आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Today Nagar Municipal Corporation Ward Structure Decided With Reservation

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

नगर महापालिका प्रभागरचनेचा आज होणार फैसला

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर - आगामी महापालिका निवडणुकीसाठी शुक्रवारी सकाळी 11 वाजता महापालिकेच्या सभागृहात सोडत पध्दतीने आरक्षण काढण्यात येणार आहे. त्यासाठी प्रशासनाने जय्यत तयारी केली आहे. यावेळी प्रभागरचनाही पहायला मिळणार असल्यामुळे सर्वच राजकीय पक्षांचे नेते, कार्यकर्ते व इच्छुक उमेदवारांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

आरक्षण सोडत पाहण्यासाठी प्रशासकीय इमारतीच्या मागील बाजूस नागरिकांसाठी मंडप उभारण्यात आला आहे. एलसीडी स्क्रीनवर प्रभागरचना दाखवण्यात येणार आहे. आयुक्त विजय कुलकर्णी यांच्या अध्यक्षतेखाली व निवडणूक आयोगाच्या दोन अधिकार्‍यांच्या उपस्थितीत सोडत काढण्यात येईल. द्विसदस्यीय पध्दतीने निवडणूक होणार असल्याने 34 प्रभाग निश्चित करण्यात आले असून 68 नगरसेवक निवडण्यात येणार आहेत. मात्र, कोणत्या प्रभागात कोणत्या वर्गाचे आरक्षण निश्चित होते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

नवीन प्रभागरचनेनुसार स्वत:च्या प्रभागातील कोणता भाग वगळण्यात येणार व कोणता नव्याने समाविष्ट होणार, यासाठी विद्यमान नगरसेवक देव पाण्यात घालून बसले आहेत. शुक्रवारी सकाळी आरक्षणासह नवीन द्विसदस्यीय प्रभागरचना समजल्यानंतर नगरसेवकांसह सर्वच राजकीय पक्ष तयारीला लागतील. महिलांसाठी प्रथमच 50 टक्के आरक्षण असल्याने प्रत्येक प्रभागात एक जागा महिलेसाठी राखीव असेल. त्यात सर्वसाधारण प्रवर्गातील 40 पैकी 20 जागा, अनुसूचित जाती प्रवर्गातील 9 पैकी 5 जागा, नागरिकांच्या मागास प्रवर्गातील 18 पैकी 9 जागा महिलांसाठी राखीव असतील. अनुसूचित जमातीमधील 1 जागा पुरूषांसाठी राखीव आहे. आरक्षणासह निश्चित झालेली प्रारुप प्रभागरचना 27 ऑगस्टला जाहीर करण्यात येणार असून त्यावर 3 सप्टेंबरपर्यंत हरकती मागवण्यात येणार आहेत.