आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तंबाखू-बार नको रे बाबा...तंबाखू बिअर बारने आणले जिल्ह्याला गोत्यात

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर- तंबाखूमुळे कर्करोग होत नसल्याची मुक्ताफळे भाजपचे खासदार दिलीप गांधी यांनी उधळल्यानंतर आता राज्याच्या कायदा-सुव्यवस्थेची जबाबदारी असणारे गृहराज्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राम शिंदे यांनी केलेल्या बिअर बारच्या उद्घाटनाच्या वादामुळे पुन्हा एकदा नगर जिल्ह्याचे नाव चर्चेत आले आहे.
सातत्याने विरोधी पक्षात राहिल्यामुळे भाजपमधील अनेकांची मानसिकता सत्तेत असतानाही अजून विरोधी पक्षात असल्यासारखीच आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुशीत घडलेले अनेक कार्यकर्ते आज भाजपच्या माध्यमातून सर्वोच्च स्थानापर्यंत पोहोचले आहेत. नैतिकता, स्वयंशिस्त, देशभक्ती यांची शिकवण संघात काम करणाऱ्यांना दिली जाते. सत्तेत आल्यानंतर संघाच्या नैतिकतेला स्वयंशिस्तीला भाजपचे खासदार दिलीप गांधी गृहराज्यमंत्री राम शिंदे यांनी खुंटीला टांगून ठेवल्याचे त्यांच्या वर्तनावरून दिसते. एकीकडे केंद्र राज्य सरकार तंबाखूमुळे कर्करोग होतो, अशा आशयाच्या जाहिरातींवर कोट्यवधींचा खर्च करून तंबाखू सोडण्याचा सल्ला लोकांना देत आहेत. शासनस्तरावर दरवर्षी तंबाखू विरोधी दिन साजरा केला जातो. तीन महिन्यांपूर्वी सरकारने सार्वजनिक ठिकाणी तंबाखू खाऊन थुंकल्यास दंडात्मक कारवाई करण्याची तरतूद केली.
दुसरीकडे मात्र तंबाखूच्या दुष्परिणामांचा अभ्यास करणाऱ्या संसदीय समितीचे प्रमुख खासदार गांधी यांनी तंबाखूमुळे कर्करोग होतो याला पुष्टी देणारा कुठलाही अभ्यास भारतात झालेला नाही. कर्करोग केवळ तंबाखूमुळे होतो असे नाही, असे वक्तव्य केले. गांधी यांच्या या वक्तव्यावर प्रसारमाध्यमांतून टीकेची झोड उठवली गेली. त्यानंतर श्रीगोंदे येथे बोलताना गांधी यांनी तंबाखूमुळे कर्करोग होतो, हे अद्यापि सिध्द झालेले नाही. मात्र, अन्नपचन प्रक्रिया तंबाखूमुळे सुधारते, असे सांगून पुन्हा नव्या वादाला तोंड फोडले.
खासदार गांधीचे तंबाखू पुराण ताजे असताना नगरचे पालकमंत्री राज्याचे गृहराज्यमंत्री राम शिंदे यांच्या हस्ते झालेल्या बिअर बारच्या उद्घाटनाच्या वादामुळे नगरचे नाव पुन्हा एकदा चर्चेत आणले. ज्या जिल्ह्यात दारुबंदी चळवळ उभी रहात आहे, त्या जिल्ह्याचे पालकमंत्रीच बारचे उद्घाटन करून या चळवळीला खो घालण्याचा प्रयत्न करत असल्याची टीका अनेकांनी केली. प्रसारमाध्यमांनी टीकेची झोड उठवल्याने "तंबाखू-बार आता पुन्हा कधीच नको रे बाबा' असे म्हणण्याची वेळ या दोघांवर आली आहे.
मंत्री शिंदेंनी रेस्टॉरंटचेच उद्घाटन केले...
पालकमंत्री राम शिंदे यांनी नगर-पुणे रस्त्यावरील एका फमिली रेस्टॉरंटचे उद्घाटन केले. या हॉटेलचा बिअरबार परमिटरुमशी कोणताही संबंध नसल्याचे पत्रक मराठा शेतकरी महासंघाचे प्रदेशाध्यक्ष संभाजी दहातोंडे यांनी प्रसिद्धीस दिले आहे. शिंदे यांनी ज्या रेस्टॉरंटचे उद्घाटन केले, त्याशेजारी असलेला बार २०१२ पासून आहे. त्याचा रेस्टॉरंटशी काहीही संबंध नाही. राज्यात दारुबंदी झालीच पाहिजे. परंतु त्याअगोदर राज्यातील दारू उत्पादन करणारे कारखाने बंद करायला हवेत. पण जिल्ह्यातील राजकीय मंडळी जाणीवपूर्वक मंत्री शिंदे यांची बदनामी करत आहेत. कोणतीही वस्तुनिष्ठ माहिती घेता बातम्या देणे ही निंदनीय बाब आहे.
बातम्या आणखी आहेत...