आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नगरचा मराठा क्रांती मोर्चा घडवणार इतिहास

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - कोपर्डीतील मुलीवर झालेल्या अत्याचाराच्या घटनेनंतर मराठा समाजाला एकत्र आणणारा संपूर्ण राज्याचे लक्ष लागलेला मराठा क्रांती मूकमोर्चा आतापर्यंतचे गर्दीचे सर्व उच्चांक मोडणार आहे. शहरातील संयोजकांनी गुरुवारी नियोजनाचा आढावा घेतला. मोर्चात जिल्ह्यातील १४ तालुक्यांतून प्रत्येकी लाख ते दीड लाख नागरिक सहभागी होतील, अशी अपेक्षा आहे. त्यामुळे शहरात पंधरा लाखांवर जनसमुदाय गोळा होईल. जिल्ह्याच्या इतिहासात हा मोर्चा ऐतिहासिक ठरणार आहे.
कर्जत तालुक्यातील कोपर्डी प्रकरणातील आरोपींना लवकरात लवकर फाशी द्यावी, मराठा समाजाला आरक्षण मिळावे, अॅट्रॉसिटी कायद्यात दुरुस्ती यासह विविध मागण्यांसाठी राज्यभरात लाखोंच्या संख्येने मराठा क्रांती मोर्चे निघत आहेत. नगरमध्ये शुक्रवारी (२३ सप्टेंबर) हा मोर्चा निघणार आहे. त्यासाठी मागील पंधरा दिवसांपासून जय्यत तयारी सुरू होती. उत्कृष्ट नियोजन, सोशल मीिडयाचा योग्य वापर, घरोघर मोर्चाची माहिती देणारे स्वयंसेवक यांनी चोख कामगिरी बजावली आहे.

मोर्चाचे नेतृत्व सकल मराठा समाज करत अाहे. मागील आठ दिवसांत विविध सामाजिक संघटनांनी मोर्चाला उत्स्फूर्त पाठिंबा दिला आहे. अनेकांनी मोर्चाच्या निमित्ताने मदतीसाठी पुढाकार घेतला आहे. सोशल मीडियावरही मोर्चाचा ज्वर चांगलाच चढला आहे. गुरुवारी राष्ट्रीय वंजारी परिषद, कासार कालिकादेवी संस्थानच्या वतीने मोर्चाला पाठिंबा देण्यात आला. शहरातील आेम गार्डन येथून मोर्चाच्या नियोजनाची सर्व सूत्रे हलवली जात आहेत.
उर्वरित कामे मार्गी लावण्यासाठी संयोजकांसह स्वयंसेवकांची गुरूवारी धावपळ सुरू होती. शहरातील रस्त्यांवर ठिकठिकाणी मोर्चाचे मोठे फलक लावण्यात आले आहेत. ठरावीक अंतरावर मचाण बांधून भोंगेही लावण्यात आले आहेत.

मोर्चाच्या मार्गावर महिला पुरुषांसाठी स्वच्छतागृहांची व्यवस्था करण्यात आली आहे. महापालिकेचेही फिरते दवाखाने सज्ज आहेत. मोर्चाला गालबोट लागणार नाही, यासाठी प्रत्येकजण प्रयत्नशील आहे.

जय्यत तयारी पूर्ण झाली आहे. शेतकरी, नोकरदार, विद्यार्थी महिला मोठ्या संख्येने या मोर्चात सहभागी होणार आहेत. मोर्चात पंधरा लाखांहून अधिक नागरिक येतील, असा अंदाज सूत्रांकडून वर्तवण्यात आला. गुरुवारी दुपारी शासकीय विश्रामगृहावर संयोजकांनी आढावा बैठक घेतली. या बैठकीत मोर्चाच्या नियोजनाची रूपरेशा ठरली. साहित्य वाटपाचेही नियोजन करण्यात आले. वाडिया पार्कपासून भगवे, तसेच काळे झेंड्यांचे वाटप करण्यात येणार आहे. तालुकापातळीवर संयोजकांनी वाहनांची व्यवस्था केली आहे. प्रत्येक तालुक्यातून लाख ते दीड लाख या प्रमाणात शहरात पंधरा लाखांवर जनसमुदाय येईल, अशी खात्री व्यक्त केली जात आहे. मोर्चा शिस्तबद्ध निघणार आहे. मोर्चाच्या पार्श्वभूमीवर नगर शहरातील शाळा, महाविद्यालये शुक्रवारी बंद ठेवण्यात येणार आहेत.

