आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • To Release Water Into Wamburi Canale Order By Sunil Tatkare

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

वांबोरी चारीला पाणी सोडण्याचे जलसंपदामंत्री तटकरेंचे आदेश

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

राहुरी - मुळा धरणातून वांबोरी पाइपचारीला येत्या दोन दिवसांत पाणी सोडण्याचे आदेश राज्याचे जलसंपदामंत्री सुनील तटकरे यांनी पाटबंधारे खात्याचे मुख्य अभियंता भाऊसाहेब कुंजीर यांना दिले आहेत, अशी माहिती माजी खासदार प्रसाद तनपुरे यांनी शुक्रवारी दिली.


राहुरी, नगर व पाथर्डी तालुक्यातील दुष्काळग्रस्त जिरायत भागाला संजीवनी देणार्‍या वांबोरी पाइपचारीला पाणी सोडून गावतळे, शेततळे भरण्यात यावे, अशी मागणी पाथर्डी तालुक्यातील मिरी, तिसगाव, तसेच राहुरी तालुक्यातील वांबोरी, खडांबे परिसरातील शेतकर्‍यांच्या शिष्टमंडळाने तनपुरे यांच्याकडे केली होती. यासंदर्भात तनपुरे यांनी जलसंपदामंत्री तटकरे यांची मुंबईत भेट घेऊन या शेतकर्‍यांच्या भावना सांगितल्या. पाणीप्रश्‍नाविषयी तनपुरे यांनी सांगितले की, मुळा धरणात सध्या 20 हजार 600 दशलक्ष घनफूट साठा आहे. धरणाच्या पाण्यापासून वंचित असलेल्या जिरायत भागासाठी वांबोरी पाइपचारी हा एकमेव आधार आहे. पाथर्डी तालुक्यातील मिरी, तिसगाव भागात अद्यापही दुष्काळसदृश परिस्थिती आहे. ऐन पावसाळ्यातही या परिसरात पिण्याच्या व जनावरांच्या पाण्याची समस्या भेडसावत आहे. विहीर व कूपनलिकांच्या पाण्याने तळ गाठला आहे. मका, सोयाबिन व चारापिके पाण्याअभावी जळू लागली आहेत. मुळा धरणाचे पाणी वांबोरी पाइपचारीला सोडल्यास या जिरायत भागातील शेतीला पाणी मिळणार आहे. तसेच परिसरातील गावतळे, शेततळे भरून जिरायत भागातील पिण्याच्या पाण्याची समस्या काही अंशी कमी होऊ शकेल. दुष्काळग्रस्त जिरायत भागासाठी शासनाने कोट्यवधी रुपये खर्च करून वांबोरी पाइपचारी केली आहे.


जलसंपदामंत्र्यांना निवेदन दिल्यानंतर मंत्री तटकरे यांनी पाटबंधारेचे भाऊसाहेब कुंजीर यांना येत्या दोन दिवसांत पाणी सोडण्याचे आदेश देऊन जिरायत भागाला दिलासा दिला आहे.


विजेची 36 लाख थकबाकी
या योजनेच्या 36 लाखांच्या थकीत वीजबिलामुळे चारीला पाणी सोडण्यावर बंधन आले आहे. सर्व रक्कम भरल्याशिवाय वीजपुरवठा सुरू करण्यास महावितरणने नकार दिला आहे. त्यामुळे जलसंपदामंत्र्यांनी आदेश देऊनही चारीला पाणी येऊ शकत नाही. चारीला पाणी येणार म्हणून शेतकर्‍यांमध्ये आनंदाचे वातावरण होते. मात्र, आता पुन्हा प्रतीक्षा करण्याची वेळ आली आहे.


वीज पुरवठय़ासाठी पाठपुरावा
वांबोरी पाइपचारीच्या थकीत वीजबिलाचा प्रश्‍न मार्गी लावण्यासाठी पाठपुरावा सुरू आहे. याबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेऊन त्यांना वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी साकडे घातले आहे.’’ प्रसाद तनपुरे, माजी खासदार.