कर्जदार शेतकऱ्यांनी या योजनेत सहभागी व्हावे, असे आवाहन त्यात करण्यात आले आहे.
या योजनेत बाजरी, सोयाबीन, मूग, कापूस, भात, तूर, उडीद, भूईमूग, मका कांदा या पिकांचा
समावेश करण्यात आला आहे. पत्रकात म्हटले की, जिल्ह्यात अतिशय मोठ्या प्रमाणात दुष्काळी
परिस्थिती निर्माण झाली अाहे. पावसाचे प्रमाण कमी असल्याने पेरण्या लागवडी होऊनही
पावसाभावी पिके नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. परिणामी उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट येणार आहे. नैसर्गिक आपत्तीमुळे पीक उत्पादनावर परिणाम झाल्यास नुकसान भरपाई विमा योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना मिळेल. जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी खरीप हंगामातील पिकांचा हप्ता भरण्यासाठी जवळच्या बँक शाखेशी संपर्क साधण्याचे आवाहन अध्यक्ष गायकर यांनी केले आहे.
या खरीप पिकांना मिळणार विम्याचे संरक्षण
बाजरीपिकासाठी जिल्ह्यातील १४ तालुक्यांत विम्याचे कवच उपलब्ध आहे. संगमनेर वगळता सर्वच तालुक्यांत तूर पिकासाठी विमा उतरवता येणार आहे. उडीद पिकासाठी मात्र जामखेड पारनेर, तर मका पिकासाठी राहाता राहुरी या तालुक्यांना विम्याचे संरक्षण मिळणार आहे. श्रीगोंदे, कर्जत वगळता भूईमूग, कोपरगाव, नेवासे, राहाता, राहुरी, श्रीरामपूर वगळता उर्वरित तालुक्यांसाठी मूग पिकाला विम्याचे संरक्षण मिळणार आहे.
उशिराचे शहाणपण
खरीपविमा भरण्याचे आवाहन हंगामाच्या सुरुवातीपासून करणे अपेक्षित होते. मात्र, विमा भरण्याची मुदत संपण्याच्या दोन दिवस आधी जिल्हा बँकेेने विम्याचे संरक्षण मिळवण्याचे आवाहन केले. जिल्हा बँकेच्या अनेक शाखांमध्ये विम्याचा हप्ता भरण्यासाठी रांगा लागल्या असून संबंधित कागदपत्र मिळवण्यासाठी शेतकऱ्यांची धावपळ सुरू आहे.