महिनाअखेर मांडणार हिशेब
मोर्चासाठी पन्नास लाखांवर वर्गणी जमा झाली होती. त्याप्रमाणात खर्चही करण्यात आला आहे. संपूर्ण पारदर्शीपणा असून बँकेतच पैसे जमा केले. मोर्चा झाल्यानंतर महिनाअखेरपर्यंत हिशेब सादर केला जाईल, असे संयोजकांनी सांगितले.

असा पार पडेल मोर्चा
मोर्चात सर्वप्रथम कोपर्डी येथील अत्याचारित मृत मुलीला श्रद्धांजली अर्पण केली जाईल. लगेच जिजाऊ वंदन करून निवेदन दिले जाईल. त्यानंतर राष्ट्रगीत होऊन मोर्चाचा सामारोप होईल. कोणत्याही घोषणा नाहीत, कोणतेही भाषण नाही, अशी माहिती संयोजकांनी दिली.

असा असेल मोर्चा
मोर्चातमुली सर्वात पुढे, त्या पाठोपाठ महिला, वकील, डॉक्टर, त्यानंतर पुरुष, त्यांच्यामागे सरपंच, सदस्य, आमदार, खासदार, मंत्री महोदय, वारकरी असणार आहेत. स्वत: संयोजक मागे राहणार आहेत.

२५ हजार स्वयंसेवक
मोर्चाचे नियोजन करण्यासाठी १० हजार स्वयंसेवकांची गरज होती. नोंदणी विक्रमी २५ हजार स्वयंसेवकांनी केली. त्यात हजार महिला स्वयंसेवकांचा समावेश आहे. शिस्तबद्ध साखळी पद्धतीने मोर्चा पुढे जाणार आहे. पाणीवाटपाचीही जबाबदारी स्वयंसेवक बजावणार आहेत.

मोर्चात लाख झेंडे
मोर्चात सहभागी झालेल्या मोर्चेकऱ्यांना स्वयंसेवकांच्या माध्यमातून वाडिया पार्कजवळ साहित्य वाटप होणार आहे. त्यात एक लाख भगवे एक लाख काळ्या रंगाच्या झेंड्यांचे वाटप करण्यात येणार आहे. त्याबरोबरच विविध मागण्यांचे तसेच मोर्चाचे २५ हजार फलकही वाटप करण्यात येणार आहेत.

स्मायलिंगचे संचलन
मराठाक्रांती महामूक मोर्चात स्मायलिंग अस्मिता विद्यार्थी परिषदेनेही सहभाग घेतला आहे. मोर्चात अस्मिता संस्थेचे हजार विद्यार्थी युवक सहभागी होतील. त्यात २७० मुलींचा समावेश असेल. मोर्चात पाण्याचे पाऊच वाटप, गर्दीतले नियोजन आदींविषयी गुरुवारी मार्गदर्शन करण्यात आले. संस्थेचे सर्व युवक डोक्यावर "कर्म मराठा, धर्म मराठा, मराठा क्रांती' लिहिलेल्या टोप्या परिधान करणार आहेत.

कोपर्डीकर नगरमध्ये दाखल
मोर्चासाठी कर्जत तालुक्यातील कोपर्डी येथील मोर्चेकरी बुधवारी (२१ सप्टेंबर) नगरच्या दिशेने पायी निघाले. गुरुवारी रात्री ते नगरमध्ये दाखल झाले. त्यांचा मुक्काम ओम गार्डन येथे आहे.
बातम्या आणखी आहेत...